BREAKING NEWS

Thursday, April 6, 2017

भूसंपादन मोबदल्यातून उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करा - जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह


* रेल्वे भूसंपादनाचा मोबदला वितरण
* घोटी, पार्डीतील शेतकऱ्यांना गावातच धनादेश
* 48 शेतकऱ्यांना 5 कोटी 89 लाखाचा मोबदला


यवतमाळ- वर्धा-यवतमाळ-नांदेड या रेल्वे प्रकल्पासाठी थेट खरेदी पध्दतीने जमीन संपादनाची विशेष मुभा शासनाने दिली आहे. त्यामुळे जमीन संपादनाच्या कामास गती आली असून शेतकऱ्यांना खरेदी विक्री दराच्या चारपटीपेक्षा जास्त रक्कम दिली जात आहे. भूसंपादनाची सदर रक्कम उत्पन्नाचे कायमस्वरूपी साधन निर्माण करण्यासाठी उपयोगी आणा, असे जिल्हाधिकारी सचिंद्र प्रताप सिंह यांनी सांगितले.
रेल्वे मार्गासाठी जमीन संपादीत केलेल्या चापर्डा व घोटी या दोन गावातील शेतकऱ्यांना थेट त्यांच्या गावात जाऊन जिल्हाधिकाऱ्यांनी मोबदल्याचे वितरण केले. त्यावेळी शेतकऱ्यांशी संवाद साधतांना ते बोलत होते. यावेळी विशेष भुसंपादन अधिकारी विजय भाकरे, उपविभागीय अधिकारी संदीपकुमार अपार, तहसिलदार श्री. भोसले, चापर्डाच्या सरपंच सरला बंडाते यांच्यासह रेल्वे विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
परिसराच्या विकासासाठी रेल्वे फार मोठे योगदान असते. वर्धा-नांदेड रेल्वे मार्गामुळे जिल्ह्याला विकासाची गती प्राप्त करून देण्यासाठी फार मोठी मदत होणार आहे. व्यापारासोबतच शिक्षण व अन्य विकास कामात होऊ घातलेली रेल्वे लाईन सिंहाचा वाटा उचलेल. जिल्ह्यात रेल्वे मार्ग अस्तित्वात असता तर शेतकऱ्यांना यावर्षी कमी दरात तुर विकण्याची वेळ आणी नसती. किमार हजार ते पंधराशे रूपये जास्त किंमत मिळाली असती, असे जिल्हाधिकारी पुढे बोलतांना म्हणाले.
चापर्डा या गावापासून रेल्वे लाईन जाणार असल्याने येथील 17 शेतकऱ्यांची 14.59 हेक्टर शेतजमीन भूसंपादीत करण्यात आली आहे. या शेतकऱ्यांना खरेदी विक्री दराच्या 4.19 पट म्हणजे 18 लाख 24 हजार रूपये प्रती हेक्टर याप्रमाणे या शेतकऱ्यांना 2 कोटी 48 लाख 98 हजाराचे वितरण करण्यात आले. घोटी येथील 31 शेतकऱ्यांची 22.09 हेक्टर जमीन संपादीत केली असून येथील शेतकऱ्यांनाही 4.20 पट म्हणजे 19 लाख 19 हजार प्रती हेक्टर प्रमाणे मोबदला वितरीत करण्यात आली. मोबदल्याची ही रक्कम 3 कोटी 40 लाख 76 हजार इतकी आहे.
जिल्हाधिकाऱ्यांच्याहस्ते काही शेतकऱ्यांना प्रातिनिधीक स्वरूपात भुसंपादन मोबदला व व जमीन संपादन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात आले. सुरूवातीस भुसंपादन अधिकारी विजय भाकरे यांनी प्रास्ताविक केले. यावेळी त्यांनी भुसंपादनाची कार्यवाही थेट खरेदीबाबत माहिती दिली. आभारही श्री.भाकरे यांनीच मानले.
आदिवासींच्या जमिनी त्यांना परत देऊ
चापर्डा येथे जिल्हा परिषदेच्या शाळेत शेतकऱ्यांना भुसंपादन जमीनीच्या मोबदल्याचे वितरणप्रसंगी गावकऱ्यांनी आदिवासी शेतकऱ्यांच्या जमीन शासनाच्या परवानगीशिवाय काहींनी खरेदी केल्या असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या निदर्शनास आणून दिले. अशा खरेदी विक्रीचे व्यवहार झाले असल्यास सदर शेत जमीनी आदिवासी शेतकऱ्यांना परत देऊ. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांनी तहसिलदारांकडे लेखी कळवावे, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.