बीड येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी ही बैठक घेतली. यावेळी त्यांच्या समवेत अप्पर पोलीस महासंचालक संदीप बिष्णोई, राज्य निवडणूक आयोगाचे सचिव शेखर चन्ने, विशेष पोलीस महानिरीक्षक अजित पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी नवल किशोर राम (बीड), डॉ. प्रशांत ननावरे (उस्मानाबाद), शिवाजी जोंधळे (जालना), अप्पर जिल्हाधिकारी पी.एल. सोरमारे (औरंगाबाद), पोलीस अधीक्षक जी. श्रीधर (बीड), पंकज देशमुख (उस्मानाबाद), ज्योतीप्रिया सिंग (जालना), नवीनचंद्र रेड्डी (औरंगाबाद) यांनी आपआपल्या जिल्ह्यातील निवडणूकीच्या अनुषंगाने केलेल्या पूर्वतयारीचा आढावा सादर केला. तसेच विभागीय आयुक्त कार्यालयातील विभागीय नोडल अधिकारी तथा उपायुक्त पारस बोथरा यांनी औरंगाबाद विभागातील आठ जिल्ह्यातील निवडणूकीच्या पूर्वतयारीचे सविस्तर सादरीकरण केले.
राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूकीचे महत्व विषद करुन सविस्तर मार्गदर्शन केले. ग्रामीण भागातील लोकशाही व्यवस्था बळकट करण्यासाठी या निवडणूका महत्वाच्या असल्याचे सांगून ते म्हणाले की, या निवडणूकीत संगणकीकरणाचा उपयोग मोठया प्रमाणात झाल्यामुळे उमेदवारांचे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण कमी झाले आहे. गत निवडणूकीच्या तुलनेने उमेदवारांचे अर्ज रद्द होण्याचे प्रमाण कमी होत आहे. मतदार मोठया प्रमाणात आपल्या मतदानाचा हक्क बजावतील यादृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने राज्यात मतदारजागृती मोहिम राबविण्यास सुरुवात केली आहे. प्रत्येक जिल्ह्यात मतदारांना विविध माध्यमातून जागृत करण्यात येत आहे. पारंपारिक माध्यमे आणि आधुनिक माध्यमे वापरण्याबरोबरच मतदारांना मतदान चिठ्ठीचे वाटप करण्यात येणार आहे. प्रत्येक जिल्ह्याने निवडणूक प्रक्रीया सुरळीत होण्यासाठी भरारी पथके, आचारसंहिता कक्ष, व्हिडीयो पथके, चेक पोस्ट इत्यादी प्रकारच्या उपाययोजना कराव्यात. निवडणूक काळात होणाऱ्या मोठया आर्थिक व्यवहारांवर लक्ष ठेवण्यासाठी बँकांची मदत घ्यावी. पोस्टल मतपत्रिकांचे वाटप वेळेवर होईल व निवडणूक कर्तव्यावर असलेल्या मतदारांना मतदानापासून वंचित राहू लागू नये यासाठी नियोजन करावे. संवेदनशील आणि अतिसंवेदनशील मतदान केंद्रांची निश्चिती करुन त्याठिकाणी जास्तीच्या प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात असे सांगून उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर कटाक्षाने लक्ष ठेवण्यासाठी यंत्रणा सज्ज करण्याचे व नियमबाह्य बाबी दिसून आल्यास कठोर कारवाई करावी असेही आयुक्त सहारिया म्हणाले.
निवडणूकीच्या अनुषंगाने प्रत्येक जिल्ह्यातील अनुषंगाने महसुल व पोलीस प्रशासनाने संयुक्तरित्या नियोजन करुन निवडणूकीत भयमुक्त वातावरण राहील याची दक्षता घ्यावी अशी सूचना करुन राज्य निवडणूक आयुक्त सहारिया यांनी विविध बाबीविषयी सखोल मार्गदर्शनही केले.
प्रारंभी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी नगर परिषद निवडणूकीत उत्तम कामगिरी बजावल्याबद्दल जिल्हाधिकारी राम, निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी, उपविभागीय अधिकारी शिवकुमार स्वामी (अंबाजोगाई), मुख्याधिकारी रामनिवास झंवर, भिघोत आणि नगर प्रशासन अधिकारी सतीश शिवणे यांचा आयुक्तांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी बैठकीस निवडणूक निरीक्षक व इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
Post a Comment