चंद्रपूर / प्रवीण गोंगले /--- -
वनक्षेत्राचा विकास व्हावा, वन विभाग हा रोजगार देणारा विभाग व्हावा यासाठी मोठ्या प्रमाणात प्रयत्न केल्या जात असून वनधन जनधन ही सुरुवात असल्याचे पालकमंत्री ना. सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.नागपूर पाठोपाठ चंद्रपूर येथे वनधन योजनेअंतर्गत गौण वनोपज प्रदर्शनी व विक्री केंद्राची स्थापना वनविभागाअंतर्गत करण्यात येत असून 28.47 लाख रुपये खर्च करुन उभारण्यात येणा-या विक्री केंद्राचे भूमिपूजन पालकमंत्री ना.सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते. स्वागत कक्षाचे उदघाटनही यावेळी करण्यात आले.
मुख्य वनसंरक्षक कार्यालय नागपूर रोड येथे आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वनविकास मंडळाचे अध्यक्ष चंदनसिंह चंदेल हे होते. जिल्हाधिकारी डॉ.दिपक म्हैसेकर, अपर प्रधान मुख्य वनसंरक्षक कुलदिप खवारे, मुख्य वनसंरक्षक संजय ठाकरे, अधिक्षक अभियंता डी.के.बालपांडे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.2013 साली आलेल्या अहवालात राज्यातील वनक्षेत्र कमी झाल्याची नोंद होती. मात्र गेल्या दोन वर्षात 453 चौ. कि.मी. वन वाढविण्यात यश आल्याचे त्यांनी सांगितले. वनाला रोजगार देणारा वनक्षेत्र म्हणून विकसित करण्याचा संकल्प त्यांनी यावेळी बोलून दाखविला. सप्टेबंर महिन्यात जिल्ह्यातील 6 हजार विद्यार्थ्यांना मोफत ताडोबा सहल घडविली असे त्यांनी सांगितले. वनविभागाची सर्व कार्यालय आयएसओ करण्यात येतील असेही ते म्हणाले.
चंद्रपूर जिल्हयात विपूल प्रमाणात वनसंपदा विशेषत: बांबू, मोहा, चारोळी आढळून येतात. वनविभागाअंतर्गत वनधन योजने अंतर्गत संयुक्त वनव्यवस्थापन समित्यांनी वन उत्पादनापासून तयार केलेल्या कलाकुसरीच्या हस्तकला वस्तु, औषधी वनस्पती आणि गौण वन उत्पादने (उदा.मध, लाख, डिंक, मोहापासून तयार केलेले तेल, सरबत, जाम इत्यादी) यांची विक्री करण्यासाठी वन विभागाने सहाय्यभूत भूमिका बजावणे गरजेचे आहे तरच संयुक्त वनव्यवस्थापन समित्या सक्षम होतील. त्यातून वन, वन्यप्राणी, जैवविविधता आणि पर्यावरण यांचे संरक्षण, संवर्धन विकास आणि व्यवस्थापन करण्यांत अशा समित्या महत्वपूर्ण काम करु शकतील. तसेच अशा कामातून वनक्षेत्र व वृक्षाच्छादन वाढविणे आणि संवर्धीत करणे शक्य होईल. चंद्रपूर वनवृत्तामध्ये बांबू संशोधन व प्रशिक्षण केंद्रामार्फत 100 युवक व युवतींना प्रशिक्षण देण्यात येऊन बांबूच्या विविध वस्तु बनविण्यात आलेल्या आहेत. या वस्तू सुध्दा या केंद्रात प्रदर्शनी व विक्री करीता ठेवण्यांत येणार आहेत.
वनविभागा अंतर्गत वनधन योजनेची व्याप्ती आणि उलाढाल किमान वार्षिक रुपये 300 कोटी पर्यंत नेण्यासाठी वन औषधी व वन उत्पादनाचे ( उदा.मोहा, जाम आणि सरबत) मार्केटिंग मोठया प्रमाणात वाढविण्यांसाठी योजनेचे उद्दिष्ट असून नागपूर पाठोपाठ चंद्रपूरचा हा दुसरा उपक्रम या भागात झालेला आहे. गडचिरोली जिल्हयातील विविध वनौषधी व वनोपजावर आधारित उत्पादने सुध्दा विक्रीसाठी येथे उपलब्ध राहणार आहेत. या केंद्रासाठी 28.47 लाख रुपये खर्च जिल्हा योजना अंतर्गत मंजूर करण्यात आलेला असून केंद्राची निर्मिती पुढील तीन महिण्यांत अपेक्षीत आहे.चंद्रपूर वनवृत्त कार्यालयाला आयएसओ नामांकन प्रमाणपत्र मिळाले असून हे प्रमाणपत्र पालकमंत्री यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले. स्वागत कक्षामध्ये वनविभागाच्या विविध योजनांबाबत माहिती अभ्यागतांना उपलब्ध करुन देण्यात येणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक संजय ठाकरे यांनी केले.
Post a Comment