डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्येशी सनातनचा संबंध असल्याचे कोणत्याही अन्वेषण यंत्रणेने म्हटलेले नसतांना असे धादांत खोटे आरोप करणारे विखे-पाटील यांचा यातून सनातनद्वेषच दिसून येतो !
मुंबई– डॉ. दाभोलकर आणि कॉ. पानसरे यांच्या हत्या प्रकरणांत सनातन संस्थेचा संबंध आहे, हे उघड झालेले असतांनाही त्यांच्यावर कोणतीही कारवाई केली जात नाही वा त्यांच्यावर बंदी घालत नाही.
कॉम्रेड पानसरे हत्या प्रकरणातील मुख्य आरोपी आणि सनातनचा साधक श्री. समीर गायकवाड यांना अटक केलेली आहे. असे असतांना पोलिसांच्या गराड्यात त्याच्या हातामध्ये सनातनचे पत्रक मिळते. यावरून सनातन संस्थेला राजाश्रय मिळत असून त्यांना छुपा पाठिंबा मिळत आहे. अशाने आतंकवादाला खतपाणी घातल्यासारखेच आहे. त्यामुळे आमची सनातन संस्थेवर बंदी आणण्याची मागणी आहे, असे विधान विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले. येथे ६ मार्चपासून चालू होणार्या राज्य अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे, काँग्रेसचे आमदार शरद रणपिसे आणि आमदार संजय दत्त हे उपस्थित होते.
विखे-पाटील पुढे म्हणाले की, नागपूर येथे नथुराम गोडसे नाटकाच्या विरोधात निदर्शनांच्या वेळी तेथील पोलीस आयुक्तांनी आंदोलकांना गोळ्या घालू, अशा आशयाचे फलक लावले होते. त्या पोलीस आयुक्तांना जनरल डायर पदवी देण्यासाठी गेल्यावर त्यांनी क्षमा मागितली. तसेच राज्यात कायदा-सुव्यवस्था बिघडली असून सध्या राजकीय गुन्हेगारीत वाढ होते आहे. अशा माध्यमातून राजकीय आतंकवाद निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्या विरोधात आम्ही अधिवेशनात आंदोलन करू. याचसमवेत अर्थसंकल्पीय अधिवेशनात राज्यातील शेतकर्यांना संपूर्ण कर्जमाफी देण्याची घोषणा करण्यात यावी आणि तसे निर्देश राज्यपालांनी ६ मार्च या दिवशी होणार्या अभिभाषणात द्यावेत, यासाठी आम्ही ५ मार्च या दिवशी सायंकाळी राज्यपालांची भेट घेऊन तसे निवेदन देणार आहोत. भाजप शासनाने निवडणुकीपूर्वी शेतकर्यांना कर्जमाफी देऊ, असे सांगितले होते; परंतु सत्तेवर येऊन अडीच वर्षे होऊन गेली, तरी कोणतेही आश्वासन पाळलेले नाही. त्यामुळे भाजप सरकारने जनतेची पारदर्शी फसवणूक केली आहे.
Post a Comment