BREAKING NEWS

Wednesday, June 28, 2017

चांदुर रेल्वे शहरात ‘ईद-उल-फित्र’ उत्साहात साजरी


चांदुर रेल्वे - (शहेजाद  खान)
मुस्लिम बांधवांचा रमजान ईद हा सण चांदुर रेल्वे शहरात मोठ्या उत्साही वातावरणात साजरा करण्यात आला. यावेळी तालुक्यातील हजारोच्या संख्येने आलेल्या मुस्लीम बांधवांनी ईदगाह मैदानावर सामूहिक नमाज पठण करत अल्लाला साकडे घातले. यावेळी काही अनुचित प्रकार घडू नये यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आलेला होता.
   महिनाभर रमजानचे रोजे ठेवल्यानंतर सोमवारी  (ता. 26) मुस्लिम बांधवांनी "ईद-उल-फित्र‘ उत्साहात साजरी केली. मुस्लिम धर्मातील अनेक उत्सवांमधील महत्त्वाचा उत्सव म्हणजे ‘रमजान ईद’. आपापसांतील हेवेदावे व मत्सर विसरून सर्वांनी एकत्र यावे, असा संदेश या सणाने दिला. रमजान ईद म्हणजे जणू मानवीमनाचे दुवे साधण्याबरोबरच आत्मशुद्धीची शिकवण देणारा सण. ईदच्या नमाजासाठी ईदगाहमध्ये जाण्यापूर्वी दानधर्म करण्याचा संदेश मुस्लिम धर्मात देण्यात आला आहे. त्यालाच ‘सदका-एक-फित्र’ म्हणतात. ईद साजरी करत असताना समाजातील दीनदुबळ्यांबाबत जाणीव असावी, हाच त्यामागचा उद्देश. याच अनुशंगाने अनेक शहरवासीयांनी गरीब व गरजूंना आर्थिक स्वरूपात मदत करूनच ईदच्या नमाजासाठी सोमवारी ईदगाहमध्ये प्रवेश केला. शहरातील ईदगाह मैदानावर सकाळी ९.३० वाजता मुख्य नमाज अदा करण्यासाठी शहर आणि परिसरातील हजारो मुस्लिम बांधवांनी गर्दी केली होती. नमाजनंतर पाऊस आणि शांततेसाठी दुआ करून एकमेकांची गळाभेट घेतली अन् ईदच्या शुभेच्छा देण्यात आल्या. ईदनिमित्त (सोमवारी) सकाळपासून मुस्लिम बांधव नवीन कपडे घालून नमाज अदा करण्यासाठी ईदगाह मैदानाकडे जात होते. तेथे या सर्वांनी एकत्रित येऊन "ईद-उल-फित्र‘ साजरी केली. दरम्यान, कारी शहेजाद यांनी बयान (भाषण) करून आजची परिस्थिती, धार्मिक विषयावर विवेचन केले. त्यानंतर कारी शहेजाद यांच्या पाठीमागे सर्वांनी "ईद-उल-फित्र‘ची नमाज अदा केली. नमाज आणि खुदबा प्रत्येकी दोन भागांत असतात. खुदबा झाल्यानंतर अल्लाहजवळ पाऊस आणि शांततेसाठी दुआ करण्यात आली. यानंतर सर्वांनी एकमेकांची गळाभेट घेऊन 'ईद मुबारक' म्हणत शुभेच्छा देण्यात आल्या. यावेळी ईदगाहवर महेमुद हुसेन, हाफीज शौकत अली, आलीम अक्रम लाखानी, हाजी फारूख लाखानी, हाजी इक्बाल लाखानी, शेख हसनभाई, हाजी रफीक जानवानी, सैय्यद जाकीरभाई, हाजी सलीम जानवानी, जहीर काझी, अनिस सौदागर, अफरोज अहेमद आदींसह हजारो मुस्लीम बांधव उपस्थित होते.
ईदगाह मैदान परीसरात, जुना मोटार स्टैंड येथे मुस्लिम बांधवांना रमजान ईदच्या शुभेच्छा देण्यासाठी सर्वच क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते. ईदच्या दिवशी प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरी बनवला जाणारा गोड पदार्थ म्हणजे शीरखुर्मा. दूध, शेवया आणि विविध प्रकारच्या सुक्यामेव्याचे मिश्रण असलेला शीरखुर्मा ईदचा आनंद द्विगुणित करतो. शीरखुर्म्याची लज्जत चाखण्याकरिता सकाळपासून रात्री उशिरापर्यंत प्रत्येक मुस्लिम बांधवांच्या घरात लगबग सुरू होती.


 ईद मुबारकचा सोशल मिडीयावर वर्षाव

आजच्या धकाधकीच्या जिवनात जास्तीत जास्त लोक सोशल मिडीयाशी जुडलेले आहे. त्यामुळे रविवारी चंद्र दर्शनापासुन ते सोमवारी ईदच्या दिनापर्यंत ईद शुभेच्छा देणारे संदेश फेसबुक, व्हॉट्सअॅप अशा सोशल मीडियावर दिसू लागले होते. 'ईद मुबारक'च्या विविध पोस्टर, 'एसएमएस'चा वर्षाव सोशल मीडियावर दिसून येत आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.