वारकरी संप्रदायातील ५ महाराजांना मारहाण केल्याच्या प्रकरणाचे आळंदी येथे पडसाद
आळंदी – वारकरी संप्रदायातील ५ महाराजांना मारहाण करणे, तसेच तोंडाला काळे फासणे, अंगावर शाई फेकणे इत्यादी प्रकार घृणास्पद आहेत. हा सर्व चालू असतांना तेथे पोलीस अधिकारी कांबळे हे उपस्थित होते. (यावरून समाजकंटकांना पोलिसांची भीती वाटत नाही, असे वाटल्यास चुकीचे काय ? कांबळे यांचे समाजकंटकांशी काही लागेबांधे तर नाहीत ना, असा संशय आल्यास वावगे काय ? -संपादक) त्या वेळी कांबळे यांनी समाजकंटकांवर तात्काळ कुठलीच कारवाई न केल्याने त्यांना तात्काळ निलंबित करण्यात यावे, अशी मागणी अखिल वारकरी संघाचे कोषाध्यक्ष ह.भ.प.संजय महाराज हिवराळे यांनी केली. वारकरी संप्रदायाच्या वतीने येथे काढण्यात आलेल्या मूक मोर्च्याला ते संबोधित करत होते. जोपर्यंत त्या पोलीस अधिकार्यावर निलंबनाची कारवाई होत नाही, तोपर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात मूक मोर्चे काढण्यात येतील, अशी चेतावणीही त्यांनी या वेळी दिली.
हा मूक मोर्चा चाकण चौकातून चालू होऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराज समाधी मंदिराजवळ त्याची सांगता झाली. या वेळी आळंदी पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नंदकुमार गायकवाड यांनी सभास्थळी येऊन निवेदन स्वीकारले. मोर्च्यामध्ये अखिल वारकरी संघाचे उपाध्यक्ष ह.भ.प. गोविंद महाराज गोरे, अखिल वारकरी सेना, हिंदु जनजागृती समिती या संघटनांच्या पदाधिकार्यांसहित ५०० हून अधिक वारकरी आणि हिंदुत्वनिष्ठ सहभागी झाले होते.
Post a Comment