जिल्हा परिषद गडचिरोली व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समितीच्या सार्वत्रिक निवडणूका घेण्यासाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. सदर निवडणूक कार्यक्रमानुसार पहिल्या टप्प्यात कोरची, कुरखेडा, देसाईगंज, आरमोरी, धानोरा, गडचिरोली , चामोर्शी व मुलचेरा या आठ तालुक्याच्या निवडणूका दिनांक 16 फेब्रुवारी 2017 रोजी घ्यावयाच्या आहेत. व दुसऱ्या टप्प्यात दिनांक 21 फेब्रुवारी ला एटापल्ली, भामरागड, अहेरी व सिरोंचा या चार तालुक्याच्या निवडणूका घेण्यात येत आहेत. या निवडणूक विषयक कामकाज सुरळीत व अचुक कामकाज करण्याच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाचे आयुक्त जे. एस. सहारीया यांच्या अध्यक्षतेखाली आज आढावा बैठक संपन्न झाली त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी गोंडवाना विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. नामदेवराव कल्याणकर, अप्पर पोलीस महासंचालक बिपीन बिहारी, निवडणूक विभागाचे सचिव शेखर चन्ने, जिल्हाधिकारी ए. एस. आर. नायक, पोलिस अधिक्षक डॉ. अभिनव देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी शांतनु गोयल, सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, अपर जिल्हाधिकारी महेश आव्हाड, उपजिल्हाधिकारी शैलेंद्र मेश्राम, निवासी उपजिल्हाधिकारी दुर्वेश सोनावणे, जिल्हयातील उपविभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती आंधळे, तडपाडे, टोनगांवकर, राममुर्ती, इटनकर, चांदुरकर , विजय मुळीक, निलावार, जिल्हयातील सर्व उपविभागीय पोलिस अधिकारी, तहसिलदार, नोडल अधिकारी आदी. प्रामुख्याने उपस्थित होते.
निवडणूक कामकाजाच्या दृष्टीने प्रास्ताविक करतांना जिल्हाधिकारी नायक यांनी जिल्हयाची संक्षिप्त माहिती दिली. तसेच नोडल अधिकारी नियुक्त केलेल्या अधिकाऱ्यांची नावे व त्यांच्या पदनामाची माहिती अवगत केली. गडचिरोली जिल्हयाचे एकूण ग्रामीण मतदार संख्या बाबत माहिती सांगतांना म्हणाले की, पहील्या टप्प्यात मतदान करणारे मतदार 4 लाख 36 हजार 552 तर दुसऱ्या टप्यात 1 लाख 60 हजार 247 मतदान आपला मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यावेळी मतदान केंद्रावर नियुक्त करावयाचे अधिकारी/ कर्मचारी व मनुष्यबळाची माहिती सुध्दा दिली. मतदार जनजागृती करीता जिल्हा परिषद गट क्षेत्रनिहाय जानजागृती मेळावे घेण्यात येत आहेत. सोबतच जिल्हयातील विविध भाषीक लोकांसाठी गोंडी, तेलगु, छत्तीसगडी, मराठी , हिंदी व इंग्रजी या भाषेमधून मतदाराना जागृत करण्याचे काम पत्रकाव्दारे करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी या आढावा बैठकीत सांगितली.
जिल्हा पेालिस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी जिल्हयातील काही भाग अतिसंवेदनशिल व संवेदनशिल क्षेत्रात मोडत असल्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीकोणातून पोलिसाची भुमिका महत्वाची आहे असे सांगितले. व त्याअनुषंगाने काही मतदान केंद्र वेळेवर हलविण्यासाठी नियोजन केले असल्याचे ते म्हणाले.
या बैठकीत संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठया संख्येने उपस्थित होते.
संदर्भ - जी.मा.का गडचिरोली
Post a Comment