शहरात उघड्यावर शौचास बसणा-यांवर संक्रांत आली. कारण स्थानिक नगर परीषद गुड मॉर्निंग पथक आणि पोलिसांनी सकाळी सकाळीच मोहिम सुरू केली आणि उघड्यावर शौचास बसणाऱ्यांची तारांबळ उडाली. कारण पोलिसांनी पाण्याच्या डब्ब्यासहित त्यांची धरपकड केली. यामध्ये ६ नागरीकांना अटक करून पोलीस स्टेशनला जमा केले व त्यानंतर शेवटची समज देऊन सोडुन देण्यात आले.
शहरातील मिलींद नगर, डांगरीपुरा,शेंद्रीपुरा, खडकपुरा या परीसरातील अनेक नागरिक दररोज उघड्यावर शौचास जातात. काही दिवसांपुर्वी त्यांना हागणदारीमुक्तीचा संदेश देत शौचालयाचा वापर करण्याचे आवाहन नगर परीषद गुड मॉर्निंग पथकाव्दारे करण्यात आले होते. मात्र तरीही नागरीक उघड्यावर शौचास जात होते. त्यामुळे नगर परीषद कर्मचारी व पोलीसांनी संयुक्तपणे कारवाई करीत उघड्यावर शौचास बसलेल्या ६ नागरीकांना पोलीस गाडीत बसवुन पोलीस स्टेशनमध्ये आणले. यांमधील ४ नागरीकांच्या घरी शौचालय असुनसुध्दा उघड्यावर शौचास जात होते व २ नागरीकांच्या घरी शौचालय नाही. या ६ ही नागरीकांना पोलीसांनी समज देऊन सोडुन दिले. एवढेच नव्हे तर, या पुढे उघड्यावर शौचास बसल्यास फौजदारी गुन्हे दाखल करून पोलिस कारवाईची तंबी दिली. परंतु या अभिनव उपक्रमाला कितपत यश येते, हे येणारा काळच
सांगेल. नागरिकांनीही शासनाच्या शौचालय योजनेचा लाभ घेऊन घरी शौचालयांची निर्मिती
करावी, अशी अपेक्षा नगर परीषद प्रशासनाने व्यक्त केली.
या कारवाईत नगर परीषद गुड मॉर्निंग पथकाचे नितीन इमले, प्राजक्ता पांडे, राहुल इमले, अर्चना बागडे, मिनल तट्टे, सारीका अर्के, अनंत वानखडे, चंद्रकांत गिरी, संजय वानखडे, प्रकाश गिरी, सुभाष डोंगरेसह पोलीस कर्मचाऱ्यांचा सहभाग होता..
Post a Comment