BREAKING NEWS

Monday, September 26, 2016

शिवगंगा नदीला पूर आल्याने ५५ घरे बाधित; १०० नागरिकांचे स्थलांतर

कणकवली - अतिवृष्टी व कुर्ली धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविल्याने शिवगंगा नदीला पूर आल्याने लोरे नं. १, वाघेरी व कासार्डे गावातील ५५ घरे बाधित झाली. या घरांमधील सुमारे १०० नागरिकांना शनिवारी रात्री स्थलांतरित करण्यात आले होते. तर फोंडाघाट बाजारपेठेत पुराचे पाणी घुसल्याने ५५ घरे, दुकानांमधील अन्नधान्य व इतर साहित्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.  रविवारी पावसाचा जोर कमी झाल्याने पूर ओसरल्याने घरात साचलेला चिखल नागरिकांकडून काढण्यात येत होता. पुरामुळे लाखो रुपयांचे नुकसान झाले असून त्याचे पंचनामे महसूलच्या पथकाकडून केले जात आहेत.
सिंधुदुर्गात गेल्या तीन दिवसापासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. शनिवारी झालेल्या पावसाचा सर्वाधिक फटका शिवगंगा-पियाळी नदीपात्रालगतच्या लोरे नं. १, वाघेरी, कासार्डे या गावातील अनेक घरांना बसला. शनिवारी सकाळपासून जोरदार पाऊस होत असतानाच नदीला पूर आला होता. त्यातच कुर्ली-घोणसरी धरणाच्या पाणीसाठ्यात वाढ झाल्याने गेट उघडून विसर्ग सुरू करण्यात आला. त्यामुळे शिवगंगा-पियाळी नदीतील पाण्याच्या पातळीत मोठ्या प्रमाणावर वाढ झाली. त्यामुळे नदीपात्रालगतच्या अनेक घरांमध्ये पाणी घुसले. एकीकडे पावसाचा जोर वाढत असताना पुराचे पाणी घरात घुसल्याने नदीपात्रालगतच्या नागरीकांची त्रेधातिरपट उडाली.
शिवगंगा नदीच्या पुरामुळे लोरे नं. १ नरामवाडीतील २७ तर गुरववाडीतील ८ घरे बाधित झाली. गुरववाडीतील मुकूंद गुरव, शशिकांत गुरव व चंद्रकांत गुरव या तीन कुटुंबातील नागरिकांना लगतच्या सुमन गुरव यांच्या घरात शनिवारी रात्री स्थलांतरीत करण्यात आले. लोरे गावातील ३५ कुटुंबांचे अन्नधान्य व इतर साहित्य भिजल्याने सुमारे २ लाखाचे नुकसान झाले. वाघेरी-कुळयेवाडी येथील दोन घरांमध्ये पाणी घुसले होते. तर कासार्डे गावातील १८ घरांमध्ये पाणी घुसल्याने त्यातील ४५ नागरिकांना पं.स. सदस्य संजय देसाई यांच्या घरात तसेच गावातील कृषि महामंडळाच्या इमारतीमध्ये स्थलांतरीत करण्यात आले होते. रविवारी सकाळी पावसाचा जोर कमी झाल्याने घरांमधील पुराचे पाणी ओसरल्याने स्थलांतरीत झालेले सर्व नागरिक घरांमध्ये परतले. मात्र, पुराच्या पाण्यामुळे घराघरात चिखल साचला होता. अन्नधान्य, इतर साहित्य व जीवनावश्यक वस्तुंची नासाडी झाली. पुराचे पाणी फोंडाघाट बसस्थानक व बाजारपेठेमध्ये घुसल्याने ५५ घरे, दुकाने बाधित झाली.  बाजारपेठेतील सुदन बांदिवडेकर यांच्या खत गोडाऊनमध्ये पाणी घुसल्याने सुमारे १ लाख ७७ हजाराचे खत वाया गेले.  फोंडाघाटमधील इतर घरे, दुकानांच्या नुकसानीचे पंचनामे रविवारी सायंकाळपर्यंत सुरू होते.
पावसामुळे भिरवंडे गावातील रोहिणी धर्णे यांच्या घराची भिंत पडून १३ हजार रुपयांचे नुकसान झाले. तर भरणी गावातील मनोहर तांबे यांच्या घराच्या छप्पराचे तीन हजार रू.चे नुकसान झाले. घोणसरी गावातील पांडुरंग शिंदे यांच्या खताच्या पिशव्यांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने सुमारे ६ हजार रू.चे नुकसान झाले. तालुक्यातील इतर गावांमध्येही पुराच्या पाण्यामुळे भातशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. नदीपात्रालगतच्या भातशेतीमध्ये पाणी घुसले होते. तर काही ठिकाणी नदीपात्रालगतचे शेतीचे बांध वाहून गेल्याने शेतकर्‍यांचे नुकसान झाले आहे

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.