आज होळी म्हणजे वाईट चालीरीती, वाईट कृत्य यांची होळी. चांदुर रेल्वे तालुक्यासह सगळीकडे होळी साजरी केली जाणार आहे. पण हल्ली एक प्रश्न पडतो खरच होळी म्हणजे वाईटाची होळी कि निसर्गाच्या अद्वितीय संपत्तीची होळी.
आज प्रचंड प्रमाणात वृक्षतोड होणार आहे. आधीच दुष्काळानं पोखरून टाकलेल्या ह्या महाराष्ट्र देशाला हे असं वृक्ष तोड किती परवडणारी आहे ह्याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे. आज दुष्काळामुळे जी परिस्थिती ओढावली आहे त्या करता कोण जबाबदार ह्या विषयावर चर्चा वाद विवाद करण्यापेक्षा प्राप्त परिस्थितीवर तोडगा काढुन भविष्यात पुन्हा हि परिस्थिती उद्भवणार नाहि ह्या करता विचार केला पाहिजे. सर्वांनीच नुसतंच तोंडानं म्हणतो 'झाडे जगवा, झाडे वाचवा' पण प्रत्यक्षात आपण ह्यातल काहीच आमलांत आणत नाही हे मात्र विशेष. जसा काळ बदलतो तशा रुढी, परंपरा पण बदलायला पाहिजेत. सध्याच्या काळात होळी साजरी करण्याकरता दुसरा काही पर्याय आहे
का हे तपासून पाहिलं पाहिजे. सगळ्यांच्या सभोवती अशा किती तरी गोष्टी सापडतील ज्याचा होळीत जळणं म्हणुन उपयोग करू शकतो. चांगल्या डवरलेल्या झाडांच्या फांद्या तोडुन त्याची होळी करण हा नक्कीच योग्य पर्याय नाही. होळीची पूजा करतो म्हणजे एका अर्थानं त्याला देवच मानतो, मग ह्या दैवताला तरी मान्य असेल का की, त्यानेच निर्माण केलेल्या निसर्गाची सगळे जाळुन राख करतो. वर्षभर कितीतरी टाकाऊ
माल जतन करू शकतो ज्याचा उपयोग अशा प्रसंगांना जळणं म्हणुन करु शकतो. जेव्हा ह्या रुढी, हे सण अस्तित्वात आले किंवा सुरू झाले
तेव्हाची परिस्थिती एकदम भिन्न होती. देश निसर्ग संपन्न असा होता. प्रत्येक गल्लीबोळात होळी
पेटवण्यापेक्षा 'एक गाव एक गणपती' ह्या
तत्त्वावर 'एक गाव एक होळी' केली तरी मोठ्या
प्रमाणावर होणारा हा निसर्गाचा ऱ्हास थांबवु शकणे शक्य होईल. गावाकडे अजुनही चूल पेटवण्याकरता गोवऱ्यांचा वापर केला जातो. ह्या पर्यायाचा विचार करायला हरकत नाही. अनेकजन रोज मोठ्या प्रमाणात पुठ्ठे, मोठे मोठे बॉक्सेस, कागदाचे चिटोरे कचऱ्यात टाकुन देतात, पण हेच जर एखाद्या सुरक्षित ठिकाणी साठवून ठेवल तरी त्याचा जळणं म्हणुन उपयोग करता येईल. असे पर्याय पुष्कळ आहेत पण ते अंमलात आणण खूप महत्त्वाचे आहे. त्यामुळे आता एकत्र येऊन संकल्प करुन निसर्गाचा ऱ्हास थांबविणे गरजेचे आहे..
Post a Comment