धान्य साठविण्याकरीता CWC चे गोदाम तात्काळ उपलब्ध करुन देणार
11 व 12 मार्च रोजी सुट्टीच्या दिवशी तुर खरेदी सुरु
अमरावती - दरवर्षीपेक्षा यावर्षी तुरीचे उत्पन्न जास्त प्रमाणात झाले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणात उत्पन्न झालेल्या तुरीची खरेदी कालपासून बारदान्याअभावी थांबली. शेतकऱ्यांची बारदान्याची समस्या सोडविण्याकरिता जिल्हाधिकारी किरण गित्ते यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीला आज सकाळी भेट दिली व तात्काळ 20 हजार बारदाना खरेदी करण्याबाबतचे निर्देश त्यांनी एफसीआयला दिले. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सुनिल वऱ्हाडे, अमरावतीचे तहसिलदार सुरेश बगळे, तलाठी पाटेकर, एफसीआयचे खरेदी अधिकारी वैभव मुंदरे उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी म्हणाले, बारदान्याच्या कमतरतेमुळे तुरीच्या खरेदीची प्रक्रीया थांबता कामा नये. याकरिता एफ.सी.आय ने कृषी उत्पन्न बाजार समितीकडून तात्काळ 20 हजार बारदाना लोन तत्वावर घ्यावा व तुरीची खरेदी सुरु करावी. धान्य साठवणीच्या समस्येवर त्यांनी सीडब्यूसीचे गोदाम तात्काळ उपलब्ध करुन तेथे वीजपूरवठा करावा असे सांगीतले. एफसीआयने तीन दिवसांच्या आत शेतकऱ्यांच्या खरेदी केलेल्या मालाची किंमत द्यावी. तुर खरेदीच्या वेळी व्यावहारीक पद्धतीने तुरीची श्रेणी, वजन व माप ठरविण्यात यावे, कृषी उत्पन्न बाजार समितीने व्यापारांना कमी किमतीमध्ये तुर खरेदी करण्याची परवानगी देवू नये, असे करतांना आढळल्यास संबंधितांवर कार्यवाही करण्यात येईल असे सांगीतले. यावेळी नाफेडच्या वतीने बडनेरा व धारणी येथे नविन तुर खरेदी केंद्र सुरु करण्याबाबत प्रस्ताव सादर करावा असे निर्देश संबंधितांना दिले. येत्या गुडीपाडव्यापर्यंत तुर खरेदीची प्रक्रीया पूर्ण व्हावी याकरिता सुटीच्या दिवशीदेखील (दि. 11 व 12 मार्च रोजी) तुर खरेदीची प्रक्रीया सुरु ठेवण्यात येईल असे सांगीलते. यावेळी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या परिसरातील विक्रीस असलेल्या तुरीची जिल्हाधिकाऱ्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या समस्या ऐकुन घेतल्या व त्यांच्याशी संवाद साधून समस्येवर प्रशासनाच्या वतीने वेळीच व योग्य उपाययोजना करण्यात येईल असे सांगीतले.
Post a Comment