अजय मेश्राम
/
भंडारा /--
येथून अपहरण करण्यात आलेल्या नामदेव बावणे या इसमाचा खून करून त्याचा मृतदेह पवनी तालुक्यातील गोसेखुर्दच्या कालव्यात फेकून देण्यात आला होता. पोलिस तपासाअंती नामदेवचा खून जुन्या वैमनस्यातून केल्याचे पुढे आले आहे. नामदेवच्या खुनाची सुपारी त्याची पत्नी माया मोटघरे हिनेच तीन जणांना दिली होती. यातील मुख्य सूत्रधारासह चार आरोपींना स्थानिक गुन्हे शाखा व साकोली पोलिसांनी अटक केली आहे.
दि. २३ एप्रिल रोजी साकोली येथील पंचशील वॉर्डात राहणारा नामदेव बावणे हा दुचाकीने घरी जात असताना स्टेट बॅंकेच्या मागेहून चारचाकी वाहनाने आलेल्या अज्ञात व्यक्तिंनी त्याचे अपहरण केले होते. तीन दिवसानंतर २६ एप्रिलला पवनी तालुक्यातील गोसीखुर्द धरणाच्या उजव्या कालव्यात कोरंभी ग्रामपंचायतच्या हद्दीतील झुन्नारदेव परिसरात दगडाला बांधलेला त्याचा मृतदेह तरगंताना दिसून आला होता.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस अधीक्षक विनीता साहू यांनी या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेकडे सोपविला. स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक प्रशांत कोलवाडकर व चमूने तपासाची चक्रे फिरविली.
४ मे रोजी स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारावर नागपूर येथील अक्र म मुनीरखॉ पठाण (२0) रा. बडा ताजबाग, नागपूर, अमित भगवान कन्नाके (२७) रा. देलनवाडी वॉर्ड, ब्रम्हपुरी, सिद्धांत आसाराम मडावी (२१) रा. कुकडहेटी ता. सिंदेवाही यांना अटक करण्यात आली. पोलिस चौकशीत अमित कन्नाके या आरोपीने सुपारी घेऊन नामदेवचा खून केल्याचे सागितले. ही सुपारी लाखांदूर तालुक्यातील करांडला येथील पुरुषोत्तम भागडकर याने दिली होती.
पोलिसांनी ६ मे रोजी पुरुषोत्तम भागडकरला अटक केली. पुरुषोत्तमकडून अधिक माहिती घेतली असता माया मोटघरे हिचे सांगण्यावरूनच आपण ५0 हजार रुपयाची सुपारी घेतल्याचे त्याने सागितले. याप्रकरणी माया मोटघरेला अटक करण्यात आली असून तपास सहाय्यक पोलिस निरीक्षक गौरव गावंडे करीत आहेत.
हा तपास पोलिस अधीक्षक विनीता साहू, उपविभागीय पोलीस अधिकारी विक्र म साळी यांच्या मार्गदर्शनात स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलिस निरीक्षक गौरव गावंडे, जयंत गादेकर, फौजदार प्रितीलाल रहांगडाले, वामन ठाकरे, राजेश गजभिये, सुधीर मडामे, नेपालचंद्र टिचकुले, संजू कुंजरकर, बंडू नंदनवार, मंगल कुथे, रोशन गजभिये, दिनेंद्र आंबेडारे, बबन अतकरी, स्नेहल गजभिये, राजू बोंदरे, वैभव चामट, चालक रामटेके, राधेशाम ठवकर, कटरे आदींनी केली.
Post a Comment