BREAKING NEWS

Wednesday, June 7, 2017

वेद आणि मंत्रघोषात तिथी प्रमाणे शिवराज्याभिषेक उत्साहात साजरा

अलिबाग -(जिमाका)



वेद आणि मंत्रघोषात विधीवत पूजाविधीने किल्ले रायगडावर आज जेष्ठ शुद्ध त्रयोदशी या हिंदू तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिनोत्सव सेवा समिती कडून शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी पर्यावरणमंत्री रामदास कदम आणि जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, महाडचे आ.भरतशेठ गोगावले, आ.रूपेश म्हात्रे, आ.अमित घोडा आदि मान्यवर उपस्थित होते.
एक दिवसाच्या फरकाने साजरा होत असलेल्या तिथीप्रमाणेच्या शिवराज्याभिषेक दिनोत्सवाला देखील संपूर्ण राज्यातून शिवभक्तांनी मोठी हजेरी लावली होती. धर्मशाळा ते राजदरबार अशी छ. शिवाजी महाराजांच्या प्रतिमेची मिरवणूक काढून महाराजांची पालखी राजदरबारात दाखल होताच प्रत्यक्ष शिवराज्याभिषेक कार्यक्रमाला सुरूवात झाली. गडावर विविध धार्मिक विधी, पुजापाठ, वेद मंत्रघोषाने मंगलमय वातावरण निर्माण झाले होते. या मंगलमय वातावरणात शिवरायांच्या प्रतिमेचे विधीवत पुजन रोहित पवार यांच्या हस्ते सपत्नीक करून छत्रपती शिवरायांच्या प्रतिमेवर सप्तसिंधुंच्या पाण्याने जलाभिषेक करण्यात आला. मंत्रीद्वय शिवाजी महाराजांच्या पुतळयास पुष्पहार अर्पण करून नतमस्तक झाले.
मंगलमय वातावरण
मंगलमय अशा वातावरणात पारंपारीक वेशभूषेत अनेक शिवभक्त गडावर हजर होते. होळीचा माळ आणि नगारखाना या परीसरात ढोल ताशांचा गजर आणि मर्दानी खेळ सादर करणारे उत्साही तरूण दिसून येत होते. भगव्या पताका जिकडे तिकडे फडकताना दिसत होत्या. सहा तारखेला सायंकाळी गडदेवता शिरकाई मातेचे आणि श्रीजगदीश्वराची पूजा करण्यात आली तर शिवरायांच्या प्रतिमेचे तुलादान करण्यात आले. रात्री शाहीरी, तसेच जागरणाचे कार्यक्रम आयोजीत केले होते.
आपल्या भाषणात राज्यमंत्री शिवतारे यांनी चंद्र सुर्याशी संलग्नीत हिंदू कालदर्शीकेला आपण मानणारे असल्या कारणाने तिथीनुसारच शिवरायांची जयंती देखील साजरी झाली पाहीजे असे मत व्यक्त केले. शिवरायांच्या प्रती प्रत्येकास आदर आहे. त्यामुळे या कार्यक्रमास प्रत्येक शिवभक्तांनी रायगडावर आले पाहिजे असे ही ते म्हणाले.
तर आपल्या प्रास्ताविकातून आमदार भरतशेठ गोगावले यांनी देवधर्माचे रक्षण छत्रपती शिवरायांनी केले यामुळे प्रतिवर्षी तुम्ही महालक्ष्मी, शिर्डी, सिद्धीविनायक, या देवालयात जा मात्र एकदातरी रायगडावर या असे आवाहन केले.
या कार्यक्रमादरम्यान महाराजांच्या आरमारातील सरदारांच्या वंशजाच्या जवळ असलेल्या शस्त्रांची पूजा देखील यावेळी करण्यात आली. यावेळी मालुसरे, जेधे, कंक, राजे महाडीक आदी घराण्यांचे वंशज उपस्थित होते. शिवाजी पार्क ते रायगड हे अंतर धावत आलेल्या भूषण होडगे याचा सत्कार तसेच मी मावळा शिवबाचा या ध्वनीफितीचे प्रकाशन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी जिल्हा परीषदेचे विरोधी पक्ष नेते सुरेंद्र म्हात्रे, जिल्हा परीषदेच्या सदस्या मिताली खेडेकर, जिल्हा परीषदेचे माजी उपाध्यक्ष बाळ राउळ, चंद्रकांत कळंबे, समितीचे अध्यक्ष सुनिल पवार आदी मान्यवर उपस्थित होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.