प्रवीण गोंगले / चंद्रपूर /---
समाजसेवा ही मोठमोठाले भाषणं देऊन किंवा एखादा मोठा प्रकल्प राबवूनच केल्या जाऊ शकतो हा समज चोरगावच्या या शाळेकडे पाहून खोटा ठरतो. जवळपास एक वर्ष आधी या ठिकाणी फक्त चार भिंती, एक आंगणवाडी सेविका आणि २०-२५ विद्यार्थी होते. फक्त मध्यान्ह भोजन करणे आणि हजेरी लावणे एवढाच काय तो या अंगणवाडीचा उपयोग होता. मात्र एक सुखवस्तू कुटुंबातील, मध्यमवर्गीय महिला डॉक्टर एके दिवशी सरकारी कामासाठी या अंगणवाडीत आली आणि या अंगणवाडीची दशाच बदलली. जवळपास ४००-५०० लोकवस्तीचं चोरगाव हे ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील अतिशय दुर्गम गाव, चंद्रपूर पासून २५-३० किलोमीटर असून सुध्दा मागास. अशा वेळी आपण काही तरी बदल करावा या भावनेतून डॉ. सपना बच्चूवार यांनी अंगणवाडी दत्तक घेतली. स्वतःच्या पदरचे दिढ लाख खर्च करून अंगणवाडीला मॉडर्न लूक दिला. मुलांना बसण्यासाठी नवीन खुर्च्या, खेळणी, नवीन टॉयलेट, पुस्तकं आली. फक्त वस्तू देऊन त्या थांबल्या नाहीत तर त्यांचा योग्य वापर होईल या कडे जातीने लक्ष दिले. डॉक्टर असल्यामुळे मुलांच्या मेंदू चा विकास हा ५ वर्षापर्यंत चांगल्या प्रकारे होतो ही गोष्ट सपना बच्चूवार चांगल्या प्रकारे जाणतात आणि त्यासाठी त्यांनी विज्युअल माध्यमांनी मुलांना जास्तीत जास्त शिकविण्याचा प्रयत्न केलाय. पारंपारिक शिक्षणाऐवजी वर्गाच्या छतावर ग्रहमाला चितारण्यात आली, खेळातून मुळाक्षरांची-अंकांची ओळख झाली, भिंतींवर कविता-गोष्टी साकारल्या. अंगणवाडी हा प्रि-प्रायमरी शिक्षणाचा पाया आहे आणि त्यामुळे या वर विशेष लक्ष द्यायला पाहिजे असं त्यांना वाटतं.
डॉ.सपना बच्चूवार यांच्या पुढाकारामुळे फक्त अंगणवाडीच्या भिंती बोलक्या झाल्या नाही तर या मागास गावातील मुलं देखील संस्कारक्षम झाली आहे. मुलांचा अंगणवाडीत ओढा वाढलाय आणि आता ही पटसंख्या जवळपास ३० झाली आहे. मुलांमध्ये झालेला बदल पालकांना प्रकर्षाने जाणवतोय. समाजसेवेची संधी मिळाल्यावर आपण काही तरी करू यापेक्षा आपल्या कडे जी क्षमता आहे त्याचा वापर करून सपना बच्चूवार यांनी बदलाच्या दिशेने एक पाऊल टाकलं आणि त्यांचं हे पाऊल अनेकांना दिशा दाखवू शकतं. बच्चूवार यांच्या प्रमाणे जर समाजातील काही दानशूर लोकं पुढे आले आणि अशा प्रकारे अंगणवाड्या दत्तक घेतल्या तर शैक्षणिक क्षेत्रात मोठा बदल व्हायला वेळ लागणार नाही
Post a Comment