BREAKING NEWS

Monday, April 10, 2017

पनवेल येथील संकल्प सभेतील मागणी - अयोध्येतील राममंदिरासाठी कायदा करा

पनवेल – गेली ६५ वर्षे आम्ही राममंदिरासाठी न्यायालयीन मार्गाने लढत आहोत. हिंदूंच्या सहनशक्तीचा आता अंत होत चालला आहे आणि चर्चेने हा विषय मिटणार नाही. त्यामुळे आता राममंदिरासाठी एकच उपाय आहे आणि तो म्हणजे संसदेत कायदा करा आणि राममंदिर बांधण्याचा मार्ग मोकळा करा. हिमाचलप्रदेशमधील पालनपूर शहरात १९८९ मध्ये झालेल्या भाजपच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत सोमनाथ मंदिरासाठी ज्याप्रमाणे कायदा करण्यात आला, त्याप्रमाणे अयोध्येतील राममंदिरासाठी कायदा करण्याचा ठराव केला आहे, त्यामुळे आम्ही सरकारकडे मागणी करत आहोत की, त्यांनी लवकरात लवकर कायदा करावा. सर्व संतांची आणि हिंदूंची ही मागणी आहे, असे प्रतिपादन श्री. विनायक देशपांडे यांनी केले. पनवेल येथील सरस्वती विद्या मंदिर विद्यालयाच्या प्रांगणात विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या वतीने श्रीराम मंदिर निर्माण हेतू भव्य संकल्प सभा आयोजित करण्यात आली होती. या सभेत श्री. देशपांडे यांनी अयोध्येतील श्रीराम मंदिराचा इतिहास आणि आगामी काळात राम मंदिर बांधण्यासाठी हिंदूंनी आणि मुसलमान यांनी काय करायला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले.

सभेच्या शेवटी खालील संकल्प करण्यात आले –

१. भव्य राममंदिरासाठी कायदा सरकारने करावा.
२. संतांच्या मार्गदर्शनाखाली श्रीराम जन्मभूमी न्यासाच्या अंतर्गत मंदिराचे बांधकाम झाले पाहिजे.
३. संतांनी १९८९ साली ठरवल्याप्रमाणेच मंदिराचे बांधकाम बांधले जावे.
४. अयोध्येच्या सांस्कृतिक सीमेच्या क्षेत्रात कोणतीही नवीन मशीद होऊ नये.
५. विदेशी आक्रमक बाबराच्या नावाने संपूर्ण भारतात कुठेही स्मारक, भवन आणि मशीद बनवण्याची अनुमती नसावी.
या सभेची सांगता पसायदानाने करण्यात आली.

श्री. देशपांडे यांनी त्यांच्या मार्गदर्शनात सांगितलेली अन्य सूत्रे

१. कायदा झाल्यास भव्य राममंदिर बांधण्याचे अडथळे दूर होतील. राममंदिर हे सांप्रदायिक सूत्र नाही, तर हा राष्ट्रीयता विरुद्ध अराष्ट्रीयता असा हा संघर्ष आहे. राम आपल्या राष्ट्रीयत्वाचे प्रतीक आहे. बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा घटनेची पहिली प्रत सिद्ध केली तेव्हा त्या पहिल्या प्रतीच्या पहिल्या पानावर भगवान श्रीरामाचे छायाचित्र आहे. दुसरे भगवान श्रीकृष्णाचे आहे, तिसरे महावीर जैन, नंतर भगवान बुद्ध, महाराणा प्रताप आणि छत्रपती शिवाजी महाराज यांची छायाचित्रे आहेत. ही सगळी आपल्या राष्ट्राची प्रतिके आहेत. आपल्या अस्मितेचे मानबिंदू आहेत. आपल्या घटनेने श्रीरामांना राष्ट्रीय महापुरुषाचा दर्जा दिलेला आहे. त्यामुळे त्यांचे स्मारक बांधणे, हे आपले कर्तव्य आहे. राममंदिराचा विषय हा राष्ट्रीयत्वाचा विषय आहे. त्यामुळे त्याच्यात तडजोड करू शकत नाही.
२. बाबरचा आणि आमचा काय संबंध आहे ? तो तर आक्रमक होता. विदेशातून आला होता. इराणचे मुसलमान रुस्तुम सोहराबला राष्ट्रीय महापुरुष मानतात. ते तर पारशी होते. इजिप्तसारखा मुसलमान देश त्या देशातील पिऱ्यांमिडला आपले राष्ट्रीय प्रतीक मानतो, इंडोनेशियातील मुसलमान श्रीरामाला आपले पूर्वज मानतात, तर मग भारतातील मुसलमानांनी श्रीरामाला राष्ट्रीय प्रतीक मानले पाहिजे आणि त्यांच्या मंदिरासाठी साहाय्य केली पाहिजे. सरकारने कायदा केला, तर येणाऱ्यां २ वर्षांच्या आत भव्य राममंदिराचे निर्माण होईल.

Share this:

Post a Comment

सूचना

विदर्भ24न्यूज़ पोर्टल को बेहतर बनाने में सहायता करें और किसी खबर या अंश मे कोई गलती हो या सूचना / तथ्य में कोई कमी हो तो हमसे संपर्क करे - 9421719953

 
Copyright © 2014 Vidarbha Latest News विदर्भ24न्यूज Amravati Letest News. Template Designed by Vidarbha24news - या इंटरनेट न्यूज चॅनेल तथा ऑनलाईन वेब पोर्टलमध्ये प्रसिध्द झालेल्या बातम्या आणि लेखामधून व्यक्त झालेल्या मतांशी संपादक / संचालक सहमत असतीलच असे नाही.