उलट बँकेच्या अधिकाऱ्याने दिली शेतकऱ्याला पोलीसात रीपोर्ट देण्याची धमकी
जिल्हाधिकाऱ्यांना न्यायासाठी दिले निवेदन
चांदुर रेल्वे- (शहेजाद खान ) -
गेल्या चार वर्षांपासुन राज्यात दुष्काळ आहे. त्यामुळे उत्पादन खर्च वाढलेला आहे मात्र त्या तुलनेत उत्पन्न आणि नफा कमी झालेला आहे. शेतमालाला मिळणारे हमीभाव उत्पादन खर्चापेक्षा
कमी असल्यामुळे शेतकऱ्यांना दिवसेंदिवस अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. सतत नापीकीमुळे अनेक शेतकरी कर्जबाजारी झालेले आहे. अशातच तालुक्यातील घुईखेड येथील एका शेतकऱ्याने पिक कर्ज स्टेट बँकेतुन घेतले असतांना थेट बँक बचत खात्यातुन शेतकऱ्याला न विचारता नुकतेच पैसे कर्ज स्वरूपात कपात करण्याचा प्रताप उघडकीस अाला आहे. या बाबत विचारले असता बँक अधिकाऱ्याने उलट शेतकऱ्यालाच पोलीसात रीपोर्ट देण्याची धमकी दिली असुन याबाबत चे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले.
सद्या देशात बँकेमध्ये सर्वोच्च स्थानावर भारतीय स्टेट बँक आहे. मात्र याच बँकेच्या घुईखेड येथील शाखेचा दररोज एक न एक कारनामा समोर येत आहे. ग्राहकांशी उध्दट बोलने, शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ करने, ग्राहकांना अनेक वेळेपर्यंत बँकेत उभे करने असे अनेक प्रकार या बँकेत होत असतात. बँकेचे व्यवस्थापक, कैशियर यांच्या बेजबाबदारपणामुळे ग्राहक त्रस्त झाले आहे. अशातच घुईखेड येथील शेतकरी लहानु सुखरामजी मेश्राम यांनी काही महिन्यांपुर्वी घुईखेड येथील भारतीय स्टेट बँकेमधुन शेतीसाठी पीक कर्ज घेतले होते. त्यांच्या बचत खात्यामध्ये कामासाठी ठेवलेले १५ हजार रूपये जमा होते. लहानु मेश्राम हे काही दिवसांपुर्वी बँकेत गेले असता त्यांच्या खात्यातील कामासाठी ठेवलेले १५ हजार रूपये कपात झाल्याचे समजले. याबाबत सदर शेतकरी विचारणा करणाऱ्यासाठी बँक अधिकाऱ्याकडे गेले असता तुमच्या खात्यातील रक्कम छत्तीसगड येथील बँकेत गेली, तुम्ही छत्तीसगड येथे एटीएम कार्डचा वापर केल्याचे सांगितले. मात्र या शेतकऱ्याने एटीएम कार्डचा वापर न केल्यामुळे त्यांनी पासबुक मध्ये एेंट्री करून देण्याची विनंती केली. त्यानंतर लाईनमध्ये लागा असे बँक अधिकाऱ्याने म्हटले असता शेतकऱ्याने म्हटले की माझे पैसे कुठे गेले ते मला पहायचे असल्यामुळे लवकर एेंट्री करून द्यावी अशी विनंती केली. यावर बँक अधिकाऱ्याने उद्धटपणे बोलुन थेट पोलीसात रीपोर्ट देण्याची धमकी दिल्याचा आरोप त्या शेतकऱ्याने केला आहे.
पासबुकमध्ये ऐंट्री केल़्यानंतर लहानु मेश्राम यांच्या लक्षात आले की १५ हजार रूपये पीक कर्जाचे बँकेने कपात केले. लहानु मेश्राम हे शेतकरी असुन त्यांना न विचारता, न नोटीस देता कर्ज कपात करण्याचा अधिकार कोणाला आहे का ? व ही कर्ज कपात करण्याची वेळ आहे का ? असे अनेक प्रश्न उपस्थित झाले आहे. त्यामुळे आता न्याय मिळण्यासाठी शेतकरी लहानु मेश्राम यांनी अमरावती येथील स्टेट बँकेचे विभागीय व्यवस्थापक, जिल्हाधिकारी अमरावती, उपविभागीय अधिकारी व तहसिलदार चांदुर रेल्वे यांना निवेदन सादर केले आहे. तसेच किशोर तिवारी, पालकमंत्री प्रविण पोटे यांनाही निवेदन पाठविले. तत्काळ न्याय न मिळाल्यास त्यांनी आत्महत्या करण्याचा इशारासुध्दा दिला आहे.
बँकेचे सी.सी.टी.व्ही. फुटेज तपासल्यावर सत्यता येईल समोर
घुईखेड येथील भारतीय स्टेट बँकमध्ये सुरक्षीततेच्या दृष्टीकोणातुन सी.सी.टी.व्ही. कैमेरे लावण्यात आले आहे. सदर शेतकऱ्याचे प्रकरण हे पुर्णत: बँकेतील सी.सी.टी.व्ही. मध्ये कैद झालेले असल्याचे समजते. त्यामुळे बँक अधिकाऱ्याने शेतकऱ्यासोबत केलेल्या उध्दट वागणुकीचे सत्य समोर येऊ शकते. अशातच सी.सी.टी.व्ही. फुटेजची तपासल्यानंतर दोषी अधिकाऱ्यावर कारवाईची मागणी सुध्दा करण्यात आली आहे..
Post a Comment