रिसोड - प्रतिनिधि
महेन्द्र महाजन जैन
राजर्षि शाहू महाराजांनी कृषी, शिक्षण व सामाजिक क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी कृतीशील योगदान दिले. त्यांचे विचार समाजाच्या विकासासाठी उपयुक्त असून हे विचार आचरणात आणण्याचा प्रत्येकाने प्रयत्न करावा, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष हर्षदा देशमुख यांनी केले. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनमध्ये आयोजित सामाजिक न्याय दिन सोहळा व मादक पदार्थ सेवन विरोधी दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या.
यावेळी जिल्हा परिषदेच्या समाज कल्याण समितीच्या सभापती पानुताई जाधव, समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार, डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार प्राप्त सु. ना. खंदारे, तेजराव वानखेडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी वसंत गव्हाळे आदी मान्यवर उपस्थित होते.
शिक्षण हे समाज परिवर्तनाचे महत्वाचे साधन आहे. त्यामुळे समाजाचा विकास घडवून आणण्यासाठी समाजातील प्रत्येक घटकापर्यंत शिक्षण पोहोचणे आवश्यक असल्याचे राजर्षि शाहू महाराज यांनी ओळखले होते. त्यामुळे त्यांनी शक्तीचे शिक्षण देणे सुरु केले. तसेच प्रत्येक जाती-धर्मातील मुलांना शिक्षण मिळावे यासाठी शाळा, वसतिगृहे सुरु केली. तसेच शेतकऱ्यांच्या विकासासाठीही त्यांनी प्रयत्न केले. सिंचनासाठी त्यांनी उभारलेल्या राधानगरी धरणाचा आजही तेथील शेतकऱ्यांना फायदा होत आहे. समाजातील विषमता दूर करण्यासाठी मागासवर्गीयांना आरक्षण लागू करणे, त्यांना नोकरीची संधी देण्याचे काम राजर्षि शाहू महाजारांनी केले. सामाजिक समता निर्माण करण्यासाठी त्यांनी केलेले कार्य आजही प्रेरणादायी असल्याचे जिल्हा परिषद अध्यक्ष सौ. देशमुख यांनी सांगितले.
याप्रसंगी सु. ना. खंदारे, तेजराव खंदारे, वसंत गव्हाळे, धोंडूजा इंगोले यांनी आपले मनोगत व्यक्त केले. तसेच व्यसनमुक्ती तज्ज्ञ पी. एस. खंदारे यांनी व्यसनमुक्ती विषयी मार्गदर्शन केले. सामाजिक समतेचा संदेश देण्यासाठी यावेळी सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजनही करण्यात आले होते. तसेच विद्यार्थ्यांसाठी वक्तृत्त्व व निबंध स्पर्धा घेण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समाज कल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त माया केदार यांनी केले. आभार प्रदर्शन विशेष निरीक्षक ए. व्ही. मुसळे यांनी केले.
विविध योजनांच्या लाभार्थ्यांना धनादेश वाटप
Post a Comment