हिंगोली -
विद्युत जोडणीसाठी अर्ज केलेल्या शेतकऱ्यांना महावितरणने तात्काळ वीज जोडणी द्यावी असे निर्देश सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, भुकंप व पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास व वक्फ राज्यमंत्री तथा पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयेजित जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्षा श्रीमती शिवराणीताई नारवडे, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, डॉ. संतोष टारफे, रामराव वडकुते, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी एच. पी. तुम्मोड, नियोजन समितीचे अशासकीय सदस्य डॉ. अशोक बेलखोडे यांची उपस्थिती होती.
पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले की, शेतकऱ्यांच्या प्रश्नाबाबत शासन अतिशय गंभीर असून, शेतकऱ्यांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचे काम संबंधीत विभागाने करावे. शासनाने मंजूर केलेल्या 10 हजार सिंचन विहिरी आणि शेततळ्यासाठी शेतकऱ्यांचे प्रस्ताव प्राप्त होताच त्यावर तात्काळ कार्यवाही करुन सदर प्रस्ताव मंजूर करुन कामे सुरु करावीत. तसेच मागणी प्राप्त होताच तात्काळ टँकर सुरु करण्याबाबत परवानगी देण्यात यावी. तसेच मागील वर्षी टंचाईच्या कालावधीत अधिग्रहण केलेल्या विहिरी आणि टँकरचे जे देयके देणे आहेत ती संबंधीतांना लवकरात-लवकर अदा करावीत. पावसाळ्यात माळीण सारखी दूर्घटना होऊन नये याकरीता जिल्ह्यातील डोंगर पायथ्याशी किंवा टेकडीशेजारील धोकादायक गावांची माहिती घेवून, त्याठिकाणी दूर्घटना होऊ नये यासाठी योग्य उपाययोजना करण्याच्या सूचनाही कांबळे यांनी संबंधीतांना यावेळी दिल्या.
जिल्हा वार्षिक योजना (सर्वसाधारण) सन 2016-17 करिता 10809 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी माहे मार्च 2017 अखेर 10809 लक्ष (100 टक्के) निधी खर्च झाला आहे.
जिल्हा वार्षिक योजना (अनुसूचित जाती उपयोजना) सन 2016-17 करिता 4492 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मार्च 2017 अखेर 3914.07 लक्ष (99.73 टक्के) निधी खर्च झाला आहे.
आदिवासी उपयोजना (ओटीएसपी) सन 2016-17 करिता 2809.56 लक्ष नियतव्यय मंजूर करण्यात आला होता. त्यापैकी मार्च 2017 अखेर 2305.51 लक्ष (98.31 टक्के) निधी खर्च झाला आहे. याप्रमाणे जिल्हा वार्षिक योजनेतंर्गत एकूण 18110.56 मंजूर नियतव्ययापैकी 17028.66 (99.70) एवढा नियतव्यय खर्च झाला.
सन 2017-2018 करीता मंजूर नियतव्यय नियमानुसार व विहित मुदतीत खर्च करण्यासाठी सर्व विभागप्रमुखांनी योग्य नियोजन करुन कामांना गती द्यावी अशा सूचना हि पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी दिल्या.
यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी यांनी संचलन केले. यावेळी विविध विभागातील विभाग प्रमुखांची उपस्थिती होती.
Monday, May 1, 2017
महावितरण ने शेतकऱ्यांना तात्काळ वीज जोडणी द्यावी - पालकमंत्री दिलीप कांबळे
Posted by vidarbha on 5:41:00 PM in हिंगोली | Comments : 0
Subscribe to:
Post Comments
(
Atom
)
Post a Comment