BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

देवस्थानांच्या भ्रष्ट शासकीय समित्या त्वरित विसर्जित करा ! - हिंदुत्वनिष्ठांची मागणी

नागपूर विधान भवनाजवळ निदर्शने; ‘अंधश्रद्धा 
निर्मूलन समिती’वर प्रशासक नेमण्याची मागणी ! 

आंदोलनात बोलतांना शिवसेनेचे आमदार
श्री. प्रकाश अबिटकर. डावीकडे श्री. अभय वर्तक



मंदिरांच्या देवस्थान समितीमध्ये भ्रष्टाचार करणार्‍यांना 
शिक्षा होईपर्यंत संघटितपणे काम करूया ! - शिवसेनेचे आमदार प्रकाश अबिटकर


        नागपूर - शासनाने श्री महालक्ष्मी मंदिर, श्री तुळजाभवानी मंदिर, पंढरपूर येथील विठ्ठल-रुक्मिणी मंदिर यांसह इतर देवळांतील अपकारभाराचे नैतिक दायित्व स्वीकारून सर्व भ्रष्ट शासकीय देवस्थान समित्या तात्काळ विसर्जित (बरखास्त) कराव्यात, लक्षावधी रुपयांचे घोटाळे करणार्‍या अंधश्रद्धा निर्मूलन समितीवर प्रशासक नियुक्त करण्यात यावा, या प्रमुख मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी १३ डिसेंबर या दिवशी दुपारी १ वाजता नागपूर विधान भवनाजवळ निदर्शने आणि घोषणाबाजी केली. शिवसेनेचे राधानगरी (जिल्हा कोल्हापूर) येथील आमदार श्री. प्रकाश अबिटकर यांनी या आंदोलनात उत्स्फूर्तपणे भाग घेतला. ‘पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि तुळजापूर मंदिरात कोट्यवधी रुपयांचा घोटाळा करणार्‍यांवर कठोर शिक्षा होईपर्यंत आपण संघटितपणे काम करूया’, असे आवाहन श्री. अबिटकर यांनी केले. या वेळी सनातन संस्थेचे प्रवक्ता श्री. अभय वर्तक उपस्थित होते. 

निदर्शनांमध्ये 
सहभागी झालेले मान्यवर
        या आंदोलनात शिवसेनेचे विभागप्रमुख सर्वश्री रजतजी देशमुख, हिंदु सेनेचे कार्यकर्ते जयेश हारोडे, अनुपजी बघेल, धर्माभिमानी अभिनिलजी एनडेटीवार, रणरागिणी शाखेच्या सौ. गौरी जोशी, हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ता श्री. अरविंद पानसरे आदी मान्यवर उपस्थित होते. 
हिंदुत्वनिष्ठांचे मनोगत
        आमदार श्री. प्रकाश अबिटकर म्हणाले, ‘‘माझा या आंदोलनाला पाठिंबा आहे. नागपूर येथेही देवस्थान समितीमधील भ्रष्टाचाराच्या विरोधात एवढ्या उत्स्फूर्तपणे आंदोलन चालू असल्याचे पाहून मला आनंद झाला. श्री महालक्ष्मी मंदिराच्या पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीमधील घोटाळ्यांविषयी आम्ही मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन त्यांना घोटाळ्याची जाणीव करून दिली. या वेळी मुख्यमंत्र्यांनी ‘दोषींची गय केली जाणार नाही’, असे विधानसभेत लक्षवेधीला उत्तर देतांना म्हटले होते. राज्य गुन्हे अन्वेषण यंत्रणेकडून (सीआयडीकडून) देवस्थान समितीच्या घोटाळ्याविषयी चालू असलेल्या अन्वेषण पद्धतीची शंकास्पद भूमिका आम्ही ठामपणाने मांडली. कोणत्याही परिस्थितीत देवस्थान समितीची भूमी परत मिळाली पाहिजे, अशी आमची मागणी आहे.’’ 
        श्री. अभय वर्तक म्हणाले, ‘‘सुयोग्य व्यवस्थापन देण्याच्या नावाखाली पूर्वीच्या शासनाने श्री तुळजाभवानी, श्री विठ्ठल-रुक्मिणी, श्री महालक्ष्मी, श्री ज्योतिबा, श्रीनृसिंहवाडी, श्रीसिद्धिविनायक आदी जागृत देवस्थानांसह राज्यातील सहस्रो मंदिरे स्वतःच्या कह्यात घेतली; मात्र या शासन नियंत्रित देवस्थानांत कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार, सहस्रो एकर भूमींचे घोटाळे, दान केलेल्या गायींचे मृत्यू अन् त्यांची कसायांना विक्री, पंचतारांकित उपाहारगृहात बैठकांसाठी लक्षावधी रुपयांची उधळपट्टी आदी अनेक अपकारभार हिंदु जनजागृती समिती, हिंदु विधीज्ञ परिषद आणि अन्य भक्त यांनी वेळोवेळी पुराव्यानिशी उघड केले. परिणामी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि तुळजापूर देवस्थान समिती यांच्या घोटाळ्यांची राज्य गुन्हे अन्वेषण विभागाकडून चौकशी चालू झाली; मात्र जाणीवपूर्वक वर्षानुवर्षे या चौकशा लांबवल्या जात आहेत. त्यामुळे पुरावे नष्ट होण्याची शक्यता दाट असल्याने भक्तगणांमध्ये संतापाची लाट निर्माण झाली आहे.’’ 
        हिंदु जनजागृती समितीचे विदर्भ समन्वयक श्री. श्रीकांत पिसोळकर म्हणाले की, देवस्थान समित्यांतील घोटाळे उघडकीस आणूनही त्यावर कारवाई न झाल्याने मंदिरांतील गैरकारभार चालूच राहिला. पंढरपुरात दान मिळालेल्या गायी मोठ्या प्रमाणात दगावणे, पंढरपूरच्या मंदिर समितीने गोवंश कसायांना विकणे, असे गंभीर प्रकार आम्ही उघड केले. यावर वेळीच कारवाई झाली असती, तर अनेक गायी वाचल्या असत्या. कोट्यवधी रुपये उत्पन्न असणार्‍या तुळजापूर मंदिराच्या दानपेटीचा लिलाव निम्म्या किमतीत करत १९ वर्षे भ्रष्टाचार चालू होता. या मंदिराची २६५ एकर भूमी हडपण्यात आली, तर श्री महालक्ष्मी मंदिराची सुमारे ८००० एकर भूमी हडपली गेली. याविषयीच्या चौकशीला अनेक वर्षे झाली; मात्र एकावरही कारवाई झाली नाही. देवनिधीच्या चोरीचे पाप करणार्‍या शासनकर्त्यांना देव क्षमा करणार नाही. 
        अधिवक्त्या वैशाली परांजपे म्हणाल्या की, ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती’ ट्रस्टने शासनाचा निधी बुडवला आणि अनेक आर्थिक घोटाळे केले, हे धर्मादाय आयुक्त कार्यालयाच्या चौकशी अहवालात स्पष्ट झाले आहे. त्यामुळे अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या ट्रस्टवर प्रशासक नेमावा, तसेच सोलापूरचा ‘सोनअंकुर एक्सपोर्टस् प्रा.लि.’ हे अनधिकृत पशुवधगृह सार्वजनिक आरोग्य धोक्यात आणणारे असल्याने ते तात्काळ बंद करावे, अशा मागण्या केल्या. 
        या वेळी समितीच्या वतीने नागपूर विधान भवनात जाऊन शासनाला वरील मागण्यांचे निवेदन सादर करण्यात आले. हिंदु जनजागृती समितीचे श्री. अतुल आरवेनला यांनी सूत्रसंचालन केले. 

घोषणा
        या आंदोलनात ‘देवस्थान समितीची शेकडो एकर भूमी हडपणार्‍यांना शिक्षा झालीच पाहिजे, हिंदूंच्या मंदिरात भ्रष्टाचार करणार्‍या शासकीय समित्या विसर्जित (बरखास्त) करा, हिंदूंच्या मंदिरांचे सरकारीकरण रहित करा’, अशा घोषणा देऊन आंदोलनकर्त्यांनी विधान भवनाजवळील परिसर दणाणून सोडला. 
क्षणचित्र : या आंदोलनात वयोवृद्ध आंदोलनकर्त्यांचा अधिक सहभाग होता. त्यांनी आंदोलन संपेपर्यंत उत्स्फूर्तपणे घोषणा दिल्या.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.