चांदुर रेल्वे पोलीस अजुनही झोपेतच
पालकमंत्र्यांनी लक्ष घालण्याची गरज
(फोटो- संग्रहीत)
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
शहरात चांदुर रेल्वे पोलीसांच्या छत्रछायेत गेल्या अनेक दिवसांपासुन वरली मटका व्यवसाय जोमात सुरू आहे. शहरातील सिनेमा चौक, आठवडी बाजार व इतर मुख्य चौकात अशा अनेक ठिकाणी हा मटका व्यवसाय खुलेआम सुरू आहे. शहराच्या ठिकाणी सुरू असलेला हा मटका घेणारे एजंट व खेळणाऱ्या मटकाबहाद्दरांची संख्या दिवसागणिक वाढत आहे. त्यांचे पोलिसांसोबत व वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांसोबत लागेबांधे असल्याची चर्चा होत आहे. चांदुर रेल्वे पोलिसांच्या दुर्लक्षामुळे अनेकांचे संसार या वरली मटक्यामुळे उद्ध्वस्त होत आहेत. असे असतानांही कुठल्याही प्रकारचे अंकुश या ठिकाणी लावण्यात येत नसल्याचे दिसल्यानंतर वर्तमानपत्रांतुन बातम्या झळकताच अमरावती येथील गुन्हे अन्वेषण शाखेच्या (एलसीबी) पथकाने आठवडी बाजारातील एका ठिकाणी धाड टाकली. येथुन केवळ तेथे काम करणाऱ्या प्रदिप पुंडलिक नाईक (वय २७) रा. चांदुर रेल्वे याला अटक केली होती. मात्र वरली मटका व्यवसाय करणाऱ्या संचालकाला अद्यापही अटक करण्यात आली नाही. ही धाड पुर्वसुचना देऊन टाकली असल्याचे दिसते, कारण धाड टाकायच्या दिवशी येथे दररोज वरली मटका खेळणारे गायब होते. यासोबतच शहरात अनेक वरली मटका व्यवसायाची ठिकाणे असुन यांच्यावर मात्र एलसीबी पथकाने विशेष मेहेरबानी केल्याचे दिसते. एलसीबी पथकाच्या अशा संशयास्पद वृत्तीमुळे त्यांचे हात चांगलेच ओले झाल्याची चर्चा जनमानसात उमटत आहे. या गंभीर बाबीकडे मात्र चांदुर रेल्वे पोलीसांनी दुर्लक्ष केले आहे. पोलीसांच्या अकार्यक्षमतेमुळे मटकाबंदीसाठी आता पालकमंत्री प्रविण पोटेसह शहराच्या लोकप्रतिनिधींनीही लक्ष घालण्याची गरज आहे.
Post a Comment