रंगय्या रेपाकवार / भामरागड /---
भामरागड वनविभागस्थित आलापल्लीअंतर्गत भामरागड वनपरिक्षेत्राच्या जंगल परिसरात लागलेल्या वणव्याचे क्षेत्र मोजण्यासाठी गेलेल्या तीन वनरक्षकांना अज्ञात नक्षल्यांनी जबर मारहाण केल्याची घटना बुधवारी घडली.
सी. जी. गुरनुले, डी. एम. देवकर्ते व आर. डी. हिचामी हे तीन वनरक्षक भामरागड वनपरिक्षेत्राच्या हद्दीतील जंगलाला लागलेल्या वणव्याचे क्षेत्र मोजण्यासाठी गेले होते. दरम्यान त्यांची काही सशस्त्रधारी अज्ञात नक्षल्यांशी भेट झाली. या नक्षल्यांनी सर्वप्रथम वनरक्षकांकडे असलेले शासकीय भ्रमणध्वनी संच आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर तिघांनाही जबर मारहाण करून त्यांच्या मोबाईलमधील डाटा नष्ट करून त्यांना त्यांचे मोबाईल परत केले. त्यानंतर ‘जंगलात कामे करू नका’, असा दमही या वनरक्षकांना त्यांनी दिला. सदर घटनेची माहिती सहायक वनसंरक्षक एम. एस. पचारे यांना मिळताच त्यांनी आपल्या काही कर्मचाºयांसह भामरागड येथे जाऊन मारहाण झालेल्या या तिनही वनरक्षकांना उपवनसंरक्षक यांच्या कार्यालयात भेट घेण्यास आणले. मात्र यावेळी उपवनसंरक्षक कार्यालयात नसल्याने त्यांना घडलेल्या या प्रकाराची भ्रमणध्वनीवर माहिती देण्यात आली. बुधवारी रात्री उशिरा १० वाजेपर्यंत भामरागडचे उपवनसंरक्षक चंद्रशेखर बाला हे सदर वनरक्षक कर्मचाºयांची भेट घेणार असल्याचे समजते. वृत्त लिहिस्तोवर या घटनेची तक्रार पोलिसात दाखल करण्यात आली नव्हती.
सध्या दक्षिण गडचिरोलीमध्ये १ ते ३१ मे पर्यंत विस्थापन विरोधी जनआंदोलन तीव्र करण्याचे आवाहन नक्षल्यांनी काही ठिकाणी लावलेल्या बॅनरमधून केले आहे. अनेक वर्षानंतर नक्षल्यांनी वनकर्मचायांना टार्गेट केल्याने वनकर्मचायांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
Post a Comment