BREAKING NEWS

Sunday, March 26, 2017

बुद्धीला परिश्रम व कौशल्याची जोड द्या, मग यशाचे आकाश तुमचेच ! मुख्यमंत्री श्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रेरणादायी मार्गदर्शन

नागपूर-


“सतत बदलत जाणाऱ्या जगात विपूल संधी उपलब्ध आहेत. बदलत्या जगाला समोरे जाण्याची सकारात्मक मानसिकता ठेवा. गुणवत्तेला कष्टाची आणि कौशल्याची जोड द्या. आयुष्यात पुन्हा पुन्हा संधी येत नसते याची जाणीव ठेवत यशाच्या शिडीवरली प्रत्येक पाऊल वेळीच पुढे टाकत रहा. ज्या युवक- युवती जगात या पद्धतीने वाटचाल करतील त्यांना त्यांच्या स्वप्नांना पंख फुटल्याचा हमखास अनुभव येईल ते यशाच्या आकाशात नेहमीच विहार करत राहतील” अशा प्रेरणादायी शब्दात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी युथ एम्पॉवर समिट मध्ये मोठया संख्येने सहभागी झालेल्या युवक – युवतींना मार्गदर्शन केले.
फॉर्च्यून फाऊंडेशन, ईसीपीए व नागपूर महानगरपालिका यांच्या वतीने वसंतराव देशपांडे सभागृह येथे युथ एम्पॉवरमेंट समिट आयोजित करण्यात आली असून आज या उपक्रमात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. पालकमंत्री चंद्रशेखर बानवकुळे, जिल्हा परिषद अध्यक्षा निशा सावरकर, खासदार डॉ. विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, आ. डॉ. परिणय फुके, आ.सुधाकर देशमुख, आ.मिलींद माने, जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, बार्टीचे संचालक राजेश डाबर, कुणाल पडोळे, कपिल चंद्रायन व अधिकारी व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.
जगाला प्रशिक्षित मानवी संसाधनाची गरज असून ही गरज भागविण्याची क्षमता आपल्या देशात आहे. आपल्या देशाच्या लोकसंख्येच्या पन्नास टक्के लोकसंख्या 25 वर्षापेक्षा कमी वयाची असून यातील 65 टक्के लोकसंख्या 35 पेक्षा कमी वयाची आहे. ही आपल्या देशासाठी जमेची बाजू आहे. ही तरुणाई मानव संसाधनात परिवर्तीत केल्यास जगाच्या विकासात आपल्या देशाचे योगदान सर्वांत मोठे राहिल असे मुख्यमंत्री म्हणाले. युवकांचे स्वप्न पूर्ण करण्याचे साधन कौशल्य विकास तसेच प्रशिक्षण असून युवकांनी कौशल्य व गुणवत्तेच्या बळावर आपल्याला सिद्ध करावे, असे ते म्हणाले. देशाचे सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) जेव्हा जेव्हा वाढते तेव्हा तेव्हा रोजगार वाढत असतो, हे सुत्र लक्षात घेता आपला जीडीपी जगात सर्वात जास्त म्हणजे 7.5 टक्के प्रति वर्ष वेगाने वाढत असून आपल्या राज्याचा वाढीवा वेग 9.5 टक्के पेक्षा जास्त आहे. याचा अर्थ रोजगाराच्या संधी मोठया प्रमाणात निर्माण होत आहेत असा होतो, असे मुख्यमंत्री म्हणाले. या संधीचा लाभ घेणे आवश्यक आहे.
तरुणाई आणि संधी यांच्यामध्ये सेतू उभा करण्याचे काम फॉर्च्यून फाऊंडेशन करत असून या माध्यमातून कौशल्य प्राप्त विद्यार्थ्यांना मोठया प्रमाणात रोजगार प्राप्त होईल, अशी अपेक्षा मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली. कौशल्य विकासावर सतत भर द्या असे सांगून मुख्यमंत्री असे म्हणाले की, प्रत्येक क्षेत्रात रोजगाराच्या संधी असून या सर्व संधी कौशल्याच्या माध्यमातून प्राप्त होऊ शकतात. त्यासाठी तरुणांनी आपली मानसिकता बदलणे गरजेचे आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी मुद्रा योजनेच्या माध्यमातून उद्योगशिल तरुणांना कर्ज उपलब्ध करुन देण्याची योजना तयार केली आहे.या योजनेचा लाभ घेतांना कर्ज परतफेडीचे नियोजन आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
शासनापेक्षा खाजगी क्षेत्रात रोजगाराच्या संधी अनेक असल्याचे नमूद करुन मुख्यमंत्री म्हणाले की, कौशल्य व गुणवत्ता या बळावरच खाजगी क्षेत्रात मोठया संधी प्राप्त होऊ शकतात. शासनाने कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम सुरु केला असून याअंतर्गत लाखो होतकरु तरुणांना प्रशिक्षण देण्यात येत आहे. हे प्रशिक्षित मनुष्यबळ उद्योग विकासात आपला हातभार लावेल, असे ते म्हणाले.
यावेळी बोलताना पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, विदर्भातील 50 हजार तरुणांना मिहानमध्ये रोजगार देण्याचे स्वप्न मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी पाहिले होते. मिहानमध्ये वीज दर 14.40 रुपये होते. रोजगार निर्मितीसाठी शासनाने उद्योगांना वीज सवलत देण्याचे धोरण स्विकारले असून मिहानमधील उद्योगांना 4.40 रुपये दराने वीज देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे परत गेलेल्या 49 कंपन्या पुन्हा मिहानमध्ये येत असून याद्वारे मोठया प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे. ऊर्जा विभागाने 10 हजार विद्युत पदवीधर अभियत्यांना इलेक्ट्रिकल परवानगी देण्याचा निर्णय घेतला असून त्यांना 75 लाखापर्यंतचे काम लॉटरी पद्धतीने प्रतीवर्ष देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे ग्रामपंचायतला लाईनमन नसतो ही बाब लक्षात घेता ऊर्जा विभागाने ग्राम विद्युत व्यवस्थापक हे पद ग्राम सभेने ठराव घेऊन भरण्याचा निर्णय घेतल्याने राज्यभरात 22 हजार तरुणांना रोजगार उपलब्ध होणार आहे. राज्यातील 7 औष्णिक वीज केंद्राकडे असलेल्या अतिरिक्त जमिनीवर फ्लाय ॲश क्लस्टर तयार करण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले.
युवकांना प्रेरित करुन रोजगार वाढविण्याचे काम फॉर्च्यून फाऊंडेशन करत असून या फाऊंडेशनने आतापर्यंत 1 हजार 58 मुलांना रोजगार प्राप्त करुन दिल्याचे आमदार अनिल सोले यांनी सांगितले. युथ एम्पॉवरमेंट समिटचे हे तीसरे वर्ष असून आतापर्यंत हजारो तरुणांना मार्गदर्शन केल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी रोजगार मार्गदर्शनाचे 25 स्टॉल उभारण्यात आले असून यात 40 कंपन्या सहभागी झाले आहेत. विदर्भातील मुलांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात म्हणून फॉर्च्यून फाऊंडेशन यापुढेही कार्य करेल असेही त्यांनी सांगितले.
प्रधानमंत्री मुद्रा योजना कर्ज, अंत्योदय योजनेअंतर्गत कर्ज, स्टॅण्डअप इंडिया योजनेअंतर्गत कर्जाचे धनादेश मुख्यमंत्री यांच्या हस्ते लाभार्थ्यांना वितरीत करण्यात आले. मानव संसाधन व्यवस्थापनात कार्य करणाऱ्या व्यक्तिंचा मुख्यमंत्री यांनी सत्कार केला. यावेळी युवक युवती व कंपन्यांचे प्रतिनिधी मोठया संख्येने उपस्थित होते. अंजूमन अभियांत्रिकी महाविद्यालयाची विद्यार्थींनी आफरिन शेख हिने मुख्यमंत्र्यांना रेखाचित्र भेट दिले.
********

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.