'सायलेन्स इस नॉट अन ऑप्शन...' (गप्पं बसणं हा काही पर्याय नाही होऊ शकत) या मथळ्याला अधोरेखित करणारा 'ती आणि इतर' हा सिनेमा लवकरच प्रदर्शित होत आहे. हिंदीचे प्रसिद्ध दिग्दर्शक गोविंद निहालाणी दिग्दर्शित ह्या आगामी मराठी चित्रपटात सुबोध भावे आणि सोनाली कुलकर्णी यांची प्रमुख भूमिका आहे. या सिनेमाचा सोशल नेट्वर्किंग साईटवर नुकताच पोस्टर आणि ट्रेलर लॉंच करण्यात आला. ह्या सिनेमाचा ट्रेलर पहिला असता 'ती आणि इतर' या शीर्षकाचा अर्थबोध होतो. एका खोलीत बसलेल्या लोकांना येत असलेला 'ती' चा आवाज, आणि त्या आवाजामुळे प्रत्येकाच्या मनात उठणारे वादळ या ट्रेलरमध्ये दिसून येते. एका अज्ञात स्त्रीवर बेतलेल्या प्रसंगावर, हि माणसे आपापल्यापरीने कसा विचार करतात, हे या ट्रेलरमध्ये दाखवण्यात आले आहे.
या सिनेमात अमृता सुभाष, अविष्कार दारव्हेकर, भूषण प्रधान, प्रिया मराठे सुमन पटेल आणि गणेश यादव हे कलाकार देखील आपल्याला पाहायला मिळणार आहेत. ट्रेलरसोबतच या सिनेमाचा पोस्टर देखील 'स्त्री' विषयक समस्येवर भाष्य करणारा आहे. अर्धसत्य, आक्रोश, तमस, द्रोहकाल यासारखे वास्तववादी विषय आपल्या चित्रपटाद्वारे मांडणारे प्रगल्भ दिग्दर्शक गोविंद निहालाणी या सिनेमाच्या माध्यमातून मराठीत पदार्पण करीत असल्यामुळे, मनाला चटका लावून जाणाऱ्या त्यांच्या समाजभिमुख शैलीचा मराठी प्रेक्षकांना अनुभव घेता येणार आहे. लेखिका मंजुळा पद्मनाभन यांच्या इंग्रजी नाटक 'लाईटस् आऊट' वर आधारित असलेल्या या सिनेमाचे पटकथा-संवाद शांता गोखले यांनी लिहिले आहेत. चित्रपटाची संगीत रचना वसुदा शर्मा यांनी केली आहे. या चित्रपटाचे गीतकार मंदार चोळकर असून प्रदीप प्रभाकर पांचाळ यांनी संकलनाची धुरा सांभाळली आहे. सचिन पिळगावकर यांचे या चित्रपटात विशेष योगदान आहे. हिमांशू ठाकूर प्रस्तुत या चित्रपटाचे निर्माते प्रकाश तिवारी, पुनीत सिंह, दयाल निहालाणी आणि धनंजय सिंह आहेत. येत्या २१ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात हा सिनेमा प्रदर्शित होत आहे.
Post a Comment