दि. ८ मार्च हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो. भारत निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार यादिवशी जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांवर महिलांसाठी विशेष मतदार नोंदणी अभियान राबविण्यात येणार आहे. जनगणनेनुसार जिल्ह्यात असलेले प्रत्येक १००० हजार पुरुषांमागे ९४० महिला आहेत. मात्र मतदार यादीनुसार हे प्रमाण ९१२ आहे. स्त्री-पुरुष प्रमाण यातील तफावत दूर करण्यासाठी महिला मतदार नोंदणी वाढविणे आणि महिला मतदारांमध्ये मतदानाबाबत जागृती निर्माण करणे आणि महिलांची मतदार नोंदणी वाढविणे, यासाठी जिल्हा प्रशासनाद्वारे नियोजन करण्यात आले आहे.
जिल्ह्यातील नागरिक, स्वयंसेवी संस्था, महिलांच्या विकासासाठी कार्यरत संस्था आणि विविध अशासकीय सामाजिक संस्थांनी आपल्या घरातील,संस्थेतील ज्या महिलेचे नाव मतदार यादीत नोंदलेले नाही, अशा महिलांचे नाव मतदार यादीत नोंदवून घ्यावे. मतदार नोंदणीसाठी आवश्यक असलेले अर्ज क्रमांक ६ तहसील कार्यालय तसेच जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक शाखेत पुरेसे व विनामूल्य उपलब्ध आहेत.
दि. १ जानेवारी २०१७ या अर्हता दिनांकास १८ वर्षे पूर्ण आहे, अशा महिलांना मतदार नोंदणी लगेच करता येईल. विहित नमुना क्रमांक ६ सोबत वयाचा पुरावा (जसे शाळा सोडल्याचा दाखला, आधारकार्ड, रेशनकार्ड, पॅन कार्ड, वाहन परवाना इ.) व रहिवास पुरावा (रहिवासी प्रमाणपत्र किंवा कुटुंबातील व्यक्तीच्या मतदार ओळखपत्राची झेरॉक्स, वीज बिल, दूरध्वनी बिल, पारपत्र, गॅस जोडणी कार्ड, बँक पासबुक इ.) झेरॉक्स प्रत व दोन फोटो आवश्यक आहेत.
दि. ८ मार्च २०१७ रोजी जिल्ह्यातील सर्व मतदार केंद्रांवर मतदार केंद्रस्तरीय अधिकारी उपस्थित राहून मतदार नोंदणीचे अर्ज स्वीकारतील. तरी अद्याप मतदार यादीमध्ये नाव न नोंदविलेल्या महिलांनी मतदार यादीमध्ये नाव नोंदविण्यासाठी अर्ज सादर करावेत. मतदार यादीमधील नाव वगळण्यासाठी अर्ज क्र. ७, मतदार यादीतील नावामध्ये दुरुस्तीसाठी अर्ज क्र. ८ व मतदार यादीतील मतदान केंद्रामध्ये नाव स्थानांतरीत करण्यासाठी अर्ज क्र. ८ अ भरून द्यावा, असे जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत कळविण्यात आले.
Post a Comment