BREAKING NEWS

Tuesday, April 4, 2017

शिर्डीत रामनवमी उत्साहात साजरी, लाखो भाविकांनी घेतले दर्शन

मुंबई/शिर्डी. ( विशेष प्रतिनिधी ) – 

श्री साईबाबा संस्‍थान विश्‍वस्‍तव्‍यवस्‍था, शिर्डीच्‍या वतीने आयोजित केलेल्‍या श्रीरामनवमी उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरीता खुले असल्‍यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्‍या समाधीचे दर्शन घेतले.

आज उत्‍सवाच्‍या मुख्‍य दिवशी पहाटे काकड आरतीनंतर अखंड पारायणाची समाप्‍ती झाली. श्री साईसच्‍चरित या पवित्र ग्रंथाची व्‍दारकामाईतून गुरुस्‍थानमार्गे सवाद्य मिरवणूक काढण्‍यात आली. संस्‍थानचे विश्‍वस्‍त भाऊसाहेब वाकचौरे यांनी विणा, विश्‍वस्‍त डॉ. प्रताप भोसले व अॅड. मोहन जयकर यांनी श्रींची प्रतिमा व विश्‍वस्‍त बिपीन कोल्‍हे यांनी पोथी घेवून मिरवणूकीत सहभाग घेतला. यावेळी संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे, विश्‍वस्‍त सचिन तांबे, विश्‍वस्‍त तथा नगराध्‍यक्षा सौ. योगिताताई शेळके, कार्यकारी अधिकारी श्रीमती. रुबल अग्रवाल, उपकार्यकारी अधिकारी डॉ. संदिप आहेर, ग्रामस्‍थ व साईभक्‍त मोठ्या संख्‍येने उपस्थित होते. संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते समाधी मंदिरात श्रींची पाद्यपुजा, कावडीचे पूजन व व्‍दारकामाई मंदिरातील गव्‍हाच्‍या पोत्‍याची पुजा करण्‍यात आली. आज उत्‍सवाचा मुख्‍य दिवशी रात्रभर मंदिर दर्शनाकरीता खुले असल्‍यामुळे लाखो भाविकांनी श्रींच्‍या समाधीच्‍या दर्शनाचा लाभ घेतला. आज सकाळी १०.०० वाजता ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे श्रीरामजन्‍मावर कीर्तन झाले. माध्‍यान्‍ह आरतीपुर्वी रासने कुटुंबीय व देशपांडे (निमोणकर) कुटुंबीय यांच्‍या वतीने नवीन निशाणांची वि‍धीवत पूजा करुन दुपारी ४.०० वाजता मिरवणूक काढण्‍यात आली. सायं. ५.०० वाजता श्रींच्‍या रथाची शिर्डी गावातून मिरवणूक काढण्‍यात आली. यामध्‍ये साईभक्‍त मोठ्या संख्‍येने सहभागी झाले. रात्रौ ७.३० ते १०.३० यावेळेत साई स्‍वर नृत्‍योत्‍सव हा विजय साखरकर मुंबई यांचा कार्यक्रम साईनगर मैदानावरील स्‍टेजवर संपन्‍न झाला. तसेच श्रीरामनवमीचे औचित्‍य साधून आग्रा येथील दानशूर साईभक्‍त श्री.अजय गुप्‍ता व सौ.संध्‍या गुप्‍ता यांनी व्‍दारकामाई मंदिरातील फोटोकरीता सुमारे ३५ लाख रुपये किंमतचे ६७ किलो चांदीचे व १४२ किलो वजन लाकुड वापरलेली मखर विश्‍वस्‍त सचिन तांबे यांच्‍या उपस्थितीत संस्‍थानला देणगी स्‍वरुपात दिली. तर मुंबई येथील एका दानशूर साईभक्‍तांने १५ किलो वजनाच्‍या दोन दक्षिणा पेट्या संस्‍थानला देणगी दिल्‍या असून त्‍यांची विधीवत पूजा समाधी मंदिरात संस्‍थानचे अध्‍यक्ष डॉ.सुरेश हावरे व त्‍यांची सुविद्य पत्‍नी सौ.नलिनी हावरे यांच्‍या हस्‍ते करण्‍यात आली. इंदौर येथील दानशूर साईभक्‍त अरुण डागरीया यांच्‍या देणगीतून समाधी मंदिर व परिसरात करण्‍यात आलेल्‍या फुलांच्‍या आकर्षक सजावटीने साईभक्‍तांचे लक्ष वेधून घेतले तर मुंबई येथील व्‍दारकामाई मंडळाने उभारलेले श्री हनुमानाचा श्रीराम-सिता भक्‍ती देखावा असलेले महाव्‍दार आणि मंदिर व परिसरात केलेली विद्युत रोषणाई उत्‍सावाचे मुख्‍य आकर्षण ठरले. तसेच श्रीरामनवमी उत्‍सवानिमित्‍त गुजरात मधील भरूच येथील संत श्री साईराम गुरुजी यांनी भरूच ते शिर्डी हे ५६० कि.मी. अंतर उलट पाऊली चालत येवून श्री साईबाबांच्या समाधीचे दर्शन घेतले. # उद्या उत्‍सवाच्‍या सांगता दिवशी पहाटे ५.०५ वा. श्रींचे मंगलस्‍नान व दर्शन, सकाळी ६.३० वा. गुरुस्‍थान मंदिरामध्‍ये रुद्राभिषेक करण्‍यात येणार असून सकाळी १०.३० वा. ह.भ.प.विक्रम नांदेडकर यांचे काल्‍याचे कीर्तन होवून दहीहंडी कार्यक्रम होणार आहे. दुपारी १२.१० वा. माध्‍यान्‍ह आरती व तीर्थप्रसाद, सायं.६.३० वा. धुपारती होवून रात्रौ १०.३० वा. शेजारती होईल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.