पोलीसांचा तगडा बंदोबस्त
चांदुर रेल्वे - (शहेजाद खान)
शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी या मुख्य मागणीसाठी शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने बुधवारी दुपारी आंदोलन करण्यात आले. यामध्ये चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला दुधाभिषेक व हारार्पण करून तहसिलसमोर भाजीपाला फेकण्यात आला तसेच तहसिलदारांमार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन सुध्दा पाठविण्यात आले.
शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी राज्यभर १ जुनपासुन राज्यभर आंदोलन सुरू आहे. याच पार्श्वभुमीवर सोमवारी चांदुर रेल्वे शहरसुध्दा १००% कडकडीत बंद ठेवण्यात आले होते. यानंतर आता बुधवारी शहरात प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. या आंदोलनामध्ये दुध रस्त्यावर न फेकता आझाद चौकातील चंद्रशेखर आझाद यांच्या पुतळ्याला दुधाभिषेक करून हारार्पण करण्यात आले. यानंतर तहसिल कार्यालयासमोर जाऊन भाजीपाला रस्त्यावर फेकुन सरकारविरोधी आपला रोष व्यक्त करण्यात आला. तसेच तहसिलदारांमार्फत महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, स्वामीनाथन आयोग लागु करण्यात यावा, विम्याचे पैसे तातडीने द्यावे, शेतकऱ्यांना तुरीच्या पैशांचा चेक त्वरीत देण्यात यावा, शेतकऱ्यांची शिल्लक राहिलेली तुर पुर्णत: घेण्यात यावी, स्वामीनाथन आयोगाच्या शिफारसीनुसार दरवर्षी सर्व शेतकऱ्यांच्या पिकांचे हमीभाव जाहीर करण्यात यावे आदी मागण्यांचे निवेदन मुख्यमंत्र्यांना पाठविण्यात आले.
यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाप्रमुख सौरभ इंगळे, प्रहार शेतकरी संघटना तालुकाध्यक्ष प्रितम खरबडे, प्रहार विद्यार्थी संघटना तालुकाध्यक्ष प्रतिक खेरडे, शहर अध्यक्ष प्रदिप नाईक, विक्रम तायडे, अक्षय बाबर, सुरज चव्हाण, शुभम वाहाणे, राहुल मेटकर, रोशन जेवडे, नितीन कोहरे यांसह अनेक कार्यकर्ते- शेतकरी उपस्थित होते. आंदोलना दरम्यान तगडा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.
Post a Comment