BREAKING NEWS

Saturday, May 13, 2017

महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान ......<>....<> परिचारिका या आरोग्य सेवांच्या अग्रभागी : राष्ट्रपती

नवी दिल्ली-


परिचारिका या राष्ट्रीय आरोग्य सेवांच्या अग्रभागी असल्याचे प्रतिपादन, राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांनी केले. राष्ट्रपतींच्या हस्ते महाराष्ट्रातील 3 परिचारिकांना राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. 
‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ यांच्या जन्मदिन हा ‘आंतरराष्ट्रीय परिचारिका दिन’ म्हणून साजरा केला जातो. याचे औचित्य साधून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्यावतीने राष्ट्रपती भवनात आयोजित कार्यक्रमात राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्या हस्ते देशभरातील 35 परिचारिकांना सन्मानित करण्यात आले. यावेळी केंद्रीय आरोग्य मंत्री जे.पी.नड्डा, आरोग्य सचिव सी.के मिश्रा, वरीष्ठ अधिकारी, विविध शासकीय रूग्णालयातील परिचारिका उपस्थित होत्या. 
राष्ट्रपती म्हणाले, परिचारिकांच्या योगदानावरच आरोग्य क्षेत्राचे यश अवलंबून आहे. भारतासारख्या विकसनशील व्यवस्थेमध्ये परिचारिका, आरोग्य सेविका, आरोग्य सहायिका यांची भूमिका महत्वपूर्ण असून, त्या कमी खर्चात गुणवत्तापूर्ण आरोग्य सेवा प्रदान करतात. राष्ट्राला या सेवेचा गर्व आहे. 20 व्या तसेच 21 व्या शतकात आरोग्य सेवांमध्ये गुणवत्तापूर्ण सुधारणा झालेल्या आहेत. त्यामुळेच शहरी तसेच ग्रामीण जीवनमान उंचावले आहे. यासह माता मृत्युदर, नवजात शिशु मृत्युदर नियंत्रित करण्यामध्ये मोठे यश आले असल्याचे, राष्ट्रपती म्हणाले.
आरोग्य सेवांमध्ये मानदंड ठरविणे ही काळाजी गरज असल्याचे यावेळी राष्ट्रपती म्हणाले. ‘2017च्या राष्ट्रीय आरोग्य धोरणाची’ प्रशंसाकरून यामध्ये नवनवीन शोध, संशोधन, आणि आधुनिक काळाशी सुसंगत बदल सुचविण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. भारतीय परिचारिका या स्थानिक, राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय पातळीवर आपल्या भूमिका पार पाडीत आहेत. त्यामुळे व्यावसायिक विकास तसेच मनुष्य बळ विकास धोरण निश्चित करणे आवश्यक असल्याचे राष्ट्रपती म्हणाले. 
याप्रसंगी आरोग्य क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणा-या देशभरातील 35 परिचारिकांना राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते राष्ट्रीय ‘फ्लोरेंस नाइटिंगेल’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. यामध्ये महाराष्ट्रातील 3 परिचारिकांचा समावेश आहे. पुरस्काराचे स्वरूप पदक, प्रशस्तीपत्र, आणि 50 हजार रूपये रोख असे आहे. हा पुरस्कार 1973 पासून प्रदान करण्यात येतो.
मुंबईतील टाटा मेमोरियल रूग्णालयाच्या नर्सिंग अधिक्षक श्रीमती स्वप्ना जोशी या मागील तीन दशकापासून परिचारिका म्हणून कार्यरत होत्या. त्यांनी कॅन्सरग्रस्त बालकांसाठी विशेष कार्य केले आहे. बालकांना होणारे कॅन्सर (ऑन्कोलॉजी) यामध्ये श्री जोशी यांनी पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. तसेच याविषयांवर अधिक संशोधनासाठी त्यांनी ‘माय चाईल्ड मॅटर्स’ या प्रकल्पावर काम केले. सध्या त्या अन्य परिचारिकांना कॅन्सरग्रस्त बालकांना कशा पद्धतीने हाताळायला हवे याबाबत प्रशिक्षण देतात. ‘वैद्यकिय शस्त्रक्रिया नर्सिंग’ हे पुस्तक श्रीमती जोशी यांनी लिहीले आहे. तसेच ‘प्रसुती शास्त्रातील नर्सिंग’ या पुस्तकाच्या त्या सहलेखिका आहेत. त्यांनी राष्ट्रीय तसेच आंतरराष्ट्रीय परिषदेत अनेक शोध प्रंबध सादर केलेले आहेत. श्रीमती जोशी या नोंदणीकृत परिचारिका तसेच नोंदणीकृत मिडवाईफ आहेत. श्रीमती जोशी यांना त्यांच्या विशेष कार्याबद्दल राष्ट्रपती प्रणब मुखर्जी यांच्याहस्ते गौरविण्यात आले. 
जळगाव जिल्ह्याच्या,चोपडा तालुक्यातील अडावत येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आरोग्य सेविका चंद्रकला चव्हाण यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. त्या मागील 32 वर्षापासून आरोग्य सेविका म्हणून समर्पित तसेच उत्साही भावनेने काम करीत आहेत. ‘बेटी बचाओ बेटी पढ़ाओ, प्र’सुतिपूर्व आरोग्य विषयक जागरूकता आणि राष्ट्रीय कुटूंब कल्याण कार्यक्रम राबविण्यात त्या नेहमी पुढाकार घेतात. त्यासाठी स्थानिक पातळीवर त्यांच्या गौरवही करण्यात आलेला आहे. कुशल बाळंतपण, नवजात शिशु सुरक्षा कार्यक्रमातही त्या हिरीरीने भाग घेतात. स्थानिक पातळीवर आरोग्य संदर्भात मोठया प्रमाणात जागरूकता केल्यामुळे 2013-14 मध्ये त्यांच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात सर्वाधिक प्रसूती झाल्याची नोंद आहे. आरोग्य क्षेत्रासोबतच त्या केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानामध्येही स्वयंस्फुर्तपणे भाग घेतात. 
जळगाव जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील ढेकु येथील प्राथमिक आरोग्य केंद्रातील आरोग्य सहायिका श्रीमती कल्पना गायकवाड यांनाही आज राष्ट्रपतींच्या हस्ते पुरस्कृत करण्यात आले. ढेकु येथील आरोग्य क्षेत्रात मागील 28 वर्षापासून त्या सेवा देत आहेत. प्रसुतीपूर्व तसेच प्रसुती दरम्यान मातेची तसेच नवजात शिशुची काळजी यासह कुटुंब कल्याण या संबधीत त्यांनी सर्वाधिक कार्य केले आहे. केंद्र शासनाच्या सर्वच आरोग्य संबधित कार्यक्रम त्या मोठया उत्साहाने राबवितात. त्यांच्या या कामाची प्रशंसा स्थानिक पातळीवरही करण्यात आली आहे.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.