शहरातील नगर परीषद, उपविभागीय अधिकारी कार्यालय व इतर काही कार्यालयात सुरक्षतेच्या व कर्मचाऱ्यांवर नजर ठेवण्याच्या दृष्टीने सि.सि.टी.व्ही. कॅमेरे बसविण्यात आले आहे. मात्र यासोबतच आवश्यक असलेल्या स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये अद्यापही कॅमेरे बसविण्यात आलेले नाही. तक्रारकर्ते पोलीस स्टेशनमध्ये आले असता त्यांना तास न् तास स्थानिक पोलीस स्टेशनमध्येच बसवुन ठेवून त्यांनाच नाहक त्रास देत असल्याचे समजते. तसेच अनेक कर्मचाऱ्यांची पोलीस स्टेशनमध्ये ड्युटी असतांना सुध्दा पोलीस स्टेशन सोडुन घरी किंवा शहरात इतरत्र जातात. त्यामुळे यावर अंकुश मिळविण्यासाठी सि.सि.टी.व्ही. कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. कॅमेरे लागल्यानंतर अनेक कर्मचारी शिस्तीत राहायला लागतात. मात्र वरीष्ठांचे स्थानिक पोलीस स्टेशनकडे लक्ष नसल्यामुळे अद्यापही कॅमेरे लावण्यात आलेले नाही. पोलीस स्टेशनचा कारभार पारदर्शक व्हावा यासाठी कॅमेऱ्यांची आवश्यकता आहे. या बाबींचा विचार करून स्थानिक पोलीस स्टेशनमध्ये सि.सि.टी.व्ही. कॅमेरे कधी लागणार असा प्रश्न उपस्थित झाला आहे. त्यामुळे वरीष्ठ अधिकारी याची दखल घेणार का हे पाहणे महत्वाचे आहे.
मुख्य चौकांवरही सि.सि.टी.व्ही. ची आवश्यकता
यासोबत शहरातील मुख्य चौक जुना मोटार स्टैंण्ड, विरूळ चौक, सिनेमा चौक, बस स्टैंण्ड परीसर या मुख्य रस्त्यांवरही ही सि.सि.टी.व्ही. कॅमेरे लावणे आवश्यक आहे. यामुळे शहरात खुल्या डोळ्याने सुरू असलेले वरली मटका व इतर अवैध धंदे, सैराट होऊन वेगाने मोटरसायकल चालविणाऱ्या युवकांवर नियञंण राखले जाईल. तसेच महिला व शालेय, महाविद्यालयीन युवतींच्या सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातुनही कॅमेऱ्यांची गरज असल्याचे मत काही शहरवासीयांनी व्यक्त केले.
Post a Comment