
चांदूररेल्वे - (शहेजाद खान)-
जिल्ह्यात उत्पन्नात अग्रेसर असणाऱ्या स्थानिक एसटी आगारात पुरेशा एसटी बसेस उपलब्ध नसल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहे. शिवाय ११ बसेस कालबाह्य झाल्या आहेत. त्यामुळे दुरूस्तीसाठी सुटे भाग उपलब्ध नसल्याने दररोज दोन ते तीन बसफेर्या रद्द होतात. त्यामुळे प्रवाशांची डोकेदुखी वाढली आहे. प्रवासी संघटनेने याबद्दल तीव्र नापसंती व्यक्त केली आहे.
चांदूररेल्वे आगारात ११ कालबाह्य एसटी बसेससह एकूण ४६ बसेस आहेत. त्यात काम करणारे ९६ वाहक व चालक आहेत. नवीन एसटी बसेस प्राप्त न झाल्याने जुन्याच एसटी बसेस लांब पल्ल्यासाठी धावतात. या आगारातून औरंगाबाद, नागपूर, शेगाव, जळगाव-जामोद, माहूर आदींसाठी बसेस सुटतात. मात्र, येथून व्हाया कौंडण्यपूर व पुलगाव, वर्धेकडे जाण्यासाठी एकही बसफेरी सुरू करण्यात आलेली नाही. चांदुरवरून जहांगिरपूर, कौंडण्यपूर, देऊरवाडा, टाकरखेडा, नांदपूर, आर्वी, खरांगणा या गावांकडे जाणारे अनेक प्रवासी असतात. या प्रवाशांना कुर्ह्यापर्यंत जाऊन दुसरी बस घ्यावी लागत असल्याचे समजते. ग्रामीण भागातून शाळा-महाविद्यालयाकरिता दररोज पाच हजारांच्यावर विद्यार्थी ये-जा करतात. त्या विद्यार्थ्यांचेही बसफेर्यांसाठी हाल होत आहेत. नवीन विनावाहक नॉन स्टॉप गाड्यांचे शेड्यूल त्वरित सुरू करावे, अशी मागणीही प्रवासी संघटना करीत आहे. जिल्ह्याच्या इतर आगारांच्या उत्पन्नाच्या तुलनेत चांदूररेल्वे आगार उत्पन्नात अग्रेसर आहे. परंतु जिल्हास्तरावर नवीन बसेस आल्यास त्या चांदूररेल्वे आगाराला सर्वात शेवटी मिळतात. ही बाब चांदूर आगारावर अन्याय करणारी असल्याची भावना प्रवासी संघटनेने व्यक्त केली आहे.

चांदूर आगारातून विनावाहक बस अमरावतीकरिता सणासुदीसाठी सुरू कराव्यात. तसेच चांदूररेल्वे, देवगावसाठी बसफेरी सुरू करावी. तरच अवैध वाहतुकीला आळा बसेल. पर्यायाने आगाराच्या उत्पन्नात वाढ होईल.
- एक प्रवासी
Post a Comment