पुण्यातील मोहसीन शेख हत्येचे प्रकरण
मुंबई-
हिंदु राष्ट्र सेनेचे अध्यक्ष श्री. धनंजय देसाई यांना मोहसीन शेख हत्येच्या खटल्यात आरोपी म्हणून गोवणे अयोग्य आहे. त्यांची मुक्तता झाली पाहिजे, यासाठी श्री. देसाई यांच्यावतीने केलेल्या उच्च न्यायालयातील याचिकेची १३ एप्रिलला मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीत न्यायमूर्ती बदर यांनी ‘प्रथमदर्शनी पहाता धनंजय देसाई हे या हत्येचा कटात सहभागी होते, असा काही पुरावा दिसून येत नाही’, असे मान्य करत याचिका अंतिम सुनावणीसाठी ठेवली आहे. सरकारी अधिवक्ता इरफान सैत यांनी शासनाच्या वतीने न्यायाच्या दृष्टीने बाजू मांडली, तर श्री. धनंजय देसाई यांच्या वतीने अधिवक्ता संजीव पुनाळेकर आणि अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर यांनी बाजू मांडली.
३१ मे २०१४ या दिवशी फेसबूकवर छत्रपती शिवाजी महाराज आणि बाळासाहेब ठाकरे यांची विकृत चित्रे प्रसिद्ध करण्यात आली होती. त्यावरून अनेक ठिकाणी असंतोष पसरला होता. या असंतोषातून हिंदु राष्ट्र सेनेच्या काही जणांनी पुण्याच्या हडपसर भागातील मोहसीन शेख या मुसलमान तरुणाची हत्या केली, असा त्यांच्यावर आरोप आहे. या हत्येचा आगाऊ कट रचला गेला होता आणि कटाचे सूत्रधार श्री. देसाई होते, असा आरोप केला होता. या प्रकरणी एकूण २३ जणांना अटक करण्यात आली होती. त्यांतील २ अल्पवयीन होते. अन्य २१ जणांपैकी १७ जणांना जामीन मिळालेला आहे.
Post a Comment