यवतमाळ -
राज्य शासनाने नागरीकांच्या तक्रारी ऑनलाईन नोंदविण्यासाठी आपले सरकार वेबपोर्टल सुरू केले आहे. या पोर्टलवर आता लोकशाही दिनाच्या तक्रारी नोंदविण्यात येणार आहे.
जिल्हाधिकारी कार्यालयातर्फे आज बचत भवनात जिल्हास्तरीय लोकशाही दिन घेण्यात आला. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी याबाबत माहिती दिली. राज्य शासनाने आपले सरकार हे वेबपोर्टल नागरीकांच्या तक्रारी मांडण्यासाठी उपलब्ध करून दिले आहे. लोकशाही दिन हे एक ठिकाण असले तरी याठिकाणी मांडण्यात येणाऱ्या प्रत्येक समस्या आणि त्यावरील उत्तर आपले सरकार या वेबपोर्टलवर नोंदविण्यात यावे. या पोर्टलवरील कार्यप्रणालीच्या माहितीसाठी ई-डिस्ट्रीक्ट प्रोजेक्टचे जिल्हा मॅनेजर उमेश घुग्गुसकर यांच्याशी संपर्क साधावा. वेबपोर्टलवरील तक्रारींची मुख्यमंत्री कार्यालयातर्फे जातीने लक्ष घालण्यात येत आहे. त्यामुळे विभाग प्रमुखांनी आपल्या कार्यालयांशी संबंधित तक्रारी श्री. घुग्गुसकर यांच्याकडून जाणून घ्याव्यात. या तक्रारी तात्काळ निकाली काढण्यासाठी सर्व विभागांनी तातडीने कारवाई करावी.
आपले सरकार वेबपोर्टलवरील तक्रारींची माहिती संबंधित कार्यालयांना माहिती व्हावी, यासाठी प्रत्येक कार्यालयातील एका कर्मचाऱ्याला प्रशिक्षण देण्यात येणार आहे. वेबपोर्टलवरील तक्रारींचे तातडीने उत्तर देण्यात यावे. हे उत्तर सिस्टीमवर कायमस्वरूपी दिसणार आहे. त्यामुळे विभागप्रमुखांनी या तक्रारी तातडीने सोडविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन श्री. खवले यांनी केले.
Post a Comment