BREAKING NEWS

Monday, May 1, 2017

जिल्ह्याला समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विकास प्रक्रियेत सहभागी व्हावे - जिल्हाधिकारी

• राज्याचा 57 वा स्थापना दिवस थाटात
• जलयुक्त शिवारच्या माध्यमातून 1 हजार 528 कामे पूर्ण 
• जिल्ह्यात 4 लक्ष 4 हजार 912 मृद आरोग्य पत्रिकांचे वितरण
• उन्नत शेती-समृद्ध शेतकरी अभियानातंर्गत कृषि यांत्रिकीकरणासाठी मोहिम

बुलडाणा-

 राज्य शासन विविध विभाग व अनेक योजनांच्या माध्यमातून जनतेचे कल्याण साधण्याचे काम करीत असते. यामध्ये जनतेच्या दैनंदिन आयुष्याशी निगडीत घटकांचादेखील सहभाग असतो. शासन राबवित असलेल्या योजनांमध्ये लोकसहभागही तितकाच महत्वाचा असतो. जिल्ह्याला या योजनांच्या माध्यमातून समृद्ध करण्यासाठी सर्वांनी विक्रास प्रक्रियेत सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार यांनी आज केले. 
महाराष्ट्र राज्याचा 57 वा वर्धापन दिनाचा मुख्य शासकीय सोहळा पोलीस कवायत मैदानावर आयोजित करण्यात आला होता. ध्वजारोहणानंतर जिल्ह्याला संबोधित करताना जिल्हाधिकारी बोलत होते. याप्रसंगी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती उमाताई तायडे, माजी आमदार विजयराज शिंदे, नगराध्यक्षा श्रीमती नजमुन्नीसा मो. सज्जाद, जिल्हा पोलीस अधिक्षक शशीकुमार मीना, जि.प मुख्य कार्यकारी अधिकारी षष्मुखराजन, अप्पर जिल्हाधिकारी शिवानंद टाकसाळे आदींची उपस्थिती होती. 
जिल्ह्यात उद्भवत असलेल्या पाणीटंचाईवर यशस्वीरित्या मात करण्यात येत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, सध्या तीव्र उन्हाळ्यामुळे जिल्ह्यात पाणीटंचाईची दाहकता सर्वदूर जाणवत आहे. अशा परिस्थितीत प्रशासनाने नागरिकांना मुबलक व पिण्याचे शुद्ध पाणी पुरविण्याचे ध्येय डोळ्यासमोर ठेवले आहे. पाणीटंचाईचे संकट दूर करण्यासाठी प्रशासनाने विविध उपाययोजना करून पाणीटंचाईवर मात करण्याचे यशस्वी नियोजन केले आहे.गत खरीप हंगामात तूरीचे प्रचंड उत्पादन झाले. तूरीला खाजगी व्यापाऱ्यांकडून किमान आधारभूत किंमतीपेक्षा कमी मिळत असलेला दर बघता बळीराजाचे नुकसान होऊ नये, म्हणून शासनाने नाफेडमार्फत तूरीची शासकीय खरेदी केली. नुकतेच राज्य शासनाने 22 एप्रिल पर्यंत नोंद झालेल्या संपूर्ण तुरीची खरेदी करावयाचा निर्णय घेतला असून खरेदीला सुरूवातही झाली आहे. 
ते पुढे म्हणाले, या खरीप हंगापासून राज्यभर ‘उन्नत शेती समृद्ध शेतकरी’ अभियान राबविण्यात येत आहे. अभियानाच्या माध्यमातून तालुका हा कृषि विकासाचा घटक निश्चित करण्यात आला असून कृषि यांत्रिकीकरणाची विशेष मोहिम राबविण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना आपल्या शेत जमिनीचे आरोग्य समजून त्याप्रमाणे पीक घेता यावे, यासाठी मृद आरोग्य पत्रिका वितरण अभियान सुरू आहे. जिल्ह्यात 2016-17 मध्ये 60 हजार 875 मातीच्या नमुन्यांची तपासणी करण्यात आली असून 4 लक्ष 4 हजार 912 आरोग्य पत्रिकांचे वितरण करण्यात आले आहे. 
खरीप हंगामात 7.48 लक्ष हेक्टर क्षेत्रावर पेरणीचे नियोजन असून त्यामध्ये सोयाबीन व कापूस पिकांचे क्षेत्र जास्त आहे. जिल्ह्यासाठी सोयाबीनच्या 1.15 लक्ष क्विंटल व कापसाच्या 8.5 लक्ष बियाणे पाकिटांचे नियोजन करण्यात आले आहे. खरीप हंगामात प्रत्येक शेतकऱ्याला कर्ज मिळण्यासाठी गतवर्षीपेक्षा जिल्ह्याचे कृषि कर्जाचे उद्दिष्ट 93 कोटी रूपयांनी वाढवून 1458 कोटी रूपये निश्चित करण्यात आले आहे. शेतकरी बांधवांनी संबंधित बँक शाखेत जावून नवीन कर्जासाठी संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी याप्रसंगी केले.
भूजल पातळी जलयुक्त शिवार अभियान यशस्वी ठरत असल्याचे सांगत जिल्हाधिकारी म्हणाले, भूजल पातळी वाढवून मोठ्या प्रमाणावर संरक्षित सिंचन उपलब्ध करून देण्यासाठी जिल्ह्यात महत्त्वाकांक्षी जलयुक्त शिवार अभियान राबविले जात आहे. गतवर्षी निवडलेल्या 245 गावांमध्ये 1 हजार 528 कामे पूर्ण करण्यात आली आहे. या योजनेच्या माध्यमातून करण्यात आलेल्या विविध उपचारांमुळे 1292 टीसीएम पाणीसाठा निर्माण झाला. तसेच 1292 हेक्टर क्षेत्रावर संरक्षित सिंचनाची सोय उपलब्ध झाली आहे. राज्यात शेतकऱ्यांना सुक्ष्म सिंचन संच खरेदी करण्यासाठी ई-ठिबक प्रणाली सुरू करण्यात आली आहे. शेतकऱ्यांनी या ऑनलाईन प्रणालीचा उपयोग करून सुक्ष्म सिंचन संच खरेदी करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी यांनी केले.
ते पुढे म्हणाले, सौर उर्जेवर आधारीत 339 कृषि पंप जिल्ह्यात कार्यान्वीत झाले आहे. हे पंप वापरून शेतकरी सिंचन करीत आहे. त्याचप्रमाणे कृषि पंपासाठी सन 2016-17 मध्ये जिल्ह्यात 7 हजार 499 शेतकऱ्यांना जोडण्या देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यात 12 नवीन 33 के.व्ही क्षमतेची उपकेंद्र निर्माण करण्यात आली असून 344 किलोमीटर लघु दाब वाहिनीचे काम पूर्ण करण्यात आले आहे. पंतप्रधान आवास योजनेतंर्गत प्रत्येक बेघराला हक्काचा निवारा मिळवून देण्यासाठी प्रशासन कार्यरत आहे. जिल्ह्यात ग्रामीण भागात या योजनेतून 4 हजार 60 घरकूलांचे कामे सूरू असून 2 हजार 843 घरकूलांचे बांधकाम पुर्ण झाले आहे. मुलींचे घटते प्रमाण अत्यंत चिंताजनक असून स्त्री भ्रृण हत्या रोखण्यासाठी सर्वांनी पुढे येण्याची आवश्यकता आहे. केवळ सरकारी उपाययोजनांच्या माध्यमातून हे काम होणार नसून सामाजिक कार्यकर्ते, सामाजिक संस्थांनी सामाजिक भावनेने याबाबत काम करणे गरजेचे आहे. बेटी बचाओ बेटी पढाओ या अभियानातून मुलींचा जन्मदर वाढविण्यासाठी जाणीव-जागृती करण्यात येत आहे.
स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी हिरीरीने सहभाग घेण्याचे आवाहन करीत जिल्हाधिकारी म्हणाले, स्वच्छ भारत मिशन जिल्ह्यात प्रभावीपणे राबविण्यात येत आहे. वैयक्तिक शौचालयांच्या निर्मितीमध्येही जिल्ह्याने भरारी घेतली आहे. जिल्ह्यात 3.70 लक्ष कुटूंबांपैकी 2.26 लक्ष कुटूंबाकडे शौचालय आहेत. प्रत्येकाने व्यक्तीगत स्वच्छता पाळून स्वच्छ भारत अभियानात सर्वांनी सहभागी व्हावे.
कार्यक्रमाचे संचलन नरेंद्र लांजेवार व श्रीमती अंजली परांजपे यांनी केले. कार्यक्रमाला स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक, समाज भूषण पुरस्कार प्राप्त, विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार, विद्यार्थी व नागरिक यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान जिल्हाधिकारी यांनी परेड निरीक्षण केले. कमांडर आर.आर वैजने यांनी जिल्हाधिकारी यांना सलामी दिली. तसेच महिला पोलीस दल, होमगार्ड पुरूष व महिला दल, बँण्डपथक, श्वानपथक, रूग्णवाहिका व नगर पालिका अग्नीशमन वाहन यांनी परेडमध्ये सहभाग घेतला.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.