BREAKING NEWS

Monday, May 1, 2017

गावभेट योजनेमुळे सामान्य माणसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी :- पालकमंत्री डॉ.श्री दीपक सावंत


• मुख्य ध्वजारोहण पालकमंत्र्यांच्या हस्ते



भंडारा :-
  शासकीय योजनांचा लाभ सामान्य माणसाला घरपोच मिळावा या उद्देश्याने जिल्हा प्रशासनाने विविध विभागाच्या योजना, दाखले व प्रमाणपत्र एकाच ठिकाणी मिळावे यासाठी गावभेट कार्यक्रम संकल्पना राबविण्याचे ठरविले आहे. सामान्य माणसाला या गावभेट कार्यक्रमातून खुप मोठा दिलासा मिळेल, या सोबतच प्रशासन व नागरिक यांच्यातील सुसंवाद वाढून सामान्य मानसाला विकासाच्या मुख्य प्रवाहात येण्याची संधी प्राप्त होईल. या योजनेतून नागरिकांची प्रलंबित कामे मोठया प्रमाणात होतील, असा विश्वास पालकमंत्री डॉ. दीपक सावंत यांनी व्यक्त केला. 1 मे महाराष्ट्र दिनाच्या मुख्य समारोहात ते बोलत होते.  पालकमंत्री यांच्याहस्ते ध्वजारोहण झाल्यानंतर त्यांनी जिल्हावासियांना संबोधित केले.
पोलीस मुख्यालय कवायत मैदान येथे आयोजित ध्वजारोहण सभारंभास आमदार ॲड. रामचंद्र अवसरे, जिल्हाधिकारी सुहास दिवसे, जिल्हा पोलीस अधीक्षक विनीता साहू, मुख्य कार्यकारी अधिकारी शरद अहिरे, अप्पर जिल्हाधिकारी डॉ. प्रदीपकुमार डांगे, उपविभागीय अधिकारी पृथ्वीराज बी.पी., अप्पर पोलीस अधीक्षक रश्मी नांदेडकर, निवासी उपजिल्हाधिकारी  मिश्रा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रवी धकाते उपस्थित होते.
महाराष्ट्राला वारंवार दुष्काळाचा सामना करावा लागू नये म्हणून राज्य शासनाने जलयुक्त शिवार अभियान राबविण्यास सुरुवात केली.  जलयुक्त शिवार योजनेचे दृष्य परिणाम  दिसायला सुरुवात झाली आहे. भंडारा जिल्हयात जलयुक्त शिवार योजनेत 2015-16 मध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या 86 गावापैकी 86 गावे शंभर टक्के वॉटर न्युट्रल झाली असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
आपला जिल्हा धानाचा जिल्हा म्हणून ओळखला जातो. येथील मुख्य पिक धान असून यावर्षी किमान आधारभूत धान खरेदी योजनेंतर्गत जिल्हयात 9 लाख 95 हजार क्विंटल धानाची खरेदी झाली आहे. त्यापैकी 8 लाख 20 हजार क्विंटल धानाची भरडई होऊन 54 हजार मेट्रिक टन तांदुळाची शासनाकडून उचल करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.
शेतकऱ्यांचे जीवन सुखकर होण्यासाठी  शासनाने अनेक योजना नव्याने सुरु केल्या आहेत. यामध्ये  प्रधानमंत्री पीक विमा योजनेचा उल्लेख प्रामुख्याने करावा लागेल. या योजनेंतर्गत शेतकऱ्यांना अतिशय कमी विमा हप्ता भरावा लागणार असून खात्रीशिरपणे नुकसान भरपाई मिळणार आहे. त्यामुळे  सर्व शेतकऱ्यांनी पिक विमा  काढावा, असे आवाहन त्यांनी केले.
गरीब व्यक्तीला हमखास रोजगार मिळवून देणारी योजना म्हणजे मनरेगा आहे. ग्रामीण भागात रोजगार उपलब्ध करुन देण्यासाठी  मनरेगा अंतर्गत 2 लाख 65 हजार मजूरांना काम उपलब्ध करुन देण्यात जिल्हा प्रशासन यशस्वी झाले आहे. यासाठी मजूरांना  114  कोटी रुपये वेतन  मिळाले आहे. राज्यामध्ये नोंदणीकृत मजूरांचे आधारकार्ड तसेच सक्रीय मजूरांचे आधारकार्ड नरेगाच्या संकेतस्थळावर नोंदणी करण्यात भंडारा जिल्हा राज्यात प्रथम आहे, या उपलब्धीबद्दल डॉ. सावंत यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले.
स्वच्छ महाराष्ट्र योजनेत 2016-17 मध्ये संपूर्ण भंडारा जिल्हा हागणदारीमुक्त करण्याचे उद्दिष्ट शासनाने दिले होते. संपूर्ण जिल्हा 31 मार्च 2017 पर्यंत हागणदारी मुक्त  करण्याचे उद्दिष्ट जिल्हयाने पूर्ण केले असून भंडारा जिल्हा हागणदारी मुक्त झाल्याचे आज घोषित करत आहे.  पंचायत सशक्तीकरण अभियानांतर्गत गौरव ग्राम सभा करीता अत्यंत उत्कृष्ट कार्य केल्याबद्दल लाखनी तालुक्यातील शिवनी  मोगरा ग्राम पंचायत व भंडारा तालुक्यातील कवडसी ग्राम पंचायतीला केंद्र सरकारचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला आहे. या ग्रामपंचायत कडून जिल्हयातील अन्य ग्रामपंचायतीनी या कार्याचा आदर्श घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.                                                                                                                                   
आरोग्य विभागाच्या वतीने जन आरोग्याच्या विविध योजना राबविण्यात येतात. नागरिकांच्या आरोग्याची काळजी घेण्याचे काम आरोग्य विभाग सातत्याने करीत असतो. याचाच एक भाग म्हणून राज्यात महात्मा ज्योतिबा फुले जन आरोग्य योजना नव्याने  राबविण्यात येत आहे. या योजनेत जिल्हयामध्ये मागील तीन वर्षामध्ये 5 हजार 398 रुग्णांनी योजनेचा लाभ घेतला असून त्यावर शासनामार्फत 16 कोटी 16 लाख 66 हजार  रुपये मंजूर केले.  यासोबतच आरोग्य विभागाच्या अन्य योजनांची जिल्हयात यशस्वी अंमलबजावणी करण्यात येत असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
डॉ. सावंत म्हणाले की, शिक्षण क्षेत्रात झपाटयाने क्रांती होत असून तंत्रज्ञानाचा मोठया प्रमाणात वापर होत आहे. या प्रवाहात आपल्या जिल्हयातील विद्यार्थ्यांनी प्राविण्य मिळवावे यासाठी जिल्हयातील जिल्हा परिषदेच्या सर्व शाळा डिजीटल करण्याचा निर्धार आहे. सद्यस्थितीत 420 शाळा डिजीटल झाल्या असून पालक सहभागातून डिजीटल शाळांची लोकचळवळ उभी करण्यावर भर देण्यात येणार आहे. ही बाब शैक्षणिक भविष्याच्या दृष्टीने महत्वाची असणार आहे.
      जेष्ठ नागरिक, महिला, विद्यार्थी-विद्यार्थीनी आणि अपंग यांना पोलीस ठाण्यात तक्रार करणे सोईचे व्हावे या दृष्टीकोणातून भंडारा जिल्हा पोलीस दलातर्फे मोबाईल पोलीस स्टेशन ही योजना जानेवारी 2017 पासून सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत राबविण्यात येत आहे. आतापर्यंत 175 गावात पोलीस ठाणे आपल्या दारी ही संकल्पना यशस्वीरित्या राबविण्यात आली आहे. या योजनेत जनतेच्या तक्रारीची नोंद घेऊन निराकरण करण्यात येते. भंडारा जिल्हयात ही संकल्पना यशस्वी झाल्याचे पाहून मार्च 2017 पासून मध्यप्रदेश, गुजरात, बडोदा व चंदीगड राज्यातील सरकारने आपका थाना आपके गाव ही योजना राबविणे सुरु केले आहे. हा उपक्रम खरोखरच स्तुत्य व अनुकरणीय असून इतर जिल्हयाने आदर्श घ्यावा असे त्यांनी सांगितले.
यावेळी पोलीस पथक (महिला व पुरुष), गृहरक्षक दल, बँड पथक, पोलीस दामिनी पथक यांनी पथसंचलन करुन पालकमंत्र्यांना मानवंदना दिली. पोलीस विभागातील कर्मचाऱ्यांनी शिस्तबध्द व कर्तव्यदक्ष तसेच उत्तम सेवा अभिलेख ठेवल्याबदल पालकमंत्र्यांच्या हस्ते त्यांचा सन्मान चिन्ह व प्रशस्तीपत्र देवून सत्कार करण्यात आला.  तसेच आदर्श तलाठी पुरस्कार प्रदान करण्यात आले.
ग्रामपंचायत बेला, शिवनी मोगरा, पालडोंगरी, लवारी गुंजेपार व उमरी चौरास यांचेसह इतर ग्रामपंचायतला उत्कृष्ट कार्याबद्दल पालकमंत्र्याच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन स्मिता गालफाडे आणि मुकुंद ठवकर यांनी केले. यावेळी  स्वातंत्र्य सैनिक, सर्व विभागाचे अधिकारी, कर्मचारी, पत्रकार आणि नागरिक  उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.