हिंदी चित्रपटसृष्टीचा ‘जम्पिंग जॅक’ अभिनेता म्हणून नावाजलेले बॉलीवूडचे ज्येष्ठ कलाकार जितेंद्र यांचे व्यक्तिमत्व प्रत्येकांना लुभावणारे असेच आहे! तरुणांनाही लाजवेल असे चिरतरुण आणि स्वास्थ्य लाभलेले बॉलीवूडचे हे दिग्गज कलाकार लवकरच ७५ व्या वर्षात पदार्पण करत आहे. अभिनय आणि खास नृत्यशैलीच्या जोरावर प्रसिद्ध झालेल्या जितेंद्र यांचा चाहतावर्ग देखील तितकाच मोठा आहे. अश्या या चाहत्यांसाठी त्यांच्या खास ७५ व्या वाढदिवसानिमित्त ‘सेलिब्रेटिंग जितेंद्र’ हा मेगा म्युजीकल शो आयोजित केला जात आहे. मुंबईस्थित स्वयम्दीप सांस्कृतिक व शैक्षणिक संस्था आयोजित हा कार्यक्रम १६ एप्रिल रोजी संध्याकाळी ७ वाजता षण्मुखानंद सभागृहात आयोजित केला जाणार असून, या कार्यक्रमाचे आयोजन आणि संकल्पना स्वयम्दीप सांस्कृतिक संस्थेचे अध्यक्ष डॉ. भावनाराज यांची आहे. 'सेलिब्रेटिंग जितेंद्र' या कार्यक्रमात खुद्द जितेंद्र उपस्थित राहणार असल्यामुळे, ‘हिम्मतवाला’च्या चाहत्यांसाठी हा शो मोठी पर्वणीच ठरणार आहे.
जितेंद्र यांची अभिनय कारकीर्द आजच्या तरुण कलाकारांसाठी प्रेरणादायी आहे. लोकप्रियतेच्या शिखरावर आरूढ झालेल्या जितेंद्र यांना हिदी चित्रपटसृष्टीतले हे यश टिकवून ठेवण्यासाठी तारेवरची कसरत करावी लागली होती. एकवेळ त्यांची कारकीर्द संपुष्टात आली असे वाटत असतानाच हिम्मतवाला, खुदगर्ज या सारख्या चित्रपटाद्वारे त्यांनी पुन्हा एकदा नव्याने सुरवात केली. अथक परिश्रम आणि अत्माविश्वाच्या जोरावर जितेंद्र यांनी यशाची पुन्हा पुन्हा मुसंडी मारली आहे. त्यांच्या याच प्रदीर्घ कारकीर्दीचा गौरव ‘सेलिब्रेटिंग जितेंद्र’ या कार्यक्रमांतर्गत केला जाणार आहे.
या कार्यक्रमाची संध्याकाळ श्रोत्यांसाठी म्युजीकल ठरणार आहे. अनेक होतकरू गायकांद्वारे जितेंद्र यांची गाजलेली गाणी कार्यक्रमात सादर केली जाणार असून, त्यांच्या हिंदी चित्रपटसृष्टीतील आठवणींना उजाळा देण्याचा प्रयत्न देखील यात केला जाईल. जितेंद्र यांच्या कन्या एकता कपूर, मुलगा तुषार कपूर यांची देखील या कार्यक्रमात उपस्थिती लाभणार आहे. त्याचप्रमाणे सुप्रसिद्ध गायक शान आणि बॉलीवूडच्या अन्य कलाकारांची देखील यात वर्णी लागणार आहे
जितेंद्र यांच्या चाहत्यांसाठी आयोजित करण्यात आलेला हा कार्यक्रम प्रेक्षकांना माफक दरात उपलब्ध करण्यात येणार आहे. शिवाय बुकमायशो या संकेतस्थळाद्वारे ई-ातिकीटाची देखील सोय करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सेलिब्रेटिंग जितेंद्र' या शोद्वारे जमा झालेली नकद निधीच्या रुपात सामाजिक कार्यात वापरण्यात येणार आहे.
Post a Comment