अनिल चौधरी,
पुणे:-
----
पुणे:-
----
समाजात गतिमंद समजल्या जाणाऱ्या या विशेष मुलांचे वेगळे जग असते. त्यांचा समाजाकडे बघण्याचा दृष्टीकोन हा सामान्यांपेक्षा वेगळा असतो. त्यांच्या या जगाची अनोखी सफर एका आगामी मराठी चित्रपटात पहायला मिळणार आहे. तो चित्रपट म्हणजे प्रसिध्द दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांचा 'लालबागची राणी'. या विशेष मुलांचे आयुष्य जवळून अनुभवण्यासाठी व त्यांच्याशी भावनिक बंध जुळवण्यासाठी चित्रपटात मध्यवर्ती भूमिका साकारणारी वीणा जामकर हिने ठाणे येथील जागृती पालक या विशेष मुलांच्या संस्थेला भेट दिली. यावेळी तिने त्यांच्यासोबत मजा-मस्ती करत संवाद साधला. इतकेच नव्हे तर त्यांना आकर्षक भेटवस्तू देऊन व रंगीत फुगे दिल्यानंतर त्यांच्या चेहऱ्यावर वेगळीच चमक आली. सर्वांचा लाडका अभिनेता प्रथमेश परब आणि पार्थ भालेराव यांनीही त्यांच्या हटके स्टाईलने डान्स करून मुलांमध्ये ते मिसळून गेले.
लक्ष्मण उतेकर यांनी हिंदी चित्रपट सृष्टीत अनेक वर्ष सिनेमॅटोग्राफर म्हणून कार्यरत आहेत. 'टपाल' चित्रपटाच्या घवघवीत यशानंतर ते आता'लालबागची राणी' चित्रपट घेऊन येत आहेत.
'लालबागची राणी' या सिनेमात वीणा 'संध्या' या विशेष मुलीची भूमिका साकारत आहे. या संध्याबरोबरच तिला प्रेमाने सांभाळणारे तिचे पालकही तितकेच विशेष आहेत. त्यामुळे अशा विशेष मुलांची काळजी घेणारे, त्यांच्या सर्व गरजा आनंदाने पूर्ण करणारे त्यांच्या पालकांचेही वीणाने कौतुक केले. दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनीही मुलं व त्यांच्या पालकांशी मनमोकळा संवाद साधला. विशेष मुलांसाठी 'हे जग सकारत्मकतेने परिपूर्ण असते. त्यांच्या नजरेतून आपणही ते पाहिले पाहिजे. असाच संदेश वीणाने या चित्रपटातून दिला आहे', असे उतेकर म्हणाले.
हिंदीतील अनेक गाजलेल्या चित्रपटाची निर्मिती केलेल्या 'मॅड एंटरटेनमेंट' या बॅनरखाली सुनील मनचंदा यांनी या सिनेमाची निर्मिती केली आहे. तसेच बोनी कपूर हे या सिनेमाचे प्रस्तुतकर्ता आहेत. वीणासह अशोक शिंदे, प्रथमेश परब, पार्थ भालेराव, नेहा जोशी, नंदिता धुरी, रेश्मा चौगुले, सुब्रत दत्ता, जयवंत वाडकर, प्रतिमा जोशी, सुयश जोशी, जगन्नाथ निवगुणे अशा दिग्गज कलाकारांच्या उल्लेखनीय भूमिका पहायला मिळणार आहेत. विशेष मुलीवर आधारित 'लालबागची राणी' हा कौटुंबिक परिपूर्ण मनोरंजक सिनेमा ३ जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.
Post a Comment