गोरेगाव आणि जोगेश्वरी रेल्वेमार्गातील नवीन
रेल्वेस्थानकाला 'राम मंदिर रोड' नाव देण्याची वीर सेनेची मागणी !
![]() |
डावीकडून सुनील कदम, निरंजन पाल आणि प्रभाकर भोसले |
मुंबई- रेल्वे प्रशासनाच्या नियमानुसार गावाच्या नावाने तेथील रेल्वेस्थानकाला नाव दिले जाते. 'गोरेगाव' या नावाने रेल्वेस्थानक अस्तित्वात आहे. त्यामुळे गोरेगाव आणि जोगेश्वरी रेल्वेमार्गाच्या दरम्यान नवीन होत असलेल्या रेल्वेस्थानकाचे नामकरण तो भाग ज्या नावाने ओळखला जातो, ते 'राम मंदिर रोड', हे नाव देण्यात यावे. जनमताचा आदर करून या रेल्वेस्थानकाला रामाचे नाव न दिल्यास जनआंदोलन उभारू, अशी चेतावणी वीर सेनेचे अध्यक्ष श्री. निरंजन पाल यांनी पत्रकार परिषदेत केली. गोरेगाव आणि जोगेश्वरी या रेल्वेमार्गाच्या मध्ये नवीन रेल्वेस्थानक होत आहे. २७ नोव्हेंबर या दिवशी केंद्रीय रेल्वेमंत्री श्री. सुरेश प्रभु यांच्या हस्ते या नवीन रेल्वेस्थानकाचे उद्घाटन आणि नामकरण विधी होणार आहे. या रेल्वेस्थानकाला 'राम मंदिर रोड', असे नाव द्यावे, या मागणीसाठी वीर सेनेच्या वतीने २४ नोव्हेंबर या दिवशी मुंबई मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली होती. या पत्रकार परिषदेत श्री. पाल बोलत होते. या वेळी व्यासपिठावर श्री शिवकार्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष श्री. प्रभाकर भोसले, हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील कदम उपस्थित होते.
या वेळी श्री. निरंजन पाल म्हणाले, "मुंबई महानगरपालिकेच्या दस्ताऐवजानुसार एस्.व्ही. रोड ते रेल्वेस्थानकाच्या रस्त्याला राम मंदिर हे नाव आहे. राम मंदिर ज्या विभागात तेथे २५० वर्षे जुने राम मंदिर आहे. येथील बेस्टच्या थांब्यालाही राम मंदिर बसस्थानक असे नाव आहे. त्यामुळे नवीन स्थानकालाही तेच नाव असायला हवे. या मागणीसाठी आम्ही केंद्रीय रेल्वेमंत्री, गृहमंत्री, जिल्हाधिकारी, स्थानिक आमदार, तहसीलदार यांना निवेदने दिली आहेत. याच्या समर्थनार्थ राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत ५ सहस्रांहून अधिक रहिवाशांनी स्वाक्षरी करून 'राम मंदिर रोड' या नावाला समर्थन दिले आहे, तर २१५ समर्थनाची पत्रे आमच्याकडे आहेत. अद्याप कुणीही या नावाला विरोध दर्शवलेला नाही. ही केवळ वीर सेनेची नव्हे, तर जनतेची मागणी आहे. सर्वांच्या समर्थनानेच ही मोहीम चालू आहे. जिल्हा प्रशासनाने केलेल्या सर्वेक्षणातही राम मंदिर रोड या नावालाच सर्वांचे समर्थन असल्याचे पुढे आले आहे. त्यामुळे जनतेची ही मागणी लक्षात घेऊन नवीन रेल्वेस्थानकाला राम मंदिर रोड हेच नाव देण्यात येईल, अशी आम्हाला आशा आहे. तसे न झाल्यास सर्व संघटनांच्या वतीने पुढील आंदोलनाची दिशा ठरवली जाईल."
वीरसेनेच्या मागणीला आमचे संपूर्ण समर्थन !
- प्रभाकर भोसले, अध्यक्ष, श्री शिवकार्य प्रतिष्ठान, विक्रोळी
राम मंदिर रोड नावाची मागणी केवळ वीर सेनेची नाही, तर या मागणीला सर्व जनतेचा पाठिंबा आहे. याविषयी येथील लोकप्रतिनिधींना निवेदन देण्यात आली आहेत. वीर सेनेने जी मागणी केली आहे, त्याला श्री शिवकार्य प्रतिष्ठानच्या वतीने आमचा संपूर्ण पाठिंबा आहे; मात्र रेल्वेस्थानकाला रामाचे नाव न दिल्यास सर्व संघटना एकत्रित आंदोलन करू.
जनभावनांचा आदर करून रेल्वेस्थानकाला श्रीरामाचे नाव द्यावे !
- सुनील कदम, हिंदु जनजागृती समिती
प्रभु श्रीराम मर्यादा पुरुषोत्तम आहेत. व्यक्ती, घर आदींना रामाचे नाव देण्यामागे तसा आदर्श समाजात रहावा, अशी भावना असते. नवीन रेल्वेस्थानकाच्या भागातही पुरातन राम मंदिर आहे. याविषयी जनभावनांचा आदर करून या रेल्वेस्थानकाला रामाचे नाव देण्याच्या वीर सेनेने घेतलेल्या भूमिकेला हिंदु जनजागृती समितीचा संपूर्ण पाठिंबा आहे. यासाठी सनदशीर मार्गाने हवे असलेले सर्वोतोपरी सहकार्य हिंदु जनजागृती समितीच्या वतीने करण्यात येईल.
देशासाठी त्याग केला त्यांची नावे स्थानकांना द्या !
"हा हिंदुस्थान आहे; मात्र मुंबईमध्ये आजही काही रेल्वेस्थानकांना आक्रमणकर्त्या इंग्रजांची नावे आहेत. येथे 'एलफिस्टन' नावाने असलेले रेल्वेस्थानकाचे नाव इंग्रजांच्या गव्हर्नरचे होते. त्याने क्रांतीकारकांना गोळ्या घातल्या. अशा प्रकारे पाश्चात्यांनी नावे पाहून आपण अजूनही गुलामगिरीत असल्याप्रमाणे वाटते. पाश्चात्यांच्या गुलामगिरीचे प्रतिक असलेले एकही नाव येथील वास्तूला असू नये. ज्यांनी या देशासाठी त्याग केला त्यांची नावे येथील वास्तूंना द्या", असे आवाहन श्री. निरंजन पाल यांनी या वेळी केले.
Post a Comment