सोलापुरात ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृती समितीकडून 'राष्ट्रनिष्ठ' या स्मृतीग्रंथांचे प्रकाशन
ज्येष्ठ पत्रकार कै. अरुण रामतीर्थकर स्मृती समितीच्या राष्ट्रनिष्ठ या स्मृतीग्रंथांचे प्रकाशन करतांना मान्यवर |
सोलापूर-- धर्मनिरपेक्षता याचा अर्थ सध्या पाकिस्तानी कलाकारांना बोलावणे, सैन्यावर बलात्काराचा आरोप करणार्यांना पाठीशी घालणे असा दिसून येत आहे. हिंदु महिलांच्या अधिकाराविषयी बोलणारे धर्मनिरपेक्षवादी मुसलमान महिलांच्या अधिकाराविषयी चिडीचूप असतात. धर्मावर आधारित बेगडी धर्मनिरपेक्षतेचे राजकारण केवळ भारतातच आहे, अशी टीका ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्ट्रीय ख्यातीचे अभ्यासक तुफेल अहमद यांनी केली.
ज्येष्ठ पत्रकार अरुण रामतीर्थकर स्मृती समितीकडून 'राष्ट्रनिष्ठ' या कै. रामतीर्थीकर यांच्या स्मृतीग्रंथांचे प्रकाशन सोलापुरात तुफेल अहमद आणि भाऊ तोरसेकर यांच्या हस्ते ६ नोव्हेंबर या दिवशी सायंकाळी झाले. त्या वेळी पत्रकार तुफेल अहमद बोलत होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर होते. या वेळी व्यासपिठावर तरुण भारतचे माजी संपादक श्री. अरुण करमरकर, तसेच अधिवक्ता अपर्णाताई रामतीर्थकर उपस्थित होत्या. स्मृतीग्रंथाच्या प्रकाशनानंतर 'सेक्युलॅरिझम आणि आजची पत्रकारिता' या विषयावर तुफेल अहमद यांचे व्याख्यान झाले.
तुफेल अहमद पुढे म्हणाले, "देशातील नितीशकुमार, ममता बॅनर्जी, अखिलेश यादव ही आणि अशी धर्मनिरपेक्ष म्हणवणारी मंडळी पाकिस्तानी कलाकारांना भारतात बोलावतील; परंतु तस्लीमा नसरीन, वहिदा रहेमान यांना मात्र बोलावणार नाहीत. भारतात पाकिस्तानी कलाकार हवेतच कशाला ? भारतीय समाजात भेदभाव निर्माण करण्यासाठी अल्पसंख्यांकवादाची निर्मिती झाली; परंतु अल्पसंख्याकवादामुळेच मुसलमान समाजाच्या प्रगतीत अडथळे येत आहेत. त्यामुळे मुसलमान समाज जर अल्पसंख्यांकवादाच्या मानसिकतेतून बाहेर पडला, तरच या समाजाची प्रगती होऊ शकते. केवळ संख्येवरून अल्पसंख्याक आणि बहुसंख्याक अशी वर्गवारी करता येणार नाही. ख्रिस्ती, शीख, जैन हेही देशात अल्पसंख्य आहेत; परंतु त्यांना अल्पसंख्याकाच्या दृष्टीने पाहिले जात नाही."
भाऊ तोरसेकर म्हणाले, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधान होण्याचा उद्देश आणि शरद पवार यांचा पंतप्रधान होण्याचा उद्देश यात मोठा फरक आहे. मोदींना हे दायित्व त्यांच्याा खांद्यावर का घ्यावेसे वाटले, हे जाणून घेणे महत्त्वाचे आहे. २०१४ मध्ये वृत्तवाहिन्यांनी रालोआला बहुमत मिळेल, असे कुठेच दाखवले नव्हते. प्रत्यक्षात निवडणुकीचे निकाल मात्र वृत्तवाहिन्यांच्या अंदाजाच्या उलटे लागले. यावरूनच माध्यमकर्मींच्या मोदीविरोधी पत्रकारितेच्या अभ्यासाचा प्रत्यय देशाला आला."
तरुण भारतचे माजी संपादक श्री. अरुण करमरकर म्हणाले, "अरुण रामतीर्थकर यांनी लोकप्रियतेसाठी कधीच लिखाण केले नाही. राष्ट्रभक्तीचे विचार त्यांच्या लिखाणातून नेहमीच उतरले. धर्म, परंपरा, संस्कृती, राजकारण, समाजकारण यांविषयी सत्याचा मागोवा घेणारे त्यांचे लिखाण वाचकांसाठी नेहमीच प्रेरणादायी ठरले."
तरुण भारताचे माजी संपादक श्री. अरुण करमरकर यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. पत्रकार श्री. सिद्धाराम पाटील यांनी सूत्रसंचालन, तर अधिवक्ता अपर्णाताई रामतीर्थकर यांनी आभार प्रदर्शन केले.
पुरस्कार संपले असतील !
'देशातील तथाकथित बुद्धीजीवींनी असहिष्णुतेचा मुद्दा उपस्थित करीत पुरस्कार परत करण्याची मोहीम चालवली; ती इतकी होती की, आता बहुधा पुरस्कार संपले असावेत !', असा मार्मिक टोला तुफेल अहमद यांनी लगावताच सभागृहात टाळ्यांचा कडकडाट झाला.
जम्मू-काश्मीरमध्ये भारतीय सैनिक महिलांवर बलात्कार करतात, असे म्हणणार्या कन्हैय्याला पाठीशी घालणारे आता माजी सैनिकाच्या आत्महत्येच्या प्रकरणावरून केंद्र सरकारवर निशाणा साधत आहेत !
- श्री. भाऊ तोरसेकर
Post a Comment