महाराष्ट्रात सध्या सैराट हा
चित्रपट गाजत आहे; परंतु जनतेच्या मन:पटलावर या चित्रपटाने उद्धृत केलेली
विचारधारा ही महान भारतीय संस्कृतीशी विसंगत, कुटुंबद्रोही आणि पर्यायाने
हिंदुद्रोहीच आहे. सदर चित्रपटाने वयात येणार्या युवक-युवती शाळेत
असतांनाच त्यांना होणार्या कथित प्रेमाला प्रोत्साहन देऊन, ते कसे योग्य
आहे हे रोचक पद्धतीने रंगवून सांगितले आहे. या चित्रपटाचे होणारे दूरगामी
परिणाम जनतेचे अतोनात हाल करणार, हे निश्चित आहेच, परंतु बीड, अंबड आदी
शहरांमध्ये चित्रपटाचे भयावह परिणाम आताच दिसू लागले आहेत.
या चित्रपटातून होणारा परिणाम सदर लेखाद्वारे उपरोधिकरित्या
मांडण्यात आला आहे. पत्रकार आणि लेखक डॉ. संजय कळमकर यांनी हा लेख लिहिला
असून आम्ही वाचकांसाठी प्रसिद्ध करीत आहोत.


१. संस्कारांच्या नावावर विकृतीकडे नेणारे चित्रपट दाखवा !
समस्त पालकांनो, आपल्या मुला-मुलींवर संस्कार करायला आजच्या इतका
उत्तम काळ नाही. त्यांना संस्कार शिबिरात पाठवू नका; सुटीत मामाच्या गावाला
पाठवू नका; पुस्तके वाचायला देऊ नका. शाळा, बालक पालक, टाईमपास, फॅन्ड्री
असे सिनेमा घरच्या घरी दाखवा. हे सिनेमे पाहून मुलं सैराट होतील, अशी भीती
बाळगू नका. लगेच यावर बोनस म्हणून त्यानां सैराट चित्रपट दाखवा. झिंग झिंग
झिंगाट होऊ द्या. (या चित्रपटात झिंग झिंग झिंगाट या बोलांचे एक गीत आहे.)
सकाळी श्लोक, आरती शिकविण्याऐवजी वेगळी गाणी शिकवा, त्यावर ठेका धरून नाचू
द्या. मुलं मोकळ्या वातावरणात आनंदात शिकली पाहिजेत.
२. स्वत:कडे दर्शकवर्ग ओढण्यासाठी मराठी चित्रपटसृष्टीतील लोक अश्लीलतेच्या कुबड्या घेत असणे
मराठी सिनेमातील म्हणू लागले आहेत, हिंदीत काहीही पहाता. मग, मराठीत
दाखवलं तर काय हरकत आहे ? बहुजन समाजातील डायरेक्टर (दिग्दर्शक) मोठे होतात
म्हणून जळता काय ? नववीतली पोरगी प्रेमात पडलेली दाखवली, तर काय बिघडलं ?
पोरी काय प्रेमात पडत नाहीत का ? वार...रे...वा... आम्ही ते पडद्यावर
दाखवलं, म्हणून कशाला पोटशूळ उठला पाहिजे. जिस्म पार्ट १ (अश्लील हिंदी
चित्रपट) पहाता, जिस्म पार्ट २ पहाता आणि आमच्या सिनेमांना काय नाकं मुरडता
? म्हातार्या नसरूद्दीनबरोबर बिनधास्त मादकपणे नाचतांना तुमचे डोळे फुटले
का ? नाही ना ? त्यांना तर राष्ट्रीय पुरस्कार देता. हिंदी नट्या अभिनय
करतांना जगातील समस्त टेलर कुठे असतात ? आता मराठी शांत बसणार नाही. आमच्या
नट्यापण बिनधास्त होऊ लागल्या आहेत. त्याही पावसात भिजतील. पोहतांना
बिकिनी घालतील. अहो, बिकिनी घालून पडद्यावर पहिला शॉट नटी देणारी मराठीच
नव्हती काय ? मराठीनं आता गावठीपणा सोडला पाहिजे. उगीच अंगभर पदर घेऊन,
नटापासून चार हात दूर राहून नाचणारी मेंगरुळ नटी पाहील कोण ?
हिंदी जाऊ द्या... आता मराठी सिनेमांनी इंग्रजी सिनेमाचे अनुकरण केलं
पाहिजे. संस्काराच्या नावाखाली मुलांना कुठवर अडाणी ठेवता ? त्यांना मोकळे
होऊ द्या. वर्गात लैंगिक शिक्षण देण्याचे अजूनही तुमच्यात धाडस नाही. आम्ही
ते सिनेमातून देतो तर संस्कारांच्या नावाने लगेच आरडाओरडा चालू करता.
३. शिक्षकांनी पुरोगामित्वाचा ध्वज हातात घेऊन मुलांना शिकवायला हवे !
शिक्षकांनी तर शाळेत संस्काराच्या बाताच मारू नये. शांताबाईच्या (या
गीताच्या) चालीवर कविता शिकवा. एका झटक्यात पोरांच्या कविता पाठ होतील.
शाळा तपासणीला साहेब आले अन् विद्यार्थ्यांनी त्या ठेक्यावर कविता गायल्या,
तर सार्या शिक्षकांना अतिउत्कृष्ट शेरा मिळेल. शाळांनी सैराट, टाईमपास,
असे सिनेमे प्रोजेक्टवर मुलांना दाखवावे. पहा... एकही मुलगा शाळेत
अनुपस्थित रहाणार नाही. शाळेचा पट वाढेल. जे आमच्या मनात होतं तेच सिनेमांत
दाखवलंय, आठवी-नववीचे वय शिकण्याचे नाही ! प्रेम करण्याचे वय असतं; म्हणून
सारी मुले याच वयात प्रेम करू लागतील आणि अशाच सुसंस्कारित (?) पिढीकडून
डॉ. कलाम यांच्या स्वप्नातील भारत महासत्ता होईल ! नाहीतरी शाळेतील
संस्कारांचा घरात आल्याबरोबर फज्जा उडतो, की नाही ? तुम्ही सानेगुरुजींची
गोष्ट सांगून (मुलांना) घरी पाठवा. ती घरी येतात, तेव्हा आई सिरियल पहात
असते. त्यातल्या बाया लफडे करतात. ओरडतात. रडतात. मध्येच अंतर्वस्त्रे,
निरोध, शक्तीवर्धक औषधांच्या वगैरे संस्कारक्षम (!) जाहिराती लागतात. मग
बाबा म्हणतात, बास झाल्या रडक्या सिरियल. आता एखादा सिनेमा लावा. मग सिनेमा
लागतो. प्रेम करणं हाच नटांचा प्रमुख धंदा असतो. तो नटीमागं पळतो. प्रेम
जुळतं. पाऊसपण येतो. एकामेकांच्या मागं पळणं, लपणं, मिठ्या...! पोराला
वाटतं बाप पहातोय, म्हणजे हे एकंदर छानच ! तिकडं दादा मोबाईल खेळतोय. गेम
खेळत असावा... पाहू दे रे दादा ! असे म्हणताच तिकडे मर रे पिंट्या, असं तो
एकदम ओरडतोच. दादा ही कसली गेम पहातोय ? कुणाच्याच अंगावर पुरेसे कपडे
नाही. मला नाही पाहू देत अशी पिंट्याची तक्रार ! (एका कुटुंबातील
व्यक्तींचे हे वर्णन आजच्या समाजाचे प्रातिनिधिक उदाहरण होय. या नैतिक
अध:पतनाला धर्मशिक्षणाचा अभाव हेच कारणीभूत आहे, हे लक्षात घ्या ! -
संपादक) दुसर्या दिवशी गुरुजी विचारतात, काल सांगितलेली साने गुरुजींचीं
गोष्ट कोण सांगेल ? कोण सांगेल ? गुरुजी, सिरीअलमध्ये कोण कुुणाच्या
लफड्यात आहे, ते मी सांगतो. सिनेमातल्यासारखी वर्गातली पोरगी कशी पटवायची
ते सांगतो. इंग्रजीतील १३२....... पाठ न करता सांगतो. कालच तर नाही का सारे
१३२....... दाखवत नाचत होते. तेव्हाच, मला इंग्रजीच्या गुरुजींची आठवण
झाली. गुरूजी, वेरूळ अजिंठ्याला लेण्या पाहिल्या होत्या ना आपण ? आमचा दादा
मोबाईलमध्ये कायम तसेच काहीतरी पहातो; पण मला नाही दाखवत ...! हे उत्तर
ऐकून एकंदर साने गुरुजींनी आत्महत्या का केली असावी, त्याचाच विचार गुरुजी
करत बसतात.
४. तरुण पिढीला विकृतीच्या दरीत लोटण्यासाठी मराठी चित्रपट
निर्माते आणि दिग्दर्शकांनी सिद्ध व्हायला हवे !
निर्माते, दिग्दर्शकांनो, आपल्याशिवाय सिनेमा गाजत नाही. आपले नाव
होत नाही. आपल्या नावासाठी समाज, संस्कार गाळात गेला तरी चालेल; परंतु
तुम्ही त्याचा विचार करू नका; कारण लोक वेडे आहेत. शाळेत संस्कार होतात.
घरात पालक संस्कार करण्याचा प्रयत्न करतात. सुटीत संस्कार शिबिरे भरतात. या
सर्वांवर आपल्याला मात करायची आहे. लहानांची प्रेम प्रकरणं दाखवल्याशिवाय
आपण मोठे होणार नाही. आपण पैज लावू. तुम्ही संस्कार करा. आम्ही एक सिनेमा
काढून ते एका झटक्यात बिघडवून टाकू.
आमच्या डोळ्यापुढं एका सुंदर समाजाचं चित्र आहे. शाळेची घंटा झाली
आहे. प्रार्थनेला सर्व मुले-मुली उभी आहेत. हेडमास्तरांच्या हातात
गुलाबाच्या फुलांची टोपली आहे. ते सांगतात, बाळांनो, कोण कुणावर प्रेम
करतंय सांगा ? हे गुलाब घ्या आणि एकमेकांना द्या. त्यानंतर प्रार्थनेऐवजी
प्रेमगीतं म्हणा. खेळाच्या तासाला बागेत जाऊन जोडीने झाडाखाली बसा. अरे,
हेच तर तुमचं प्रेम करण्याचं वय आहे ...!
अशा शाळा आणि असा समाज घडेपर्यंत आम्ही असेच सिनेमे काढत राहू. नावं
ठेवायचं काम नाही. इंग्रजी, हिंदीतले घाणेरडे सिनेमे पहाता. ते घमेलेभर शेण
खातात. आम्ही चमचाभर खाऊ ! संस्कारांच्या नावानं ओरडणार्या सर्वांना आमचं
आवाहन आहे ... ! चला आपण सारे मिळून शेण खाऊ ! अन् नवा प्रेमात चिंब
भिजलेला समाज घडवू ! - डॉ. संजय कळमकर, पत्रकार
Post a Comment