BREAKING NEWS

Tuesday, December 13, 2016

‘सनबर्न फेस्टिव्हल’ पुण्यातून हद्दपार करणारच ! पुणे येथील आंदोलनात रणरागिणींची चेतावणी !

आंदोलन करतांना धर्माभिमानी हिंदू
     पुणे- विद्येचे माहेरघर आणि सांस्कृतिक शहर म्हणून ओळखल्या जाणार्‍या पुणे शहरात केसनंद येथे २८ ते ३१ डिसेंबर या कालावधीत ‘सनबर्न फेस्टिव्हल’ होऊ घातला आहे. पाश्‍चात्य संगीताच्या नावाखाली युवा पिढीला व्यसनाधिनतेकडे नेणारा महोत्सव पुण्यातून हद्दपार करणारच, अशी खणखणीत चेतावणी हिंदु जनजागृती समितीप्रणित रणरागिणी शाखेच्या वतीने घेण्यात आलेल्या आंदोलनात देण्यात आली. १२ डिसेंबर या दिवशी मंडई येथील लोकमान्य टिळक पुतळा येथे करण्यात आलेल्या या आंदोलनाला १७५ हून अधिक धर्माभिमानी महिला उपस्थित होत्या.

     २०१३ मध्ये गोव्यात झालेल्या ‘सनबर्न फेस्टिव्हल’मध्ये ‘अमली पदार्थविरोधी पथका’ला शेकडो जण सार्वजनिकरित्या हुक्का आणि चिलीम पित असतांना आणि अनेक जण तात्पुरत्या स्वरूपात बांधण्यात आलेल्या प्रसाधनगृहात अमली पदार्थांचे सेवन करत असतांना पहायला मिळाले. या फेस्टिव्हलच्या आयोजकांनी ‘हा ‘ड्रग्ज-फ्री इव्हेंट’ (अमली पदार्थमुक्त कार्यक्रम) आहे, असे कितीही सांगितले’, तरी या ठिकाणी अमली पदार्थांच्या सेवनाचा मुक्त संचार असतो, हा पोलीस आणि अमली पदार्थविरोधी पथक यांचा आतापर्यंतचा अनुभव आहे. पुण्याचा सांस्कृतिक इतिहास लक्षात घेता ‘सनबर्न’सारखे महोत्सव पुण्याच्या सुसंस्कृतपणाला गालबोट लावणारे आहेत. या पार्श्‍वभूमीवर हिंदु जनजागृती समितीच्या नेतृत्वाखाली समाजाच्या अनेक स्तरांतून महोत्सवाला विरोध होत असल्याचे चित्र आहे. या व्यतिरिक्त ख्रिस्ती नववर्षाच्या निमित्ताने होणारे अपप्रकार रोखण्यासाठी पोलीस प्रशासनाने कठोर उपाययोजना करावी आणि ‘हिंदूंनी नववर्ष १ जानेवारीला नाही, तर गुढीपाडव्याला साजरे करावे’, असे आवाहन या वेळी करण्यात आले.

पाश्‍चिमात्त्य संस्कृतीला देशात थारा देणार नाही ! 
- सौ. सरिता अंबिके, दुर्गावाहिनी आणि मातृशक्ती संयोजिका 
     विश्‍व हिंदु परिषदेच्या दुर्गा वाहिनीच्या सौ. सरिता अंबिके म्हणाल्या, ‘‘पाश्‍चिमात्य संस्कृतीच्या आक्रमणाला स्थानिक पातळीपासून विरोध होत आहे. आपल्या हिंदु संस्कृतीत सांगितलेली मूल्ये जपली पाहिजेत. युवा पिढीला वाममार्गाला नेणार्‍या अशा फेस्टिव्हलला जाण्याऐवजी नागरिकांनी हिंदु संस्कृतीचे महत्त्व जाणून घेऊन त्याचे पालन आणि जतन करायला हवे. ३१ डिसेंबरच्या दिवशी नवीन वर्ष साजरे करणे, हे आमच्या संस्कृतीतच नाही. त्यामुळे अशा अनावश्यक गोष्टींना वेळ देण्यापेक्षा धर्मशास्त्राचे महत्त्व जाणून घेऊन सेवा हेच यज्ञकर्म मानून कर्म केले पाहिजे. भारत देशात पसरू पहाणार्‍या पश्‍चिमात्त्य संस्कृतीला देशात अजिबात थारा मिळू देणार नाही.’’
लोकमान्य टिळकांच्या क्रांतीच्या प्रेरणेने आंदोलन यशस्वी होईलच !
 - सौ. जयश्री देशपांडे, सचिव, नारद मंदिर 
     लोकमान्य टिळक, चापेकर बंधू अशा क्रांतिकारकांच्या, तसेच तुकाराम महाराज, ज्ञानेश्‍वर महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही पुण्यनगरी कालांतराने पुणे अशी ओळखली जाऊ लागली. संस्कृतीचे आणि विद्येचे माहेरघर असलेल्या या शहरात गोवा राज्याने नाकारलेल्या सनबर्नसारख्या फेस्टिव्हलचे आयोजन पुण्याने स्वीकारले, याचा मी पूर्णपणे निषेध करते. प्रत्येक घरातील महिलेने याचा निषेध केला पाहिजे. ३१ डिसेंबरच्या दिवशी रात्रभर होणार्‍या धिंगाण्याला न थांबवता हिंदूंच्या सणांना मात्र नेहमीच पायबंद घातले जातात, ही सर्वांत खेदजनक आणि निषेधार्ह अशी गोष्ट आहे. या सर्व घटनांचा विरोध करण्यासाठीच हे आंदोलन आज करण्यात येत आहे. लोकमान्य टिळकांच्या क्रांतीच्या प्रेरणेने हे आंदोलन नक्की यशस्वी होईल.  ‘
सनबर्न’ रहित होईपर्यंत हे आंदोलन चालूच राहील ! 
- कु. प्रतीक्षा कोरगावकर, महाराष्ट्र राज्य संघटक, रणरागिणी शाखा 
     वर्ष २००९ मध्ये गोव्यात झालेल्या या फेस्टिवलमध्ये नेहा बहुगुणा या अवघ्या २३ वर्षीय तरुणीचा अमली पदार्थांच्या अतिसेवनामुळे मृत्यू झाला होता. २०१३ मध्ये गोव्यातील वागोतर बीचवर झालेल्या या फेस्टिव्हलमध्ये अमली पदार्थविरोधी पथकाने ड्रग्जविक्रेत्याला चरससहित अटक केली होती. धूम्रपान करणार्‍यांची संख्या तेथे पुष्कळ होती. असा हा फेस्टिव्हल पुण्यातून जोपर्यंत रहित होत नाही, तोपर्यंत आंदोलन चालूच राहील. महिलांवर होणार्‍या अत्याचाराचा प्रतिकार करण्यासाठी प्रत्येक महिलेमधील दुर्गादेवीचे तत्त्व जागृत व्हायला हवे. अशा जागृत झालेल्या रणरागिणीच पुढे हिंदु राष्ट्र स्थापनेमध्ये योगदान देतील.
 रणरागिणीच्या आंदोलनाला शिवसेनेचा पाठिंबा ! 
- सौ. सुनीता खंडाळकर, शिवसेना 
     खडकवासला मतदार संघातील शिवसेनेच्या महिला आघाडीच्या प्रमुख सौ. सुनीता खंडाळकर यांनीही ‘सनबर्न आणि ३१ डिसेंबरला होणारे अपप्रकार यांविरोधात रणरागिणी शाखेने छेडलेल्या आंदोलनाला शिवसेनेचा संपूर्ण पाठिंबा आहे’, असे सांगितले. सनातन संस्थेच्या वतीने कु. शलाका सहस्रबुद्धे यांनीही गौरवशाली हिंदु संस्कृतीतील विश्‍वाच्या कानाकोपर्‍यात पोचवण्यासाठी कटिबद्ध होण्याचे आवाहन केले.
     आंदोलनात संभाजी ब्रिगेड महाराष्ट्र राज्याचे उपाध्यक्ष सर्वश्री बाळकृष्ण वांजळे, शिवसेनेचे ग्राहक संरक्षण उपकक्षप्रमुख निखिल जावळकर, ह.भ.प. मंचक महाराज कराळे परभणीकर, कोथरूड विभागातील भाजपच्या महिला आघाडीच्या सरचिटणीस सौ. गायत्री काळभोर सहभागी झाले होते.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.