BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

कोटी कोटी प्रणाम ! आज ‘दत्तजयंती’ - ‘‘जगातील प्रत्येक गोष्टच गुरु आहे; कारण प्रत्येक गोष्टीपासून काही ना काही शिकता येते.




श्रीदत्तात्रेयकवच

(पातःस्मरणीय परमपूज्य श्रीदत्तावतार प.प. श्रीमद्वासुदेवानंदसरस्वती श्रीचरणांच्या स्तोत्रादी संग्रहातील हे १४२ वे स्तोत्र आहे.)


॥ सार्थ श्रीदत्तकवच प्रारंभ ॥
श्रीपादः पातु मे पादावूरू सिद्धासनिस्थितः । पायाद्दिगंबरो गुह्य नृहरिः पातु मे कटिम् ॥१॥
श्री म्हणजे लक्ष्मी ज्यांच्या पदकमलांचा आश्रय करून राहते ते श्रीपाद श्रीदत्तात्रेय माझ्या पायांचे रक्षण करोत. सिद्धासन घालून बसलेले श्रीदत्तात्रेय माझ्या मांड्यांचे रक्षण करोत. दिगंबर म्हणजे दिशा हेच ज्यांचे वस्त्र आहे असे म्हणजे नग्न अवधूत वेष धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझे गुह्य म्हणजे विसर्जन करणारे गुद व जननेंद्रिय यांचे रक्षण करोत. माझ्या कंबरेचे रक्षण नृहरि श्रीदत्तात्रेय करोत ॥१॥
नाभिं पातु जगत्स्रष्टोदरं पातु दलोदरः । कृपालुः पातु ह्रदयं षड्भुजः पातु मे भुजौ ॥२॥
सर्व जगाला निर्माण करणारा म्हणजे ब्रह्मदेव हे रूप धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या नाभीचे म्हणजे बेंबीचे रक्षण करोत. पिंपळाच्या पानाप्रमाणे पातळ उदर म्हणजे पोट असणारे (दलोदर) श्रीदत्तात्रेय माझ्या उदराचे रक्षण करोत. कृपाळू म्हणजे कृपाशील श्रीदत्तात्रेय माझ्या ह्रदयाचे रक्षण करोत. सहा हात असणारे षड्भुज श्रीदत्तात्रेय माझ्या भुजांचे रक्षण करोत. ॥२॥
स्त्रक्कुंडी-शूल-डमरू शंख-चक्र-धरः करान् । पातु कंठं कंबुकंठंः सुमुखः पातु मे मुखम् ॥३॥
माला, कमंडलू, त्रिशूल, डमरू, शंख व चक्र यांना सहा हातांनी धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या हातांचे रक्षण करोत. कंबू म्हणजे शंख. शंखाप्रमाणे ज्यांचा कंठ आहे ते श्रीदत्तात्रेय माझ्या कंठाचे म्हणजे माझ्या गळ्याचे रक्षण करोत. सुंदर मुख असणारे श्रीदत्तात्रेय माझ्या मुखाचे रक्षण करोत. (या श्लोकात करान् पातु म्हणजे अनेक हातांचे रक्षण करोत असे बहुवचन घातलेले आहे. माणसाला दोनच हात असताना बहुवचन का घातले अशी शंका येते. बहुवचन घेण्यास कारण असे की आपल्या येथे पुरुषाला लग्न झाल्यावर चतुर्भुज झाला असे म्हणतात. पती व पत्नी एकरूपच असतात. तेव्हा पुरुषाला पत्नीचे दोन हात घेऊन चार हात होतात व पत्नीलाही पतीचे दोन हात घेऊन चार हात होतात. याप्रमाणे बहुवचनाची संगती लागते. 'करौ' असा पाठ मूळ प्रतीत असल्यास प्रश्नच नाही.) ॥३॥
जिह्वां मे वेदवाक्‌पातु नेत्रे मे पातु दिव्यदृक् । नासिकां पातु गंधात्मा पातु पुण्यश्रवाः श्रुती ॥४॥
सर्व वेद ज्या विराटस्वरूप श्रीदत्तात्रेयांचे वागिंद्रिय आहे तो माझ्या जिभेचे रक्षण करो. ज्याची दृष्टी दिव्य म्हणजे भूत, वर्तमान व भविष्य या सर्व काळातील सर्व पदार्थांना प्रत्यक्ष पाहणारी आहे असे सर्वदर्शी श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही डोळ्यांचे रक्षण करोत. ज्यांचे शरीर सर्वदा व स्वभावतःच सुगंधी आहे आणि जे गंधरूप आहेत असे श्रीदत्तात्रेय माझ्या नाकाचे रक्षण करोत. ज्यांच्या स्वरूपाचे व गुणांचे श्रवण पुण्यकारक आहे असे श्रीदत्तात्रेय माझ्या दोन्ही कानांचे रक्षण करोत. ॥४॥
ललाटं पातु हंसात्मा शिरः पातु जटाधरः । कर्मेन्द्रियाणि पात्वीशः पातु ज्ञानेन्द्रियाण्यजः ॥५॥
(विषयात चित्त गुंतलेले असते व चित्तात विषय भरलेले असतात. मग विषयातून चित्त व चित्तातून विषय कसे काढावे असा प्रश्न ब्रह्मदेवाला पुढे करून सनत्कुमारादी चौघा सिद्धांनी विचारला असता; माझ्या निरंतर चिंतनाने जीव मत्स्वरूप झाल्यावर चित्तातून विषय व विषयातून चित्त बाजूला होईल असे ब्रह्मदेवालासुद्धा न सुचणारे उत्तर हंसावतारात श्रीदत्तात्रेयांनी देऊन सनत्कुमारादी सिद्धांना समाधान दिले ते) हंसरूप श्रीदत्तात्रेय माझ्या ललाटाचे रक्षण करोत. जटा धारण करणारे श्रीदत्तात्रेय माझ्या मस्तकावर जटा नसल्या तरी आपल्या जटाधारित्वाच्या योगाने माझ्या मस्तकाचे रक्षण करोत. सर्वांचे ईश म्हणजे स्वामी असणारे श्रीदत्तात्रेय वाणी, जननेन्द्रिय, गुद, हात व पाय अशा पाच कर्मेंन्द्रियांचे रक्षण करोत. अज म्हणजे जन्मरहित असणारे अर्थात जन्मानंतरचेही विकार नसणारे श्रीदत्तात्रेय, डोळे, नाक, कान, जीभ व त्वगिंद्रिय (स्पर्श जाणणारे इंद्रिय) अशा पाच ज्ञानेंद्रियांचे रक्षण करोत. ॥५॥
सर्वान्तरोन्तःकरणं प्राणान्मे पातु योगिराट् । उपरिष्टादधस्ताच्च पृष्ठतः पार्श्वतोऽग्रतः ॥६।
सर्वांच्या आत राहणारे म्हणजेच सर्वान्तर, ज्यांच्याव्यतिरिक्त आत दुसरा कोणी नाही असे सर्वान्तर श्रीदत्तात्रेय माझ्या अंतःकरणाचे रक्षण करोत. सर्व योग्यांचा राजा श्रीदत्तात्रेय माझ्या प्राणापानादी दशवायूंचे रक्षण करोत. वरती, खाली, पाठीमागे, डाव्या-उजव्या दोन्ही बाजूला तसेच पुढच्या बाजूला श्रीदत्तात्रेय माझे रक्षण करोत. ॥६॥
अन्तर्बहिश्च मां नित्यं नानारूपधरोऽवतु । वर्जितं कवचेनाव्यात्स्थानं मे दिव्यदर्शनः ॥७॥
नानारूप धारण करणारे श्रीदत्तात्रेय आत बाहेर म्हणजे घराच्या किंवा शरीराच्या आत व बाहेर माझे रक्षण करोत. ज्या स्थानाला कवच लागले नाहे त्या स्थानांचेही दिव्यदृष्टि असणारे श्रीदत्तात्रेय रक्षण करोत. ॥७॥
राजतः शत्रुतो हिंस्त्राद् दुष्प्रयोगादितोघतः । अधि-व्याधि-भयार्तिभ्यो दत्तात्रेयः सदावतु ॥८॥
राजापासून, शत्रूपासून, हिंसा करणे ज्यांचा स्वभाव आहे अशा सिंहव्याघ्रादिकांपासून, जारणमारणादी दृष्ट प्रयोगापासून, अघ म्हणजे पाप त्यापासून, आधि म्हणजे मानसीव्यथा तिच्यापासून, व्याधी म्हणजे शरीरव्यथा तिच्यापासून, भय म्हणजे इतर जी भये त्यापासून व आर्ति म्हणजे पीडा तिच्यापासून श्रीदत्तात्रेय गुरु सर्वदा माझे रक्षण करोत. ॥८॥
धन-धान्य-गृह-क्षेत्र-स्त्री-पुत्र-पशु-किङकरान् । ज्ञातींश्च पातु नित्यं मेऽनसूयानंदवर्धनः ॥९॥
माझ्या वित्ताचे, धान्याचे, घराचे, शेतीचे, स्त्रीचे, मुलांचे, पशूंचे, सेवकांचे व इतर सर्व कुटुंबाचे अनसूयेच्या आनंदाला वाढविणारे श्रीदत्तात्रेय रक्षण करोत. ॥९॥
बोलोन्मत्तपिशाचाभो द्युनिट्संधिषु पातु मां । भूतभौतिकमृत्युभ्यो हरिः पातु दिगंबरः ॥१०॥
केव्हा केव्हा लहान मुलासारखे वागणारे, केव्हा केव्हा उन्मत्त म्हणजे वेड्यासारखे वागणारे, केव्हा केव्हा पिशाच्चा सारखे दिसणारे दिगंबर व हरिरूप असे श्रीदत्तात्रेय दिवसा, रात्री व दिवसरात्रीच्या संधीत म्हणजे दिवसरात्रीच्या मधल्या वेळेत पंचमहाभूत व पंचमहाभूतांपासून झालेल्या पदार्थांपासून आणि मृत्युपासून माझे रक्षण करोत. ॥१०॥ (आत्मा अमर आहे पण त्याने देहादिकांशी संगती केली म्हणून त्यांचे मरण मला आहे असे मनुष्य समजतो. अर्थात देहादिक मी नाही किंबहुना त्याहून मी अत्यंत वेगळा आहे असे साक्षात्काराने जाणले म्हणजे मनुष्य मृत्यु पासुन सुटतो. श्रीदत्तमहाराज माझे मृत्यु पासुन रक्षण करोत म्हणजे मला आत्मज्ञान देऊन माझ्यावर आरोपित केलेल्या देहादिकांच्या मरणापासून माझे रक्षण करोत, असा अर्थ येथे घ्यायचा आहे. पहिल्या श्लोकापासून रक्षण करोत, रक्षण करोत अशीच प्रार्थना ह्या कवचात केलेली आहे. कवच अंगात घातले म्हणजे ज्याप्रमाणे लढाईत शत्रूच्या बाणादिकांची काही पीडा न होता आपले शरीर सुरक्षित राहते; त्याचप्रमाणे हात, पाय इ. आपले अवयव वाईट, चुकीच्या कार्याकडे न वळता भजन, तीर्थयात्रादी उत्तम कार्याकडे वळणे ह्यालाच त्यांचे रक्षण करणे असे म्हटले जाते. अर्थात माझ्या इंद्रियांकडून अधःपात होणाऱ्या कोणत्याही क्रिया न होता उत्तम गतीला पोहोचविणाऱ्याच क्रिया होवोत असे मागणे ह्या कवचात देवापाशी मागितले आहे. या कवचाचा पाठ करताना हे तत्त्व लक्षात घेऊन पाठ केल्यास ऐहिक व पारमार्थिक असे दोन्ही प्रकारचे कल्याण कवच जापकाचे म्हणजे जप करणाऱ्याचे श्रीदत्तमहाराज करणार आहेत ह्यात शंका नाही. श्रीदत्तात्रेय हे सर्व देवांचे देव, ब्रह्मस्वरूप असल्याने त्यांना अशक्य काहीच नाही. मनात श्रीदत्तमहाराजांची मूर्ती आठवून हे मागणे करावे म्हणजे पुढील दोन श्लोकात सांगितलेले फळ कवच पाठकाला निश्चयाने मिळेल.)
य एतद्दत्तकवचं संनह्याद्‍भक्तिभावितः । सर्वानर्थविनिर्मुक्तो ग्रहपीडाविवर्जितः ॥११॥
भूतप्रेतपिशाचाद्यैर्देवैरप्यपराजितः । भुक्त्वात्र दिव्यभोगान् स देहांते तत्पदं व्रजेत् ॥१२॥
हे श्रीदत्तकवच जो कोणी भक्तीने युक्त होऊन आपल्या अंगावर चढवील (येथे जो कोणी असे 'यः' या पदाने म्हटले आहे. येथे जाती पातीचा प्रश्न येत नाही. ज्याला कल्याणाची इच्छा असेल तो कोणीही या कवचजपाचा अधिकारी आहे असे स्वामीमहाराज म्हणतात.) म्हणजे जो कोणी ह्या कवचाचा जप करील वा पाठ करील तो सर्व अनर्थातून मुक्त होईल. शनीमंगळादिकांपासून होणाऱ्या ग्रहांच्या पीडेपासून मुक्त होईल. भूत, प्रेत व पिशाच्च यांचे कवचधारकापुढे काही चालणार नाही. देव सुद्धा त्याला पराजित करू शकणार नाहीत अर्थात देवांचेही त्याच्यापुढे काही चालणार नाही. इतकेच नव्हे तर या लोकात, स्वर्गात असणाऱ्या सुखांप्रमाणे त्याला सर्व सुखे प्राप्त होतील. दुःख तर मुळीच होणार नाही व या लोकातील आयुमर्यादा संपल्यावर म्हणजेच देहान्ती, कवच जापक श्रीदत्तस्वरूपाला प्राप्त होईल. याहून जास्त काय मागावे व याहून जास्त मागणे तरी काय असणार?
श्रीदत्तकवच सार्थ संपूर्ण

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.