

येथील लक्ष्मी रोडवरील सौदामिनी हँडलूमच्यावतीने आयोजित विणकाम महोत्सवाचे उद्घाटन अमृता देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते झाले. त्यावेळी श्रीमती फडणवीस बोलत होत्या. यावेळी महापौर मुक्ता टिळक, सौदामिनी हँडलूमच्या संचालिका अनघा घैसास, हातमाग कलेच्या अभ्यासक डॉ. सुचेता परांजपे उपस्थित होत्या. अमृता फडणवीस म्हणाल्या, हातमागाची कला ही आपल्या संस्कृतीचे प्रतिक आहे. या हातमागाच्या कलेला हजारो वर्षांची परंपरा आहे.
हातमागावर विणलेली पैठणी ही समृध्द परंपरेचे प्रतिक आहे. काळाच्या ओघात ही कला लुप्त होत असून या कलेशी निगडीत अनेक विणकरांच्या हाताला काम नाही. या विणकरांच्या हाताला काम मिळवून देण्यासाठी तसेच या कलेची जोपासना करण्यासाठी सर्वांनी हातमागावरील कपडे वापरले पाहिजेत. हातमागाच्या कलेला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी या महोत्सवाचा उपयोग होणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यावेळी अमृता फडणवीस व मुक्ता टिळक यांनी हातमागावर काही धाग्यांची गुंफन केली. यावेळी मुक्ता टिळक म्हणाल्या, पैठणी ही आपल्या राज्याची शान आहे. पैठणीला स्त्रीच्या आयुष्यात एक अनन्यसाधारण महत्व आहे. पैठणीसह हातमागावर विणलेल्या वस्त्रांना पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी सर्वांनी प्रयत्न करण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी डॉ. सुचेता परांजपे यांनी मनोगत व्यक्त केले. अनघा घैसास यांनी प्रास्ताविकात विणकाम महोत्सवाच्या आयोजनाचे प्रयोजन सांगितले.
Post a Comment