रंगय्या रेपाकवार /--
गडचिरोली /---
कमीत कमी काळात प्रतिसाद या सुत्राला जागत गडचिरोली जिल्हयात आपत्ती व्यवस्थापन होत आहे. यामुळेच आज वडसा तालुक्यातील सावंगी येथे बोट बुडाली त्यावेळी त्यातील 10 जणांचे प्राण वाचविण्यात प्रशासनाला यश आले.
आज सकाळी साधरण अकरा वाजेच्या सुमारास बोटीतून वैनगंगा पार करताना वजन जास्त झाल्याने संतुलन बिघडून ही बोट बुडाली. पाणी पातळी वाढलेली व पाण्याचा प्रवाह देखील खूप होता. त्याही स्थितीत बचाव दलाने 10 जणांचे प्राण वाचविले. इतर 2 जण अद्याप बेपत्ता आहेत. त्यांचा शोध घेण्यात येत आहे.
लाखांदूर रोडवरील सावंगी गावातील हे 12 जण पूराच्याही स्थितीत नदी पार करण्याचा प्रयत्न करीत होते. होडीत त्यापैकी एकाने मोटारसायकलही घेतली. वारा आणि प्रवाहाचा वेग यामुळे ही बोट अचानक बुडाली. प्रशासनाची सतर्कता होतीच त्यामुळे जवानांनी पटापट उडया घेत 10 जणांना प्रवाहातून सुरक्षितपणे बाहेर आणले.
घटनेचे वृत्त कळताच स्वत: जिल्हाधिकारी ए.एस.आर. नायक घटनास्थळी पोहचले. येथे पोलिस उप अधीक्षक मंजुनाथ सिंगे, उपअधीक्षक (गृह) गणेश बिरादार यांच्या निर्देशात पोलिस दलाच्या सी-60 च्या जवानांनी ही कामगिरी पार पाडली. पोलिस दलाने या पावसाळयात आतापर्यंत एकूण 14 जणांना बुडण्यापासून वाचविले आहे. आणि बेपत्ता असणारे बोटीतील दोघांचा कसून शोध घेण्यात येत आहे.
स्थानिक आमदार कृष्णा गजबे तसेच जिल्हाधिकारी नायक यांनी वाचविण्यात आलेल्या या व्यक्तींची येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भेट घेऊन वर्तमान जाणून घेतले.
●◆●◆ डोंग्यातून- बेाटीतून प्रवास करु नका ! ●◆●◆
जिल्हयात सर्वच नद्यांच्या पात्रात पूरस्थिती आहे. अशा स्थितीत नागरिकांनी डोंग्यातून प्रवास करण्याचा धोका पत्करु नये. याबाबत सावधगिरी बाळगावी असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन नदीपात्रात पावसाळयात डोंगे किंवा होडयांनी प्रवास असुरक्षित आहे याबध्दल प्रशासनाने कारवाई करण्याचाही निर्णय घेतल्याचे नायक म्हणाले.
Post a Comment