श्री. अभय वर्तक,
कर्नाटकातील हंपी विश्वविद्यालयाचे माजी कुलगुरु डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या अनेक शक्यतांचा अभ्यास करून कर्नाटक पोलीस अन्वेषण करत आहेत. या प्रकरणातील खर्या आरोपींना शिक्षा व्हावी, अशी एक हिंदु संघटना म्हणून आमचीही भूमिका आहे; मात्र खरे आरोपी सापडत नाहीत; म्हणून सनातनच्या साधकाचा किंवा कुठल्याही हिंदु संघटनेच्या कार्यकर्त्याचा बळी देण्याचा प्रयत्न केला जाऊ नये. महाराष्ट्रातील नास्तिक नेते डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येच्या प्रकरणी महाराष्ट्र पोलीस डॉ. दाभोलकर आणि कॉ.पानसरे यांच्या कुटुंबियांच्या दबावाला बळी पडून पूर्वग्रहातून अन्वेषण करत आहेत. कर्नाटक पोलिसांनी आतापर्यंत डॉ. कलबुर्गी यांच्या हत्येच्या प्रकरणी चांगल्या प्रकारे अन्वेषण केले आहे; मात्र पुरोगाम्यांच्या दबावाला बळी पडून या प्रकरणी हिंदु संघटनांचा नाहक बळी देऊ नये, अशी मागणी श्री. अभय वर्तक यांनी या वेळी केली.
श्री. शरदचंद्र मुंडरगी म्हणाले, सनातनवर बिनबुडाचे आरोप करण्यापूर्वी संस्थेचे कार्य प्रत्यक्ष जाणून घ्या. सनातनच्या आश्रमांना भेट देऊन वस्तूस्थिती जाणून घ्या. सनातन संस्था राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणाचे पवित्र कार्य अत्यंत प्रामाणिकपणे अन् निरपेक्ष वृत्तीने करत आहे, हे मी प्रत्यक्ष पाहिले आहे आणि मी ठामपणे सांगू शकतो की, संस्थेचे साधक असे कोणतेही चुकीचे कृत्य करूच शकत नाहीत; उलट येणार्या काळात या संस्थेचे कार्य सर्वव्यापी झालेले दिसून येईल. माझे कर्नाटक पोलीस आणि प्रशासन यांना आवाहन आहे की, त्यांनी या प्रकरणाची चौकशी नि:पक्षपातीपणे करावी.
अभिनव हिंदु राष्ट्र संघटनेचे श्री. व्यंकटेश शिंदे म्हणाले, आम्ही सनातन संस्थेचे कार्य पूर्णपणे जाणून आहोत. सनातन संस्थेवर केले जाणारे आरोप, हे एक हिंदुद्रोही षड्यंत्र आहे. अशा प्रकारचे षड्यंत्र आम्ही यशस्वी होऊ देणार नाही. गुन्हेगारांना कडक शासन झालेच पाहिजे आणि त्याची चौकशीही नि:पक्षपातीपणे झाली पाहिजे.
हिंदु जनजागृती समितीचे श्री. मनोज खाडये म्हणाले, दाभोलकर, पानसरे आणि कलबुर्गी यांच्या हत्यांच्या प्रकरणांत काही संबंध नसतांना सनातनला गोवण्याचा जो प्रयत्न केला जात आहे, तो आम्ही सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना कोणत्याही स्थितीत यशस्वी होऊ देणार नाही. आम्ही सनातन संस्थेच्या निरपराध साधकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू. गुन्हेगाराला शिक्षा झालीच पाहिजे; मात्र अन्वेषणाच्या नावाखाली हिंदुद्वेष केला जात असेल, तर तो आम्ही खपवून घेणार नाही.
Post a Comment