मुंबई-:
वृत्तपत्रात छापून आलेल्या वृत्ताच्या समाजमनावर होणाऱ्या परिणामांप्रती संवेदनशीलता दाखविण्याची मानसिकता पत्रकारितेतील सर्वांनी प्रस्थापित करण्याची आवश्यकता आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे देण्यात येणाऱ्या ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कारानिमित्त आयोजित कार्यक्रमाप्रसंगी ते बोलत होते. या कार्यक्रमाला मुंबई मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष देवदास मटाले, कार्यवाहक प्रमोद तेंडूलकर, संयुक्त कार्यवाहक रविंद्र खांडेकर आणि पुढारीचे व्यवस्थापकीय संपादक योगेश जाधव उपस्थित होते.
यावर्षीचा डॉ. ग. गो. जाधव पत्रकारिता पुरस्कार जेष्ठ पत्रकार विजय कुवळेकर यांना देण्यात आला. 40 वर्षांपासून विधायक पत्रकारितेत मोलाचे योगदान देणारे श्री. कुवळेकर हे 29 व्या पुरस्काराचे मानकरी आहेत. यापूर्वी 2012 चा राज्य शासनाचा लोकमान्य टिळक पत्रकारिता जीवनगौरव पुरस्कारही त्यांना प्राप्त झाला आहे.
मुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, लोकशाहीचा चौथा स्तंभ समजला जाणाऱ्या पत्रकारितेने सत्तेवर अंकुश ठेवण्याची भूमिका बजावणे अभिप्रेत आहे, मात्र सत्तेवर अंकुश ठेवणाऱ्यांनी स्वत:वरही नैतिकतेचा अंकुश ठेवणे आवश्यक आहे. माध्यमांच्या झालेल्या विस्तारामुळे आवश्यक ते ज्ञान लोकांपर्यंत पोहचविणे कठीण झाले आहे. आलेली माहिती कोणतीही शहानिशा न करता फॉरवर्ड केली जाते. यामुळे संभ्रमावस्था निर्माण होते. माहिती आणि ज्ञान यातील अंतर वाढत जाते. माध्यमेही संक्रमणातून जात आहेत. या प्रवासाला ठोस अवस्था प्राप्त होणे गरजेचे आहे.
श्री. कुवळेकर यांनी दीपस्तंभासारखे काम केले आहे. त्यांच्या तालमीत अनेक पत्रकार तयार झाले आहेत. परिवर्तनाची चळवळ चालविणारे डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावाने विजय कुवळेकर यांना दिलेला पुरस्कार खऱ्या अर्थाने सार्थ आहे, असे गौरवोद्गार श्री. फडणवीस यांनी काढले.
सत्काराला उत्तर देताना श्री. कुवळेकर यांनी कृतज्ञता व्यक्त केली. ज्यांच्या मार्गदर्शनाखाली पत्रकारितेची सुरुवात केली त्यांच्या नावाचा पुरस्कार प्राप्त होणे आणि राज्याच्या कर्तबगार मुख्यमंत्र्यांच्या हस्ते तो स्वीकारणे माझ्यासाठी अभिमानाची बाब असल्याचे ते म्हणाले. माध्यमांमध्ये स्पर्धा असावी मात्र शत्रुत्व असू नये. पत्रकारांची भूमिका ही व्यापक आणि राष्ट्रहिताची जपणूक करणारी असावी. एक्सक्लुझिव बातमी देण्याच्या जीवघेण्या स्पर्धेमध्ये आपण आपली संवेदनशीलता हरवत आहोत का, हे तपासून बघणे आवश्यक असल्याचे श्री. कुवळेकर यांनी सांगितले.
मुंबई मराठी पत्रकार संघातर्फे 1989 पासून पुरस्कार देण्यात येतात. याच संघातर्फे डॉ. ग. गो. जाधव यांना आचार्य अत्रे पुरस्कार देण्यात आला होता. आता ‘पुढारी’कार पद्मश्री डॉ. ग. गो. जाधव यांच्या नावाने पत्रकारिता पुरस्कार देण्यात येतो. या पुरस्काराचे स्वरुप शाल, श्रीफळ, स्मृतीचिन्ह आणि 50 हजार रुपये असे आहे.
Post a Comment