वाराणसी - अभिनेत्री सनी लिऑन हिच्या अश्लील संकेतस्थळावर भारतात बंदी घालण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीने चळवळ हाती घेतली आहे. समितीचे कार्यकर्ते १० सप्टेंबरपासून राष्ट्रीय चळवळ चालू करणार आहेत. याचा प्रारंभ काशी येथील शास्त्री घाटापासून होणार आहे. भारताची सांस्कृतिक राजधानी काशी असल्यामुळे या चळवळीस तेथून प्रारंभ होणार असल्याचे समितीचे श्री. नीलेश सिंगबाळ यांनी म्हटले आहे. एका पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली.
भारतामध्ये अनेक अश्लील संकेतस्थळे पाहिली जातात, मग केवल सनी लिऑनच्याच संकेतस्थळावर बंदीची मागणी का, या प्रश्नावर श्री. सिंगबाळ म्हणाले की, पॉर्न अभिनेत्री म्हणून 'सनी लिऑन'ची मोठी ओळख झाली आहे. भारतामधून सनीच्या नावाने सर्वाधिक लोक 'सर्च' करतांना दिसतात. तिचेच संकेतस्थळ सर्वाधिक पाहिले जाते. दिवसेंदिवस सनी लिओनची लोकप्रियता वाढत आहे, खरे तर हे भारतीय संस्कृतीसाठी धोकादायक आहे. सर्वच अश्लील संकेतस्थळे बंद करायला हवीत; परंतु एक-एक पाऊल पुढे टाकत जाणार आहोत.
आमच्या मोहिमेमध्ये अनेक जण सहभागी होतील, अशी अपेक्षा आहे. अश्लील संकेतस्थळे भारतीय संस्कृतीच्या विरोधात असल्याने सरकारने त्यांवर बंदी घालायला हवी, असेही ते म्हणाले.
Post a Comment