जिल्हा प्रतिनिधि / महेन्द्र महाजन -
शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरले असले तरी, उत्तर प्रदेश सरकारने शेतकऱ्यांना दिलेल्या कर्जमाफीचा अभ्यास केला जाईल, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कर्जमाफीचा चेंडू टोलविला.अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्याचे कामकाज बुधवारी सुरू झाले. संघर्षयात्रे वरून परतलेल्या विरोधी पक्ष आमदारांनी आजही विधानसभेच्या कामकाजा वरील बहिष्कार कायम ठेवला. सभागृहाबाहेर काहीवेळ कर्जमाफीच्या मागणीसाठी जोरदार घोषणाबाजी केली. कामकाज सुरू होताच शिवसेनेचे शंभूराजे देसाई यांनी कर्जमाफीची मागणी केली. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफी दिली. आमचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी योगी आदित्यनाथ यांचे अभिनंदन केले आहे. तसेच आमच्याही मुख्यमंत्र्यांचे अभिनंदन करण्याची संधी द्या, असे ते म्हणाले. भाजपाचे आशिष देशमुख यांनीही कर्जमाफीची जोरदार मागणी केली. उत्तर प्रदेशच्या धर्तीवर कर्जमाफी द्या. आमचे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे हे दाखविण्यासाठी कर्जमाफी हाच मार्ग असल्याचे ते म्हणाले. मुख्यमंत्री फडणवीस यांनी कर्जमाफीच्या घोषणेला बगल देत विधानसभेत निवेदन केले. ते म्हणाले की, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सरकारने शेतकरी कर्जमाफीचा निर्णय घेतलेला आहे. महाराष्ट्रात 31 लाख शेतकऱ्यांकडे कर्जाची थकबाकी आहे. नव्याने कर्ज मिळण्यास ते पात्र ठरावेत अशी व्यवस्था करणे आवश्यक आहे. कर्जमाफी देण्याबाबत सरकार सकारात्मक आहे. अर्थसंकल्पातही आम्ही तीच भूमिका मांडली. उत्तर प्रदेशच्या कर्जमाफीचे मॉडेल काय आहे, ते पैसा कुठून आणणार आहेत याची माहिती घ्यायला मी आजच वित्त सचिवांना सांगितले आहे. कर्जमाफीसाठी केंद्राची मदत आम्ही मागितली आहे. त्यांच्या कडून मदत मिळाली नाही तरीही कर्जमाफी देता यावी, याचे नियोजन आम्ही करतोय. विरोधकांची संघर्ष यात्रा संपली. त्यांचा संघर्ष कशासाठी होता यावर मी बोलणार नाही. त्यांना त्यांचा संघर्ष लखलाभ. राज्य सरकार मात्र शेतकऱ्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे राहील, असे मुख्यमंत्री म्हणाले.
Post a Comment