Monday, May 1, 2017
जिल्हयाला कायमस्वरुपी जिल्हा क्रीडा अधिकारी द्यावा -संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने निवेदन
Posted by vidarbha on 8:25:00 AM in महेंद्र महाजन जैन / रिसोड वाशीम - | Comments : 0
महेंद्र महाजन जैन / रिसोड
वाशीम -
जिल्हा क्रीडा अधिकारी किरण बोरवडेकर यांची बदली होवून जवळपास नऊ महिन्याचा कालावधी लोटूनही जिल्हयाला कायमस्वरुपी जिल्हा क्रीडा अधिकारी मिळाला नाही. त्यामुळे जिल्हयातील क्रीडा विषयक अनेक कामे खोळंबली असून कायमस्वरुपी जिल्हा क्रीडा अधिकार्याअभावी शासनाच्या अनेक योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी होवू शकली नाही. त्यामुळे जिल्हयाला कायमस्वरुपी जिल्हा क्रीडा अधिकारी देण्याची मागणी पालकमंत्री संजय राठोड यांना संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने 30 एप्रिल रोजी निवेदन देवून करण्यात आली.
निवेदनात नमूद केले आहे की, जिल्हयाला गेल्या नऊ महिन्यांपासून जिल्हा क्रीडा अधिकारीच नसल्यामुळे खेळाडू, कर्मचारी व सर्वसामान्यांना विविध क्रीडाविषयक समस्यांचा सामना करावा लागत आहे. स्वतंत्र वाशीम जिल्हा होवून 19 वर्ष होत आहेत. परंतु जिल्हयात कुठलाही अधिक़ारी नियुक्त झाल्यानंतर जास्त काळ येथे टिकत नाही ही खेदाची बाब आहे. एकदा अधिकारी इतरत्र जिल्हयात बदली होवून गेले की नवीन अधिकारी जिल्हयात येण्यास इतका विलंब का होतो हे कळायला मार्ग नाही. परंतु एखाद्या महत्वपुर्ण विभागातील अधिकार्यांच्या बदलीनंतर नवीन अधिकारी रुजू होत नाही तोपर्यत त्या विभागातील कर्मचार्यांना व सर्वसामान्यांना विविध समस्यांचा सामना करावा लागतो. तशीच गत वाशीम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाची झाली आहे. सध्या वाशीमच्या जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाचा प्रभार अकोल्याचे जिल्हा क्रीडा अधिकारी शेखर पाटील यांच्यावर आहे. अकोला जिल्हयाची जबाबदारी सांभाळून वाशीम जिल्हयाची अतिरिक्त जबाबदारी सांभाळतांना त्यांनाही नानाविध समस्यांचा सामना करावा लागत आहे. वाशीम जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयातील कर्मचार्यांना सुध्दा छोट्या छोट्या कामासाठी तसेच कागदपत्रांवर सह्या घेण्यासाठी अकोला येथे चकरा माराव्या लागतात. या सर्व समस्या निकाली निघून क्रीडा क्षेत्रातील मरगळ दुर करण्यासाठी जिल्हयाच्या ठिकाणी कायमस्वरुपी व स्वतंत्र जिल्हा क्रीडा अधिकारी देण्याची मागणी संकल्प मल्टीपर्पज फाऊंडेशनच्या वतीने करण्यात आली आहे. निवेदन देतांना फाऊंडेशनचे अध्यक्ष सुशिल भिमजीयाणी, दलितमित्र पुरस्कारप्राप्त राजु धोंगडे, दिलीप बरेटीया, रितेश देशमुख, पवन राऊत, सौरभ गंगावणे, नितीन शिवलकर, राम धनगर, रोहीदास धनगर आदींची उपस्थिती होती.
दरम्यान लवकरच हा प्रश्न निकाली काढू असे आश्वासन यावेळी पालकमंत्री संजय राठोड यांनी निवेदनकर्त्यांना दिले.
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment